‘ई-चलना’ची वसुली ‘ई-चलना’वरच !

नोंद 

दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी पोलिसांनी इच्छाशक्ती न दाखवणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे शहरातील चौकाचौकांत लावलेल्या ‘सीसीटीव्ही’च्या साहाय्याने विनाहेल्मेट गाडी चालवणे, ‘झेब्रा क्रॉसिंग’वर वाहन उभे करणे, ‘सिग्नल’ तोडणे अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर  ३१ जुलैपर्यंत ‘ई-चलना’च्या माध्यमातून तब्बल ७७ कोटी ५२ लाख ५० सहस्र ५०० रुपयांचा दंड आकारला आहे. त्यांपैकी प्रत्यक्षात केवळ १० कोटी ४५ लाख ९८ सहस्र १०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. ही आकडेवारी केवळ एका पुणे शहराची आहे. संपूर्ण देशाचा विचार केल्यास ही आकडेवारी किती मोठी असेल, याचा विचारच आपण करू शकत नाही, तसेच त्यातील केवळ १० कोटी रुपयेच वसूल झाले आहेत, हे गंभीर आणि दुर्दैवी आहे.

दंडाची रक्कम वसूल न होण्यातील मुख्य कारण म्हणजे दंडाची रक्कम संबंधित वाहनचालकांना भ्रमणभाषवर संदेशाद्वारे पाठवल्यानंतर ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पोलिसांनी दंड आकारणी केली, तरी तो वसूल होण्याचे प्रमाण प्रतिदिन न्यून होत आहे. देशाला शिस्त लागली पाहिजे; म्हणून नवनवीन कार्यपद्धती आणि तंत्रज्ञान विकसित केली जात आहे. त्यातीलच दंड आकारणीचे ‘ई-चलन’ हे एक तंत्रज्ञान म्हणावे लागेल. असे असले, तरी याचा लाभ दंड वसुलीसाठी होत नाही, हे वरील आकडेवारीवरून सिद्ध झाले. येथे लक्षात घेण्याचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे केवळ कार्यपद्धती आणि तंत्रज्ञान विकसित करून देशाला शिस्त लागणार नाही, तर नीतीवान समाज निर्माण केल्यासच देशाला शिस्त लागेल. सध्या दंड भरण्याचा प्रामाणिकपणा जनतेमध्ये नाही. तो तत्परतेने वसूल करावा, ही इच्छाशक्ती प्रशासनाकडे नाही. त्यामुळे दंड आकारणी ‘ई-चलना’वरच आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षांनंतर एकेकाळी महासत्ता असणार्‍या भारतामध्ये अप्रामाणिक जनता असणे, हे सर्वपक्षीय शानसकर्त्यांच्या नाकर्तेपणाचे फलितच आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? धर्मनिरपेक्ष शासनप्रणालीचा उदोउदो करून देशातील जनतेची मानसिकता किती भ्रष्ट झाली आहे, हे वरील उदाहरणावरून अधोरेखित होते. देशाचा खरा विकास नीतीवान जनता निर्माण होणे, हाच आहे. यासाठी समाजाला धर्मशिक्षण दिल्यास अयोग्य कर्माचे फळ भोगावे लागते, हे समजल्यामुळे समाज आपोआपच शिस्तीने वागायला लागेल. अशा समाजासाठी दंडाची आवश्यकताच भासणार नाही. यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा एकच उपाय आहे.

– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.