प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपावरून समीर वानखेडे यांची विभागीय चौकशी होणार !

डावीकडून प्रभाकर साईल, आर्यन खान आणि समीर वानखेडे

मुंबई – अमली पदार्थविरोधी पथकाने ‘कॉर्डेलिया क्रूझ’वर केलेल्या कारवाईतील पंच असलेले प्रभारक साईल यांनी आर्यन खान यांच्या सुटकेसाठी अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांची अमली पदार्थविरोधी पथकाचे उपमहानिर्देशक ज्ञानेश्वर सिंह यांच्याद्वारे चौकशी केली जाणार आहे.

प्रभाकर साईल हे ‘कॉर्डेलिया क्रूझ’ कारवाईतील साक्षीदार किरण गोसावी यांचे अंगरक्षक आहेत. किरण गोसावी यांनी शाहरूख खान यांच्याकडे २८ कोटी रुपयांची मागणी केली असून त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा आरोप प्रभाकर साईल यांनी केला आहे. या प्रकरणात प्रभाकर साईल यांचीही चौकशी होणार आहे. समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी त्यांना देहली येथे बोलावण्याची शक्यता आहे. या चौकशीमुळे समीर वानखेडे यांच्याकडे ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील कारवाईचे अन्वेषण काढून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समीर वानखेडे यांची न्यायालयात धाव !

स्वत:वरील आरोपाविषयी समीर वानखेडे यांनी विशेष सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला सामोरा जायला सिद्ध आहे. काही जणांकडून मला वैयक्तिक लक्ष्य केले जात आहे. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर सतत आरोप केले जात आहेत. माझी काही खासगी छायाचित्रे प्रसारित केली जात आहेत. न्यायालयात माहिती देतांना समीर वानखेडे यांनी माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचा वागलेलो नसल्याचे म्हटले आहे.