नाशिक येथील श्री कालिकादेवीच्या दर्शनासाठी १०० रुपये शुल्क आकारणार !

  • श्री कालिकादेवी मंदिराच्या विश्वस्तांचा धर्मद्रोही निर्णय !

  • श्री कालिकादेवी मंदिरातील सशुल्क दर्शनास भाविकांचा विरोध !

  • प्रसाद, फुले आणि नारळ यांवर बंदी !

  • देवाच्या दर्शनासाठी शुल्क आकारून त्याच्या भक्तांना लुटले जाणे, हे संतापजनक आहे !  हिंदूंनी आता तरी निद्रिस्तपणा सोडून या मनमानीपणाच्या विरुद्ध संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवावा ! – संपादक 
  • हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याने त्यांना मंदिरांमध्ये कोणते नियम लावावेत, हे लक्षात येत नाही, असेच म्हणावे लागेल ! – संपादक 
  • मंदिरांचे विश्वस्त हे साधना करणारे असायला हवेत. हिंदु राष्ट्रात मंदिरे भक्तांच्या कह्यात असतील. त्यामुळे मंदिरांमधील सर्व निर्णय धर्मपूरक असतील ! – संपादक 

नाशिक – येत्या नवरात्रोत्सवात येथील ग्रामदेवता श्री कालिकादेवी मंदिराच्या विश्वस्तांनी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकडून १०० रुपये शुल्क आकारण्याचा धर्मद्रोही निर्णय घेतला आहे. हे शुल्क ‘टोकन’ (बिल्ला) स्वरूपात असणार आहे. मंदिराच्या विश्वस्तांकडून टोकन घेणे बंधनकारक केले आहे. टोकन घेतल्याविना भाविकांना देवीचे दर्शन होणार नाही. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील मंदिरे बंद होती; मात्र राज्यशासनाने नुकतीच मंदिरे उघडण्याची अनुमती दिली आहे.

श्री कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील म्हणाले, ‘‘हे टोकन भाविकांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने मिळणार आहे. यासाठी विशिष्ट ‘सॉफ्टवेअर’ (संगणकातील महत्त्वाचा तांत्रिक भाग) मंदिराकडून सिद्ध करण्यात आले आहे. कोरोनामुळे पोलीस प्रशासनाशी चर्चा करून, तसेच शासनाच्या नियमाधीन राहून आम्ही आमच्या पद्धतीने टोकनपद्धत चालू केली आहे. टोकनसाठी सिद्ध करण्यात येणार्‍या ‘सॉफ्टवेअर’साठी व्यय आहे. मंदिरात सुरक्षा कर्मचारी नियुक्त करणे, स्वच्छता आणि औषध फवारणी करणे, या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. मंदिर २४ घंटे उघडे असेल. एका घंट्यात ६० भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. प्रसाद, फुले आणि नारळ हे देवीला अर्पण करता येणार नाही.’’

श्री कालिकादेवी मंदिराच्या विश्वस्तांनी वर्ष २०१८ मध्येही सशुल्क दर्शनपद्धत चालू केली होती. त्याला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता; मात्र तरीही विश्वस्त मंडळ स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिले होते. आताही १०० रुपये टोकन पद्धतीच्या निर्णयाला भाविकांकडून विरोध होत आहे.