समाजाला वैचारिकतेकडे नेणे, हे माध्यमांचे दायित्व असायला हवे ! – गिरीष कुबेर, संपादक, दैनिक लोकसत्ता

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा तिसरा दिवस !

‘वृत्तमाध्यमाचे मनोरंजनीकरण’ या विषयावर परिसंवाद

गिरीष कुबेर

नाशिक – वैचारिकतेचा अभाव असलेल्या समाजाला वैचारिकतेकडे नेणे, हे माध्यमांचे दायित्व असायला हवे. समाज एका दिशेने जात असेल, तर माध्यमांनी समाजाला योग्य दिशा द्यायला हवी; मात्र माध्यमेही त्या समाजाच्या मागे धावतात, असे सध्या लक्षात येते. ‘लोकांना चांगले वाचायला आवडत नाही’, असे म्हणणे अयोग्य असून ‘लोकांना चांगले वाचनासाठी देण्यास माध्यमे असमर्थ आहेत’, असा याचा अर्थ होतो. माध्यमांनी काळानुसार लोकांना जे हवे, त्याहून अधिक लोकांना जे आवश्यक आहे, ते द्यायला हवे. ‘लोकांना काय वाटेल ?’ याचा विचार संपादकांनी करू नये, अन्यथा ती प्रसारमाध्यमे जनतेचा खर्‍या अर्थाने विकास करू शकत नाहीत’, असे मत गोपाळ गणेश आगरकर यांचे उदाहरण देत दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीष कुबेर यांनी व्यक्त केले. नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण’ या विषयावरील परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या परिसंवादात जयदेव डोळे, विश्वंभर चौधरी, अपर्णा वेलणकर आणि डॉ. हरी नरके हेही सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रसन्न जोशी यांनी केले. या वेळी वक्त्यांनी ‘वृत्तमाध्यमाचे मनोरंजनीकरण वाढले असून बातम्यांचे सनसनाटीकरणही वाढले आहे’, असाही आरोप केला. परिसंवादाच्या शेवटी प्रसन्न जोशी यांनी वृत्तमाध्यमांतील मनोरंजनाचे समर्थन करत ‘मनोरंजन अच्छा है !’, असे मत व्यक्त केले. (देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असतांना जनतेला मनोरंजनाकडे नेणे, म्हणजे ‘रोम जळत असतांना निरो फिडल वाजवत होता’, असे करण्यासारखेच आहे. – संपादक)

संभाजी ब्रिगेडकडून गिरीष कुबेर यांच्यावर शाईफेक !

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे प्रकरण

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याने दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीष कुबेर यांच्यावर नाशिक येथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. कुबेर यांनी त्यांच्या ‘रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाई फेकणार्‍या दोघांना कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना त्यांच्या कृत्याचे समर्थन केले. या प्रकरणी भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अयोग्य लिखाण राज्यातील जनता सहन करणार नाही. जे स्वत:ला विद्वान समजतात, त्यांनी वातावरण कलुषित करणार्‍या गोष्टी केल्यास ते अयोग्य आहे. त्यांच्या बातम्या आणि अग्रलेखांतून समाजावर परिणाम होत असतो’, अशी प्रतिक्रिया एका प्रसिद्धीमाध्यमाशी बोलतांना व्यक्त केली.