नांदेड येथे ‘सनातन पंचांग २०२२’च्या प्रती जाळल्याच्या प्रकरणी ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’च्या वतीने पोलिसांत तक्रार प्रविष्ट !

नांदेड, ६ डिसेंबर (वार्ता.) – ४ डिसेंबर या दिवशी नांदेड येथील काही सनातनद्वेषी समाजकंटकांनी ‘सनातन पंचांग २०२२’च्या प्रती जाळल्या. सनातन पंचांगमध्ये देवता, संत आणि राष्ट्रपुरुष, तसेच क्रांतीकारक यांची चित्रे अथवा छायाचित्रे असतात. सनातन पंचांगाच्या प्रती जाळल्यामुळे ती चित्रे किंवा छायाचित्रेही जाळली गेली. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेच्या विरोधात ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ चे नांदेड विभागप्रमुख श्री. संतोष देवकर यांनी ६ डिसेंबर या दिवशी येथील हदगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. येथील अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नावे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रारअर्ज प्रविष्ट करण्यात आला. यावर पोलीस अधीक्षकांनी ७ डिसेंबरला भेटण्याचे, तसेच ‘मध्यवर्ती ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात येईल’, असे आश्वासन दिले.

‘संतोष पाटील शिंदे, सुनील पाटील कदम, विलास पाटील घोरबांड, बालाजी पाटील सांगवीकर, अंकुश पाटील कोल्हे, नवनाथ पाटील जोगदंड आणि साईराज ढगे यांनी जाणूनबुजून हिंदु धर्मबांधव अन् शिवभक्त यांच्या भावना दुखावण्याचा उद्देशाने सनातन पंचांगांच्या प्रती जाळल्या आहेत. वरील विकृत लोकांवर योग्य ती कायदेशीर  कारवाई करण्यात यावी’, असे या तक्रारीत म्हटले आहे. ‘सनातन पंचांग २०२२’ मध्ये राजमाता जिजाऊंचा तिथीनुसार १७ जानेवारी २०२२ या दिवशी उल्लेख करण्यात आला आहे. हा उल्लेख योग्य असतांना जाणीवपूर्वक ‘तो दिनांकानुसार १२ जानेवारी २०२२ असा हवा’, असा कांगावा करत त्यांनी हे कुकृत्य केले. ‘इंग्रजी कालगणना प्रचलित होण्यापूर्वीचे संत, राजे आदींच्या जयंती किंवा पुण्यतिथी या तिथीनुसार छापण्यात आल्या असून त्यात इतिहास पालटण्याचा कोणताही हेतू नाही’, हे सनातन पंचांगाच्या संपादकांनी स्पष्ट केले आहे.