आरोग्य विभागाचा गट ‘ड’चा पेपर फुटल्याचे सिद्ध !

सार्वजनिक आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार !

साधी परीक्षा घेऊ न शकणारा आरोग्य विभाग जनतेचे आरोग्य काय सांभाळणार ?

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अमरावती येथील परीक्षा केंद्रावर २४ ऑक्टोबर या दिवशी गट ‘क’ कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा देणार्‍या विद्यार्थिनीला ३१ ऑक्टोबरच्या गट ‘ड’ पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आली. आरोग्य विभागाने याची नोंद घेत गट ‘ड’ची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे मान्य करून संबंधित विद्यार्थिनीची स्वतंत्र परीक्षा घेणार, असे सांगितले आहे. ‘३१ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या गट ‘ड’च्या दुपारच्या सत्रातील परीक्षेचा पेपर फुटला आहे’, अशी तक्रार पुणे येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सायबर विभाग याचा शोध घेत आहे. प्राथमिक अन्वेषणात संभाजीनगर येथून पेपर फुटल्याची माहितीही मिळाली. संबंधित विद्यार्थिनीने गट ‘क’मधील कनिष्ठ लिपिक पदाची उत्तरतालिका पडताळली असता प्रश्नपत्रिका आणि उत्तरे जुळत नव्हती. त्यामुळे तिने शंकेपोटी ३१ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या गट ‘ड’ पदाची तिच्या मित्राची प्रश्नपत्रिका पडताळली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला.