गोव्यात श्रीमंत पर्यटक पाहिजेत आणि ‘सनबर्न ‘ई.डी.एम्.’सारखे (इलेक्ट्रॉनिक संगीतावरील नृत्य) महोत्सव झाल्यासच हे शक्य  !  मनोहर आजगावकर, उपमुख्यमंत्री

  • श्रीमंत पर्यटक येऊन राज्यातील पर्यटन व्यवसायाद्वारे महसूल मिळावा यासाठी ‘सनबर्न’सारखे अमली पदार्थांना प्रोत्साहन देणारे, संस्कृतीहीन कार्यक्रम असलेले आणि भावी पिढी नष्ट करणारे कार्यक्रम आयोजित करणे कितपत योग्य ? – संपादक
  • ‘संस्कृतीरक्षण केले, तर ईश्‍वर नक्कीच साहाय्य करेल आणि आर्थिक संकटही टळेल’, असा विश्‍वास का नाही ? – संपादक
मनोहर आजगावकर

पणजी, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यात कोरोना महामारी आटोक्यात आल्यास ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक’ (‘सनबर्न ई.डी.एम्.’) महोत्सव नक्कीच होणार आहे. आम्हाला गोव्यात श्रीमंत पर्यटक पाहिजेत आणि ‘सनबर्न’सारखे महोत्सव झाल्यासच हे शक्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी केले.

‘सनबर्न ई.डी.एम्.’च्या आयोजकांनी २८ ते ३० डिसेंबर २०२१ या काळात वागातोर येथे सनबर्न महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे २४ ऑक्टोबर या दिवशी घोषित केले होते, तसेच ‘सनबर्न ई.डी.एम्.’च्या आयोजकांनी विविध प्रसारमाध्यमांच्या द्वारे महोत्सवाची प्रसिद्धी करण्यासही प्रारंभ केला आहे. यावर स्पष्टीकरण देतांना उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर म्हणाले, ‘‘गोवा शासनाने ‘सनबर्न ई.डी.एम्.’ महोत्सवाला अजूनही अनुमती दिलेली नाही. महोत्सवाच्या आयोजनाविषयी अनुमती घेण्याची धारिका पुढील निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे; मात्र यावर अजून निर्णय झालेला नाही. ‘सनबर्न’चे आयोजक कोणत्या आधारावर महोत्सवाची प्रसिद्धी करत आहेत, हे मला ठाऊक नाही. मी पर्यटन खात्याच्या संचालकांना ‘सनबर्न’च्या आयोजकांना  याविषयी विचारण्यास सांगितले आहे.’’

गोवा ‘अमली पदार्थ’ मुक्त, ‘ई.डी.एम्.’ मुक्त आणि ‘सनबर्न’ मुक्त करा !

प्रतिकात्मक छायाचित्र

वर्ष २०१९ मध्ये हिंदु जनजागृती समितीने ‘सनबर्न’ महोत्सवाविषयी शासनाला निवेदन दिले होते. यामध्ये पुढील सूत्रे मांडली होती; परंतु याची कोणतीही नोंद न घेता ‘सनबर्न’ महोत्सव आयोजित केला गेला.

१. ‘सनबर्न’सारखे ‘ई.डी.एम्.’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्‍चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन झालेली आणि पाश्‍चात्त्य विकृतीच्या आहारी गेलेली शासनाला चालते का ?

२. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. गोमंतकीय संस्कृतीचे रक्षण करण्याच्या दायित्वाचा शासनाला विसर पडला आहे का ?

३. गोवा शासनाने सध्या समुद्रकिनार्‍यावर आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यास बंदी घालण्याचा एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. ‘सनबर्न’ हा महोत्सवही वागातोर या समुद्रकिनार्‍याजवळ होणार. अशा प्रकारच्या ‘ई.डी.एम्.’ महोत्सवात मद्य खुलेआम विकले जाते. शासन स्वतःचाच बंदी आदेश मोडून ‘सनबर्न’सारख्या महोत्सवात मद्यविक्री करण्यास अनुज्ञप्ती कोणत्या आधारावर देणार आहे ?

४. गोव्यात पर्यटनाच्या नावाने ‘ई.डी.एम्.’ कुप्रथेचा शिरकाव झालेला आहे. यामध्ये अमली पदार्थांच्या अतीसेवनाने देहलीच्या नेहा बहुगुणा या २३ वर्षी युवतीचा आणि मुंबईच्या ईशा मंत्री या २७ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला आहे, तसेच अन्य दोघांचा मृत्यू झालेला आहे. या घटनांमुळे देवभूमी गोव्याचे नाव आतंतराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त झाले आहे.

५. ‘ई.डी.एम्.’ महोत्सवाचा वापर अमली पदार्थ व्यावसायिक अधिकाधिक पैसे कमावण्यासाठी करत असतात. गोवा राज्यात अमली पदार्थांचे जाळे आता समुद्रकिनारपट्टीवरून गावागावांत पोचल्याने पालकवर्ग, लोकप्रतिनिधी आदींनी याविषयी अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे. गोवा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी वल्गना केल्या जात आहेत. पर्यटनाच्या नावाने ‘ई.डी.एम्.’ला प्रोत्साहन देऊन शासन अमली पदार्थ व्यवसायाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देत आहे. ‘ई.डी.एम्.’सारख्या महोत्सवात ‘ट्रान्स म्युझिक’ ऐकतांना ‘मूड’ (उत्साह) वृद्धींगत करण्यासाठी ‘एम्डीएम्ए’ किंवा ‘मॉली’ यांसारख्या अमली पदार्थांचे काही जण सेवन करत असतात, हे ‘ई.डी.एम्.’चे आयोजकही मान्य करतात. ‘ई.डी.एम्.’मध्ये ‘एम्डीएम्ए’ या अमली पदार्थाचे सेवन होते, ही गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञात आहे. अमली पदार्थांचे सेवन होणार्‍या ‘ई.डी.एम्.’ला शासन प्रोत्साहन का देते ?