पणजी, १० नोव्हेंबर (वार्ता.) चोडण परिसरात अनेक ठिकाणी बांध फुटल्याने भरतीच्या पाण्याचा फटका प्रवाशांसमवेत शेतकार्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने येथील शेतजमीन नापिक होत चालली आहे. ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ने (आर्.जी.) या घटनेची नोंद घेऊन १० नोव्हेंबर या दिवशी बांधांची पहाणी केली आणि सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी केली.
बांध फुटल्याने भरतीच्या वेळी नदीचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे पोंबुर्पा फेेरी ते चोडण हा जोड रस्ता पाण्याखाली गेला आहे. याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नदीच्या भरतीच्या वेळी मोटारसायकल पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गावकर्यांनी प्रत्येक वेळा साहाय्य करून लोकांचा जीव वाचवला आहे. रस्त्यावर पाणी येण्यामागे कारण शोधण्यासाठी १० नोव्हेंबर या दिवशी ‘आर्.जी.’चे सचिव श्रीकृष्ण परब यांनी बांधावरून चालत जाऊन, तर काही ठिकाणी बोटीने जाऊन पहाणी केली. तब्बल ८ ठिकाणी बांध फुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. याकडे खाजन समिती आणि नदी जलवाहतूक विभाग यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.