प्लास्टिकच्या पिशव्या वापरणार्‍यांकडून ३ सहस्र रुपये दंड वसूल

कणकवली नगरपंचायतीची कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

कणकवली – शहर नगरपंचायतीच्या वतीने आठवडा बाजाराच्या दिवशी कणकवली नगरपंचायतीकडून करण्यात आलेल्या कारवाईत १२ विक्रेत्यांकडून ३ सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला. ७५ मायक्रॉनपेक्षा अल्प जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये रस्त्याच्या लगत बसलेले १० विक्रेते, बाजारपेठेतील एक हॉटेल आणि अन्य एक दुकानदार, अशा एकूण १२ जणांवर कारवाई करण्यात आली.

कणकवली नगरपंचायतीने गेले काही दिवस ही कारवाई थांबवली होती. त्यामुळे विविध प्रकारच्या व्यावसायिकांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगरपंचायतीने ही कारवाई केली. या वेळी प्लास्टिकच्या २० किलोहून अधिक पिशव्या कह्यात घेण्यात आल्या.