उत्तराखंडमध्ये पूरस्थितीमुळे ४६ जणांचा मृत्यू, तर अनेक जण बेपत्ता 

उत्तराखंड येथील पूर परिस्तिथी 

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली आहे. राज्यात आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. नैनितालसह अनेक भागांत लोक बेपत्ता असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नैनिताल जिल्ह्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अजूनही ११ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच १२ लोक घायाळ झाले आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. रुद्रप्रयाग-केदारनाथ राष्ट्रीय महामार्ग १०७ बंद ठेवण्यात आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी म्हटले की, या आपत्तीमध्ये ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि ज्यांच्या घरांची हानी झाली आहे, त्यांना १ लाख ९ सहस्र रुपये दिले जातील. ज्यांची जनावरे घायाळ किंवा मृत झाली आहेत, त्यांनाही साहाय्य केले जाईल.