हिंदूंच्या बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात संपूर्ण देशात ‘धर्म रक्षा अभियान’ ! – मिलिंद परांडे, महामंत्री, विश्व हिंदु परिषद

विश्व हिंदु परिषदेची पत्रकार परिषद

डावीकडून सर्वश्री शंकर गायकर, मिलिंद परांडे आणि श्रीराज नायर

मुंबई – कोरोनाच्या भीषण आपत्तीच्या काळात संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत असतांना, तसेच सामाजिक-धार्मिक संस्था सेवाकार्यात गुंतल्या असतांना ख्रिस्ती मिशनरी मुलांचे अन् हिंदूंचे धर्मांतराचे काम आक्रमकपणे करत होते. कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यावर हे कारस्थान उघड झाले आहे. ‘चंगाई सभा’ यांसारख्या फसव्या कारस्थानांद्वारे चर्च उघडपणे अवैधरित्या धर्मांतर करत आहे. याविषयी जागृती करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने २० ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘धर्म रक्षा अभियान’ राबवण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे महामंत्री श्री. मिलिंद परांडे यांनी दिली. १८ डिसेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन श्री. मिलिंद परांडे यांनी ही माहिती दिली. या वेळी विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री श्री. श्रीराज नायर आणि मुंबई क्षेत्राचे मंत्री श्री. शंकर गायकर हेही उपस्थित होते.

श्री. मिलिंद परांडे म्हणाले,

१. देवल ऋषि, स्वामी विद्यारण्य, रामानुजाचार्य, रामानंद, चैतन्य महाप्रभु, स्वामी दयानंद, स्वामी श्रद्धानंद यांनी धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात घेण्याचा अखंड प्रयत्न केला. या प्रयत्नांना आम्ही गती देण्याचे ठरवले आहे.

२. स्वामी श्रद्धानंद यांचा २३ डिसेंबर हा बलीदानदिन ‘धर्म रक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो; परंतु धर्मांतराच्या षड्यंत्राची भीषणता पहाता या वर्षी अभियानाचा विस्तार करण्यात आला आहे. धर्मांतराचे षड्यंत्र उघड करण्यासाठी साहित्याचे वितरण, जनसभा, तसेच प्रसारमाध्यमे यांद्वारे जागृती केली जाणार आहे.

३. कोरोनाच्या काळात वनवासी, मागास समाजाची वस्ती यांना लक्ष्य करून कोरोनाच्या काळात जितकी चर्च उघडली गेली, तेवढी मागील २५ वर्षांत उघडली गेली नसल्याचे स्वत: मिशनरींनी मान्य केले आहे.

४. लव्ह जिहादद्वारे हिंदु महिलांवर अत्याचार किंवा हत्या करण्याचा सुनियोजित कट चालू असल्याच्या बातम्या कोणत्या ना कोणत्या भागातून नियमित येत आहेत. खाद्यपदार्थांवर थुंकण्याच्या बातम्यांतून, तसेच अन्य मार्गांनी धर्मांधांचा हिंदुद्वेष प्रकट होत आहे.

५. भारताची फाळणी, कोट्यवधी हिंदूंची हत्या, अवैध धर्मांतर, आतंकवाद, दंगली या वेदनांनी ग्रासलेला हिंदु समाज आता आणखी संकटे स्वीकारू शकत नाही.

धर्मांतराचे नवे षड्यंत्र !

मागील २५० वर्षांत अखंड कारस्थान आणि अब्जावधी डॉलर्स व्यय करून १८ टक्के वनवासींचे धर्मांतर करण्यात आले आहे. भारतातील जमातींमध्ये भेदभाव निर्माण करून सध्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचे नवे षड्यंत्र रचण्यात आले आहे. यामध्ये चर्चला धाम किंवा मंदिर म्हणणे, भगवी वस्त्रे परिधान करणे, येशूला कृष्णाच्या रूपात सादर करणे इत्यादी गोष्टी आहेत, असे श्री. मिलिंद परांडे यांनी सांगितले.

विश्व हिंदु परिषदेचे आवाहन !

१. ज्या राज्यांमध्ये अवैध धर्मांतर आणि लव्ह जिहाद रोखण्यासाठी सशक्त कायदे नाहीत, त्या ठिकाणी त्वरित कायदे करावेत.

२. धर्मांतरित झालेल्या अनुसूचित जमातीतील लोकांना मिळणार्‍या लाभांपासून वंचित ठेवण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती करण्यात यावी.

३. सर्व संत आणि सामाजिक, धार्मिक नेतृत्व, महापुरुष यांनी धर्मांतराच्या विरोधात व्यापक जागृती करावी.