६१ टक्के आध्यात्मिक पातळीची इंग्लंडमधील कु. ॲलिस स्वेरदा (वय २३ वर्षे) हिच्याविषयी तिची सहसाधिका कु. भाविनी कापडिया यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. निर्मळता
अ. ‘ॲलिस तिच्या मनात काहीही विचार आले की, ती ते मोकळेपणाने सांगते. तिचे मन शुद्ध आणि निर्मळ आहे.
आ. काही वेळा चित्र काढतांना तिला त्रास होत असेल, तर ती मला सांगायची. त्या वेळी मी तिला सांगितले, ‘‘तुला ही अस्वस्थता आध्यात्मिक त्रासामुळे वाटत आहे.’’ त्यावर ती लगेच ‘हो’ म्हणायची आणि सर्व विचार सांगून उपाययोजना विचारायची.
इ. ती लहान मुलांप्रमाणे प्रत्येक कृतीतून आनंद घेते. बर्याचदा ती आश्रमाच्या मार्गिकेतून येतांना तिला फुलपाखरू दिसले, तर ती हात पुढे करते आणि ते फुलपाखरू तिच्या हातावर येऊन बसते.
ई. ‘तिच्या निर्मळ मनामुळे मला बर्याचदा तिला ॲलिस न म्हणता ‘ॲलिस बाळ’, असे म्हणावेसे वाटते.
२. ऐकण्याची वृत्ती
तिने सांगितलेल्या अडचणीवर मी तिला उपाययोजना सांगते. तेव्हा ती त्या लगेच कृतीत आणते. त्यामुळे देव तिला सतत साहाय्य करतो.
३. जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती या गुणांमुळे विविध कला अवगत असणे
ॲलिसला विविध कला अवगत आहेत. ती त्या लहानपणापासून शिकली आहे. ती विविध प्रकारच्या चित्रकला, शिवणकाम, भरतकाम (एम्ब्रॉयडरी), विविध वस्तू आणि दागिने बनवणे, हे सर्व शिकत असते. एखादी गोष्ट तिला आवडली, तर ती लगेच त्याविषयी माहितीजालावरून (‘इंटरनेट’वरून) जाणून घेते आणि ते शिकते. ‘भारतात आल्यावर ६ वारी आणि ९ वारी साडी नेसणे, मेंदी आणि रांगोळी काढणे, मराठी भाषा बोलायला आणि वाचायला शिकणे, हिंदी, मराठी आणि संस्कृत भाषांत भक्तीगीते शिकणे’, हे सर्व ती अतिशय अल्प कालावधीत शिकली.
४. ‘अहं वाढू नये’, यांसाठी सतत प्रयत्नरत असणे
एखाद्या स्वभावदोषावर प्रयत्न करतांना तिला ते न्यून करण्याची तळमळ असते. ती ‘अहं वाढायला नको’; म्हणून सतत प्रयत्नरत असते.
५. सेवेची तळमळ
५ अ. एखादे चित्र काढतांना ते ‘वेळेवर आणि गुरूंना आवडेल, असे कसे होईल ?’, यासाठी धडपडणे : एखादे चित्र काढतांना ते ‘वेळेवर आणि गुरूंना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) आवडेल असे कसे होईल ?’, यासाठी तिची धडपड असते. सेवा करतांना ‘तिच्या सेवेची गती किंवा एकाग्रता यांवर परिणाम होईल, असा कुठलाही प्रश्न किंवा विचार मनात आला’, तर ती त्याविषयी लगेच बोलून घेते.
५ आ. व्यष्टी आढावा नियमित देणे : तिच्या सेवेच्या आढाव्यात कधीच खंड पडत नाही. काही मासांपूर्वी मी वैयक्तिक कामासाठी पुण्याला गेले होते, तरी ती मला नियमितपणे सेवेचा आढावा पाठवत होती, तसेच येणार्या अडचणीही विचारून घेत होती. तिला आध्यात्मिक त्रास होत असतांनाही ती एकही दिवस न चुकता सेवेचा आढावा पाठवते.
