चित्त शुद्ध झाले, तर आपल्याला ईश्वराचे दर्शन होईल ! – पू. अनंत आठवले

ग्रंथ प्रकाशनाच्या वेळी पू. अनंत आठवले यांनी व्यक्त केलेले मनोगत !

पू. अनंत आठवले

ब्रह्मत्व प्राप्त करण्यासाठी स्वतःला शुद्ध करणे आवश्यक !

उपनिषदांमध्ये सांगितले आहे, ‘यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ।’, म्हणजे ब्रह्माला प्राप्त करण्यासाठी वाणी आणि मन यांनी अयशस्वी प्रयत्न केला अन् परत आले. याचा अर्थ आहे की, वाणी आणि मन यांच्याद्वारे ब्रह्मत्व प्राप्त होत नाही. त्याला प्राप्त करण्यासाठी स्वत:ला शुद्ध केले पाहिजे. आपले स्वभावदोष संपूर्णतः घालवले पाहिजेत. एकदा चित्तशुद्धी झाली की, तुम्हाला कोणतेही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. ईश्वर स्वत:च तुम्हाला त्याचे दर्शन देईल. ईश्वर आपल्यामध्येच आत्मस्वरूपात आहे; पण आपल्यातील स्वभावदोषांमुळे तो झाकोळला गेला आहे. ईश्वर स्वयंप्रकाशी आहे. एकदा स्वभावदोष दूर केले की, आपल्याला त्याचा बोध होईल.

ईश्वर किंवा ब्रह्म जाणून घेण्यासाठी मनन-चिंतन करावे लागते !

साधना करण्यासाठी किंवा ब्रह्मप्राप्तीसाठी मी कधीच काही केले नाही. प्रारंभी मला ‘ईश्वर आहे का ?’ याविषयी जिज्ञासा होती. त्यानंतर ‘ईश्वर काय आहे’, ‘ब्रह्म काय आहे’, हे जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यामुळे मी अभ्यास करणे चालू केले. अनेक ग्रंथ वाचावे लागले. शब्दांचा अर्थ समजतो किंवा तो शब्दकोषांमध्येही मिळून जातो; परंतु त्याचे सार कळत नाही. त्यासाठी चिंतन-मनन करावे लागते. माझे सर्व आयुष्य त्यातच गेले.

बुद्धीने निश्चय केल्यावर व्यक्तीकडून आपोआप तसेच आचरण होते !

‘उपनिषदे’, ‘श्रीमद्भगवद्गीता’, ‘योगवासिष्ठ’, तसेच अनेक ग्रंथांमधील ज्ञान वाचता वाचता जेव्हा मनाला त्यातील मर्म समजते, तेव्हा बुद्धी निश्चय करते की, हेच बरोबर आहे. तेव्हा त्याचा जिवात्म्यामध्ये बोध होतो. जेव्हा एखादी गोष्ट निश्चितपणे तुमच्या लक्षात येते, तेव्हा तुमचे आचरण त्याप्रमाणे होणारच ना ? त्यानंतर अन्य साधनांची आवश्यकताही वाटत नाही. ‘चोरी करणे चुकीचे आहे’, हे ठाऊक असतांनाही चोर चोरी का करतात ? तुम्ही आणि मी चोरी केली नाही; कारण ‘ते चुकीचे आहे’, हे बुद्धीला निश्चितपणे ठाऊक आहे. अशा पद्धतीने मला अन्य दोषांविषयी लक्षात येते. ‘जे निश्चितपणे चुकीचे आहे’, त्या संदर्भात बुद्धी निश्चय करते. हे मनावर अंकित झाल्यामुळे जीवात्म्याला बोध होतो आणि व्यक्तीकडून आपोआप तसेच आचरण होते. हळूहळू त्याची सहजावस्था बनते. मी केवळ जिज्ञासेने अभ्यास केला आहे, दुसरे काहीच केले नाही.

ज्ञान चैतन्याचा अंश आणि स्वरूप आहे !

मी कोणतीच साधना केली नाही. कोणतेही जप-तप केले नाही. भगवंताच्या कृपेने आपोआप ज्ञान होते. मी एका ग्रंथामध्ये लिहिले आहे, मुंडकोपनिषदमध्ये आहे, ‘ज्ञानप्रसादेन विशुद्धसत्त्वः ततस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमानः ।’, म्हणजे ज्ञानाच्या कृपेने चित्त शुद्ध होऊन ते एकाग्रचित्त होऊन आत्मस्वरूपाचा आत्मसाक्षात्कार होतो. ही ज्ञानाची कृपा आहे. ज्ञान म्हणजे चैतन्य. ज्ञान चैतन्याचा अंश आणि चैतन्याचे स्वरूप आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)