‘मनुष्य जन्माचे सार्थक ईश्वरप्राप्ती करण्यात आहे’, असे सांगणारे आणि त्यासाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा विहंगम साधनामार्ग दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. मायेत अडकल्याने मनुष्याला ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाचा विसर पडत असणे

‘मनुष्यजन्म ही सर्व भोग संपवून ईश्वरप्राप्ती करून घेण्यासाठी देवाने मानवाला दिलेली अमूल्य संधी आहे. सध्याच्या काळात मनुष्याचा आयुष्यकाल अल्प झाला आहे. सर्व जीव-जंतूंमध्ये केवळ मनुष्यप्राणी एकमेव आहे, जो त्याच्या बुद्धीचा योग्य वापर करून, त्याला हवे ते साध्य करू शकतो; पण या ‘मनुष्यजन्मात नेमके काय साध्य करायचे ?’, हेच त्याला ज्ञात नसल्याने तो ईश्वरप्राप्तीसाठी करायचे प्रयत्नच विसरला आहे. मायेत अडकल्यामुळे त्याला ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाचा विसर पडला आहे.

२. आयुष्यमान अल्प आणि आपत्काळाची गती अधिक असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्याविषयी गतीने शिकवत असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आज साधकांना ‘या मनुष्य देहाचे, मनुष्य जन्माचे सार्थक कसे करून घ्यायचे ?’, याचे महत्त्व लक्षात आले आहे. आयुष्यमान अल्प आणि आपत्काळाची गती अधिक असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना ‘साधना करून या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त कसे करून घेता येईल ?’, हेही गतीने शिकवत आहेत. मनुष्य जन्म, म्हणजे देवाने आपल्याला दिलेले वरदान आहे. मनुष्य देहाच्या माध्यमातून बुद्धीचा योग्य उपयोग करून साधना केली, तरच मृत्यूनंतरचा प्रवास आनंदमय होईल. ‘गरुड पुराणात मनुष्याच्या कर्मानुसार त्याला मृत्यूनंतर पुढे कशी गती मिळते’, याचे सविस्तर वर्णन आहे. भूलोकात असतांनाच तीव्र साधना केली, तर मृत्यूनंतरच्या प्रवासात कशात अडकणे होणार नाही. ते जग अतीसूक्ष्म आहे.

३. गुरुकृपायोगानुसार साधना सांगून संपूर्ण जगतात एक आध्यात्मिक क्रांती घडवून आणणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘मनुष्याच्या जन्माचे सार्थक हे केवळ ईश्वरप्राप्ती करून घेण्यातच आहे’, हे जाणले आहे आणि ‘ते साध्य करण्यासाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना करणे’, हा एकमेव पर्याय आहे’, हेही त्यांनी सांगितले आहे. या कलियुगात परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ सांगून संपूर्ण जगतात एक आध्यात्मिक क्रांतीच घडवून आणली आहे.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२०)