समर्पित भावनेने हिंदुत्वाचे कार्य करणारे मुंबईतील कर्मयोगी आनंदशंकर पंड्या यांना हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली !

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही शोक व्यक्त

  • यशस्वी उद्योजक ते प्रखर हिंदुत्वनिष्ठ असा पंड्या यांचा प्रवास !

आनंदशंकर पंड्या

मुंबई, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – राष्ट्र आणि हिंदु धर्म जागृतीचे कार्य समर्पित भावनेने अन् अविरतपणे करणारे मुंबई येथील रत्नव्यावसायिक कर्मयोगी आनंदशंकर पंड्या यांचे १० नोव्हेंबर २०२१ या दिवशी वयाच्या ९९ व्या वर्षी मुंबईत देहावसान झाले. त्यांना श्रद्धांजली वहाण्याच्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन  २४ नोव्हेंबरला करण्यात आले होते. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे उपाध्यक्ष चंपतराय, पू. स्वामी चिदानंद, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला, माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभु, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आनंदशंकर पंड्या यांच्या निधनाविषयी पाठवलेल्या शोकसंदेशाचे वाचनही या वेळी करण्यात आले.

शेवटच्या श्वासापर्यंत हिंदूंच्या जागृतीसाठी झटणारे व्यक्तीमत्त्व ! – चंपतराय, उपाध्यक्ष, विश्व हिंदु परिषद तथा महासचिव, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

हिंदु समाजापुढील आव्हानांना सामोरे जाणे आणि हिंदूंवरील अन्यायाविषयी वेळोवेळी सत्ताधार्‍यांना निवेदने देणे, यांसाठी आनंदशंकर पंड्या हे जागृत असत. कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदू जागो’ नावाची ५ कोटी पत्रके छापून ती ते वितरणासाठी पाठवत. एका व्यक्तीने संकल्प केला, तर ती काय करू शकते ? याचे आनंदशंकर पंड्या हे उत्तम उदाहरण आहे. कोणत्याही सत्तेने प्रभावित न झालेले त्यांचे व्यक्तीमत्व होते. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत हिंदूंना जागृत ठेवण्यासाठी झटणारे त्यांचे व्यक्तीमत्व होते.

आनंदशंकर यांनी सर्वशक्तीनिशी हिंदुत्वाचा प्रसार केला ! – पुरुषोत्तम रूपाला, केंद्रीयमंत्री

आनंदशंकर पंड्या यांचे हिंदुत्वाच्या कार्यात सातत्य होते. त्यांची सर्व शक्ती ते हिंदुत्वाच्या प्रचारासाठी वापरत. कुणी जर आपल्या संस्कृतीवर आघात केला, तर आनंदशंकर पंड्या त्यांना लिखाणातून उत्तर द्यायचे.

आनंदशंकर यांनी स्वत:च्या कार्यातून सर्वांपुढे आदर्श ठेवला ! – राम नाईक, ज्येष्ठ नेते, भाजप आणि माजी राज्यपाल, उत्तरप्रदेश

आनंदशंकर हे स्वतःची भूमिका स्वच्छ आणि स्पष्टपणे मांडायचे. ते माझ्यासाठी प्रेरणापुरुष होते. स्वत:च्या कार्यातून त्यांनी सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे. राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍या सर्वांना प्रोत्साहन देणे, हा त्याचा स्वभाव होता.

आनंदशंकर पंड्या यांचा परिचय !

आनंदशंकर पंड्या हे मुंबईतील यशस्वी व्यापारी होते. मुंबईतील आघाडीच्या १० हिर्‍यांच्या आस्थापनांमध्ये त्यांच्या ‘रेवाशंकर’ या आस्थापनाची गणना केली जाते. त्यांनी त्यांचा सर्व व्यवसाय मुलांवर सोपवून स्वत:ला हिंदुजागृतीच्या कार्यात झोकून दिले. त्यांचे वक्तृत्व आणि लिखाण निर्भय होते. कार्यनिष्ठेमुळे साधू-संत, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक बंधू यांचा त्यांच्या कार्यात मोठा सहभाग लाभला. त्यांनी विश्व हिंदु परिषदेच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष पदाचे दायित्व सांभाळले. घरी श्रीमंती असूनही आनंदशंकर यांचे रहाणीमान साधे होते. ‘हिंदूओं पर अन्याय’, ‘रामजन्मभूमी क्यों चाहिए ?’, ‘वोट देनेसे पहले अवश्य पढें’, ‘दंगों की राजनीती’, ‘ईसाई मिशनरीयों का भारत पर आक्रमण’, अशा अनेक विषयांची न्यूनतम शब्दांत प्रभावीपणे मांडणी करून हस्तपत्रके सिद्ध करून ती लक्षावधी लोकांपर्यंत पोचवली.
(दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ मधील सतीश सिन्नरकर यांच्या लिखाणातून साभार)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या शोकसंदेशाचा सारांश !

बहुआयामी प्रतिभा आणि दुर्दम्य पुरुषार्थ असलेले आनंदशंकर पंड्या यांनी त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी समर्पित केले होते. त्यांनी त्यांचे प्रभावी लिखाण आणि तेजःपुंज विचार यांमुळे राष्ट्रीय चिंतन परंपरेला समृद्ध केले. नीती, अध्यात्म आदी विविध विषयांवरील त्यांची अंतर्दृष्टी अद्भूत होती. राष्ट्राच्या विकासासाठी सदैव उत्साही असणारे पंड्याजी यांची संघटनक्षमता आणि समाजाप्रती त्यांचा असणारा नि:स्वार्थ सेवाभाव अनुकरणीय होता. आपल्या सहज, सरळ आणि जुळवून घेणाच्या स्वभावामुळे ते सर्वप्रिय होते. त्यांच्या निधनामुळे देश आणि समाज यांची अपरिमित हानी झाली आहे. ‘आनंदशंकर पंड्या यांच्या आत्म्याला शांती मिळू दे आणि या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्यासाठी धैर्य मिळावे’, अशी मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो.