नाशिक येथील ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन

ग्रंथदिंडीत विविध चित्ररथांद्वारे महाराष्‍ट्र संस्‍कृतीचा जयघोष !

नाशिक, ३ डिसेंबर (वार्ता.) – ९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या ग्रंथदिंडीला येथील कुसुमाग्रज प्रतिष्‍ठानमधून सकाळी ९.३० वाजता प्रारंभ झाला. या दिंडीमध्‍ये महाराष्‍ट्राच्‍या गौरवगीतांसमवेत महाराष्‍ट्राचे संस्‍कृतीदर्शन घडवणारे विविध चित्ररथ साकार करण्‍यात आले होते. यामध्‍ये अध्‍यात्‍म, राष्‍ट्रपुरुष, विज्ञान आदी विषयांचा समावेश होता.

ग्रंथपालखीमध्‍ये ज्ञानेश्‍वरी, संमेलनाध्‍यक्ष डॉ. जयंत नारळीकर, महात्‍मा फुले यांचे ग्रंथ आदींचा समावेश होता. ग्रंथदिंडीमध्‍ये विविध शाळांचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. दिंडीत ढोल, ताशे, लेझीम, टाळ आदी पारंपरिक वाद्यांच्‍या गजरात विद्यार्थ्‍यांनी नृत्‍य केले. सांदीपनी मुनी गुरुकुलाचे विद्यार्थी वेद, संस्‍कृती आदींविषयी विविध माहिती देणारे फलक घेऊन दिंडीत सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीतील मल्लखांब, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्‍युकेशन सोसायटी, भोसला मिलिटरी स्‍कूल, विद्या प्रबोधिनी प्रशाला यांनी साकारलेला ‘क्रांतीकारकांचा मानवी देखावा’ आणि ज्‍योती विद्यालय पिंपळगाव बहुला यांनी साकारलेला ‘संतांचा चित्ररथ’ हे आकर्षक ठरले.

संमेलनाच्या ठिकाणी स्वा. सावरकर यांचा जयघोष !

मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमीत संमेलन असूनही कार्यक्रम पत्रिकेवर कोणत्याही मंचाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. संमेलन गीतामध्येही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख नसल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना डावलण्यात येत असल्याची जोरदार चर्चा झाली होती; मात्र संमेलनाच्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विविध ठिकाणी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या चर्चासत्राच्या एका स्थळाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच’ असे नाव देण्यात आले आहे.


स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या जन्‍मभूमीतील संमेलनाची प्रचीती !

नाशिकची एक ऐतिहासिक ओळख स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्‍मभूमी म्‍हणूनही आहे. ग्रंथदिंडीमध्‍ये स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या कार्याची महती सांगणार्‍या चित्ररथामधून याची प्रचीती आली ! शिक्षण मंडळ, भगूर यांनी साहित्‍यिक स्‍वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित केलेल्‍या चित्ररथामध्‍ये ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या ग्रंथसंपदेच्‍या प्रतिकृती’ आणि ‘कारागृहातील भिंतीवर त्‍यांनी केलेल्‍या लिखाणाचा मानवी देखावा’ होता. हा चित्ररथ सर्वांचे आकर्षण ठरला ! स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या राष्‍ट्रकार्याची माहिती देणारे फलक हातात धरून विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते.