चंद्रपूर येथे शिक्षिकेच्या विनयभंगाप्रकरणी बीआयटी अभियांत्रिकीच्या २ प्राचार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

प्राचार्यांनी शिक्षिकेचा विनयभंग करणे म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्यासारखेच होय ! अशा वासनांधांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक 

चंद्रपूर – महिला शिक्षिकेचा विनयभंग करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्ह्यातील बल्लारपूर येथील ‘बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (‘बीआयटी’च्या) २ प्राचार्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात १७ ऑक्टोबर या दिवशी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अभियांत्रिकीचे प्राचार्य रजनीकांत मिश्रा आणि ‘पॉलिटेक्निक’चे प्राचार्य श्रीकांत गोजे (रा. बल्लारपूर) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना ६ ऑक्टोबर या दिवशी घडली.

दोन्ही प्राचार्यांनी महिला शिक्षिकेवर ‘विद्यार्थ्यांना आमच्या विरोधात भडकवतात’, असा आरोप करून त्यांच्याशी वाद घातला. त्या वेळी ‘दोघांनी माझा हात ओढून विनयभंग केला’, असा आरोप शिक्षिकेने केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार न देण्याची समज महाविद्यालयातील इतर कर्मचार्‍यांनी शिक्षिकेला देऊन त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यात आले. त्यानंतरही हे दोन्ही प्राचार्य शिक्षिकेला अश्लील संदेश पाठवून जिवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे शिक्षिकेने दोन्ही प्राचार्यांविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.