(म्हणे) ‘कुटुंबव्यवस्था व्यक्तीस्वातंत्र्यसाठी मारक !’

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘भाषा, लेखक आणि लोकशाही’ या विषयावरील परिसंवादात ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या ‘वेबपोर्टल’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांच्याकडून भारतीय संस्कृतीला छेद देणारे विधान

  • आज अनेक पाश्‍चात्त्य राष्ट्रांमध्ये कुटुंबव्यवस्था नसल्यामुळे विवाहबाह्य संबंध, त्यांतून निर्माण होणार्‍या अपत्यांच्या पालनपोषणाचे दायित्व, त्यांतून निर्माण होणारे हिंसेचे प्रकार आदी अनेक समस्या वाढत आहेत. आपल्याकडील उथळ विचारांच्या लोकांना जे व्यक्तीस्वातंत्र्य वाटते, तो खरे तर स्वैराचार आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! भारतीय संस्कृतीकडे आज अनेक पाश्‍चात्त्य आकर्षित होत आहेत. असे असतांना कुटुंबव्यवस्था नाकारणारे वक्तव्य, म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी होय !
  • कुटुंबव्यवस्थेमुळेच आज जगातील सर्वांत प्राचीन हिंदु संस्कृती लाखो वर्षे टिकून आहे. कुटुंबव्यवस्थेतील बंधने प्रत्येक व्यक्तीचे जीवन संयमित करून स्थिर करतात आणि अंतिमतः सुखावह करतात, हे लक्षात घेतले पाहिजे !
  • स्वतःच्या संकेतस्थळाला मराठी नावही देऊ शकणार्‍यांना मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात बोलावणे, हा आयोजकांचा मराठीद्रोहच नव्हे का ? असे वक्ते आणि आयोजक यांच्याकडून मराठी भाषेचे कधी तरी जतन आणि संवर्धन होऊ शकेल का ?
‘वेबपोर्टल’चे मुख्य संपादक दिनकर गांगल

नाशिक – व्यक्तीस्वातंत्र्य हा लोकशाहीचा गाभा आहे. महात्मा गांधी इंग्रजांविषयी म्हणायचे की, तुम्ही स्वातंत्र्य देणारे कोण ? आमचे आम्ही स्वतंत्र आहोत. व्यक्तीस्वातंत्र्याविषयी ही आत्मविश्‍वासाची भावना लोकशाहीत असायला हवी. असा आत्मविश्‍वास आपल्यात आहे का ? कुटुंबव्यवस्था ही व्यक्तीस्वातंत्र्यासाठी मारक आहे, असे उथळ विधान ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या ‘वेबपोर्टल’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘भाषा, लेखक आणि लोकशाही’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर लेखक रवींद्र पंढरीनाथ, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, डॉ. दीपक पवार, पत्रकार इब्राहिम अफगाण आणि पत्रकार दीप्ती राऊत उपस्थित होते.

गांगल यांच्या कुटुंब व्यवस्थेच्या विरोधातील वक्तव्याचे पत्रकार दीप्ती राऊत यांच्याकडून खंडन  !

दिनकर गांगल यांनी त्यांच्या भाषणात ‘कुटुंबव्यवस्था लोकशाहीला मारक आहे’, असे कुटुंबव्यवस्थेला दूषण देणारे वक्तव्य केले. याला दैनिक ‘दिव्य मराठी’च्या पत्रकार दीप्ती राऊत यांनी त्यांच्या भाषणात ‘कुटुंबव्यवस्थेमुळेच खर्‍या अर्थाने लोकशाही बळकट होते’, असे नम्रतेने सांगून दिनकर गांगल यांच्या वक्तव्याचे खंडन केले.