राजस्थानमध्ये स्थानांतर करून घेण्यासाठी सरकारी शिक्षकांना द्यावी लागते लाच !

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या प्रश्‍नावर शिक्षकांनी दिली स्वीकृती !

  • देशातील बहुतेक राज्यांत सरकारी कर्मचारी, अधिकारी, पोलीस आदींना सोयीच्या ठिकाणी स्थानांतर करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात किंवा ते स्वतःहून यासाठी पैसे देतात, असे सर्रास म्हटले जाते; मात्र याची चौकशी कुणीही कधीही करत नाही. हा जणू कारभाराचाच एक अघोषित भाग आहे, असेच एकूण चित्र आहे. हिंदु राष्ट्रात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नसेल ! – संपादक
  • स्वार्थासाठी लाच देणारे नीतीभ्रष्ट शिक्षक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवणार ? लाच देणार्‍यांना आणि घेणार्‍यांना सरकराने कारागृहात टाकाले पाहिजे ! – संपादक
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

जयपूर (राजस्थान) – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत येथे राज्यस्तरीय शासकीय शिक्षकांच्या पुरस्काराच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी उपस्थितांसमोर राज्यातील इतर सूत्रांसह भ्रष्टाचाराचे सूत्र उपस्थित केले. ते म्हणाले, ‘आपण ऐकतो की, बर्‍याच वेळा स्थानांतर करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात. मला ठाऊक नाही. तुम्ही मला सांगू शकता का की हे खरे आहे कि खोटे ?’ असा प्रश्‍न विचारला. (जे संपूर्ण जगाला ठाऊक आहे, ते मुख्यमंत्र्यांना ठाऊक नाही, यावर कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक) यावर काहीसा गोंधळ झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विचारले, ‘तुम्हाला स्थानांतर करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात का ?’ यावर उपस्थितांनी एकासुरात मोठ्याने ‘हो’ असे उत्तर दिले. उपस्थितांमध्ये शिक्षकांची संख्या सर्वाधिक होती. त्यात पुरस्कारप्राप्त शिक्षकही होते.
उपस्थितांचे उत्तर ऐकूण गेहलोत म्हणाले, ‘कमाल आहे ! स्थानांतरासाठी पैसे द्यावे लागणे दुर्दैवी आहे. (हे गेहलोत सरकारचे अपयश आहे, हे त्यांनी मान्य करायला हवे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी ते काय करणार आहेत, हे त्यांनी सांगायला हवे ! – संपादक) स्थानांतरणाच्या संदर्भातील धोरण असे असायला हवे जेणेकरून कुणीही दुखावणार नाही. असे धोरण असायला हवे ज्यात सगळ्यांना हे ठाऊक असेल की, त्यांचे स्थानांतर नेमके कधी आणि कुठे होणार आहे ? यामुळे कुणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत किंवा आमदारांकडे खेटे मारावे लागणार नाहीत.’ (मुख्यमंत्र्यांनी केवळ सांगू नये, तर प्रत्यक्षात करून दाखवावे ! – संपादक)