सांगली, ३ डिसेंबर (वार्ता.) – १ डिसेंबरला राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने उपस्थिती लावली. यात श्रीरायगड जिल्ह्यात आणि रायगड गडावर या पावसाचे स्वरूप भयंकर होते; मात्र अशा स्थितीतही रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा झाल्याची चित्रे, तसेच ‘व्हिडिओ’ प्रसिद्धीमाध्यमांवर प्रसारित झाले. प्रत्यक्षात गेल्या ३० वर्षांपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सांगली येथील धारकरी प्रतिदिन ३०० किलोमीटर येथून येऊन ही पूजा करत आहेत. त्यामुळे नित्यनियमाप्रमाणे १ डिसेंबरलाही वादळी वारा आणि प्रचंड पावसातही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सांगली धारकर्यांकडून श्रीरायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली होती.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील धारकरी प्रतिदिन ३०० किलोमीटर अंतर कापून दुर्गराज ‘श्रीरायगड’च्या पूजेसाठी जात आहेत. कोणताही ऋतू, ऊन, वारा, पाऊस, कोणतीही अडचण किंवा अन्य काहीही असो, १४ जानेवारी १९९१ पासून ही पूजा सांगलीतील धारकर्यांकडून अखंडितपणे चालू आहे. त्यामुळेच ही पूजा आता ‘श्रीरायगड व्रत’ बनली आहे. सांगलीहून निघून श्रीरायगडला पोचल्यावर पायथ्याला पाचाड येथे जिजामातांची समाधी आहे, त्याची पूजा केली जाते. वरती श्रीशिरकाईदेवी, महाराजांची मूर्ती, सिंहासन, जगदीश्वर आणि श्रीशिवछत्रपतींची समाधी यांची पूजा केली जाते.