५ इ. ‘सेवेत खंड पडू नये’, यासाठी देवाला प्रार्थना करणारी कु. ॲलिस स्वेरदा ! : एकदा ती कोरोना प्रतिबंधक लस घ्यायला जाणार होती. त्या वेळी तिला वाईट वाटत होते. लस घेतल्यानंतर तिला ताप किंवा अन्य काही त्रास झाला, तर तिच्या सेवेत खंड पडेल. तिने मला हे सांगितल्यावर मी तिला सांगितले, ‘‘मी देवाला प्रार्थना केली होती. त्यामुळे माझ्यावर लस घेतल्याचा काहीच परिणाम झाला नाही. तू देवाला सांग.’’ तेव्हा तिने देवीला प्रार्थना केली, ‘मला तुझ्या सेवेत अखंड रहायचे आहे.’ त्यामुळे लस घेतल्यावर तिला काहीच त्रास झाला नाही आणि ती अखंड सेवेत राहू शकली.
५ ई. सेवेतील परिपूर्णता : सेवेत परिपूर्णता आणण्यासाठी ‘देवाला काय अपेक्षित आहे ? कसे करायला हवे’, याचा ती विचार करते. सर्व देवतांची चित्रे हाताळतांना ‘प्रत्येक चित्र हे देवाने दिलेले ज्ञान आहे. त्यामुळे ते खराब व्हायला नको’, असा तिचा भाव असतो.’ तिच्या सेवांच्या नोंदीही अद्ययावत आणि व्यवस्थित असतात.
६. देवाप्रती असलेला भक्तीभाव
अ. तिने मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना लिहिलेले पत्र वाचायला दिले होते. ते पत्र वाचून माझी पुष्कळ भावजागृती झाली. तिच्या प्रत्येक वाक्यातून केवळ भाव नव्हे, तर भक्तीही जाणवत होती.
आ. एका संतांना भेटायला जातांना तिने तिच्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी ते लिहून काढले. त्यातूनही मला तिच्यातील भक्ती जाणवली.
इ. यापूर्वी मी अनेक साधकांनी याचकभावाने केलेले लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ग्रंथ यांमध्ये वाचले आहे; पण तिचे लिखाण वाचून मला वेगळेच जाणवले. ‘त्यात तिची देवाप्रतीची भक्ती किती उच्च आहे’, असे मला वाटले.
ई. तिच्या भावामुळे तिने काढलेली देवतांची चित्रे जिवंत वाटतात. ती सेवा करतांना त्या त्या देवतेशी बोलत असते.
७. हिंदु धर्माचा अभिमान असणे
ती काढत असलेली देवतांची चित्रे पाहून बरेच साधक तिला विचारतात, ‘‘तू विदेशात असूनही इतकी चांगली देवतांची चित्रे कशी काढतेस ? तू भारतातच जन्म घ्यायला हवा होतास !’’ त्यावर तिने उत्तर दिले, ‘‘बरे झाले. मी विदेशातील आहे; कारण देवाला जगाला हे दाखवायचे आहे की, ‘हिंदु धर्म कुठल्या स्थळाशी मर्यादित नाही. तो जगात सर्वत्र आहे आणि देवी-देवता हे सत्य आहे. त्या केवळ हिंदूंशी संबंधित नसून त्या सर्वव्यापी शक्ती आहेत.’’ तिचे उत्तर ऐकून मी अवाक् झाले. त्या वेळी मला ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी जगभरातील साधक जिवांना कसे निवडून एकत्र आणले आहे’, असे वाटून पुष्कळ कृतज्ञता वाटली.
८. तिची गुणवैशिष्ट्ये अनुभवल्यावर ‘ती दैवी बालिका असून उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आली आहे’, असा विचार येतो.
देवा, ‘तू मला ॲलिसच्या समवेत सेवा करायची संधी दिल्याने मला साधनेचे अनेक पैलू शिकायला मिळाले. माझ्यातही तिच्यासारखे गुण येण्यासाठी मला शिकण्याच्या स्थितीत राहून कृती करता येऊ दे.’
– कु. भाविनी कापडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०२१)
|