संभाजीनगर येथे लसीकरण प्रमाणपत्र पडताळणीविनाच मॉलमध्ये प्रवेश, पंपांवर इंधन देणे चालूच !

समाजाला वेळीच शिस्त न लावल्याचा परिणाम !

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता !

संभाजीनगर – कोरोनाच्या लसीकरणात संभाजीनगर जिल्हा पुष्कळ मागे पडल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनावर अप्रसन्नता व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शॉपिंग मॉल, मोठी किराणा दुकाने, बहुमजली दुकाने, अन् कापड दुकानांचे मॉल यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्र असलेल्यांना प्रवेश देण्याचे आदेश केले; परंतु या आदेशाला व्यापार्‍यांनी वाटाण्याच्या अक्षता लावलेले दिसून आले आहे. अनेक भागांतील मॉल आणि दुकाने यांमध्ये सर्रासपणे प्रमाणपत्र न पडताळता ग्राहकांना प्रवेश देण्यात येत होता, तसेच पेट्रोल-डिझेल दिले जात होते.

जिल्हाधिकार्‍यांनी ९ नोव्हेंबर या दिवशी काढलेल्या आदेशात दुकान मालक आणि कर्मचारी यांनी २ डोस घेणे अन् प्रमाणपत्र ठेवणे बंधनकारक केले आहे. पेट्रोल पंप, स्वस्त धान्य दुकान मोठी दुकाने आणि मॉल येथे येणार्‍या ग्राहकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र पडताळावे, असेही त्यांनी दुकानमालक अन् व्यवस्थापक यांना आदेशात सांगितले आहे; मात्र अनेक दुकानांमध्ये ग्राहकांना लसीकरणाविषयी न विचारताच प्रवेश दिला जात होता. गजानन महाराज मंदिर परिसरातील पेट्रोल पंपावर फक्त ‘नो मास्क, नो पेट्रोल, नो व्हॅक्सिन नो पेट्रोल’, असे फलक लावलेले होते; मात्र प्रमाणपत्राची विचारणा न करताच पेट्रोल देण्यात येत होते. बायजीपुरा, विजयनगर अन् सिडको-हडको या भागांतील स्वस्त धान्य दुकानांत अशीच स्थिती होती.