९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप !

नाशिक, ५ डिसेंबर (वार्ता.) – येथील ‘भूजबळ नॉलेज सिटी’मधील कुसुमाग्रजनगरीत चालू झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप ५ डिसेंबर या दिवशी झाला. समारोपाच्या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

साहित्य संमेलनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा योग्य तो गौरव केला ! – छगन भूजबळ, स्वागताध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कवी कुसुमाग्रज हे दोघेही नाशिकचेच आहेत. संमेलनातील कवी कट्ट्याला आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव दिले, ग्रंथदिंडीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गाण्यांचा समावेश केला, तसेच भाषणात स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख केला; मात्र तरीही काही जणांचे समाधान झाले नाही. या साहित्य संमेलनात आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा योग्य तो गौरव केला, असे वक्तव्य या साहित्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भूजबळ यांनी साहित्य संमेलनाच्या समारोपीय भाषणात केले. या साहित्य संमेलनात नाशिकसह महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांमधून, तसेच पाकिस्तानमधून साहित्यप्रेमी सहभागी झाले होते.

साहित्य संमेलनात संमत करण्यात आलेले ठराव !

१. नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना केंद्र आणि राज्य शासन यांनी साहाय्य करावे.

२. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा.

३. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असल्याविषयी शासनाने उदासीनता सोडून शाळांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा.

४. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. त्यांच्या धोरणाचा निषेध आहे.

५. महाराष्ट्राच्या बाहेरील मराठी भाषिकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे.

६. महाराष्ट्र संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी ’महाराष्ट्र परिचय केंद्रां’चे पुनरुज्जीवन करावे.

७. महाराष्ट्रातील नामशेष होत असलेल्या बोलीभाषांचे रक्षण करण्यासाठी समिती स्थापन करावी.

८. केंद्रशासनाच्या कार्यालयात ‘ळ’ हा वर्ण वापरण्यात यावा. त्याऐवजी अन्य कोणता वर्ण वापरण्यात येऊ नये.

९. सार्वजनिक ग्रंथालयांसाठी पुस्तके घेतांना त्यांचा दर्जा राखला जावा.

१०. न्यायमूर्ती रानडे यांच्या निफाड येथील साहित्याचे संवर्धन करावे.


जिथे चुकते तिथे लेखकाने वाचा फोडली पाहिजे ! – बाळासाहेब थोरात

संतांची परंपरा पुढे नेण्‍याची शक्‍ती गोदावरी नदीच्‍या पाण्‍यात आहे. सर्वच संतांनी मराठी भाषेतून लिखाण आणि त्‍या माध्‍यमातून जनजागृती केली. लोकमान्‍य टिळकांनीही लिखाणाच्‍या माध्‍यमातून स्‍वातंत्र्याच्‍या चळवळीला वाचा फोडली. ज्‍या ठिकाणी चुकते तिथे लेखकाने वाचा फोडली पाहिजे.