डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांचे दुसर्‍यांदा निलंबन !

विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह शब्दांत संवाद साधल्याचे प्रकरण

एकदा निलंबित केल्यानंतर संजय शिंदे यांच्यात सुधारणा झाली नाही, त्यामुळे त्यांना पुन्हा निलंबित करण्याऐवजी त्यांच्यावर बडतर्फाची कारवाई केली पाहिजे. असे अधिकारी विद्यापिठाला कलंकच आहेत, तसेच जनसंपर्क अधिकारी झाल्यापासून ते किती विद्यार्थिनींशी उद्धट पद्धतीने वागले असतील, याचे अन्वेषण करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे ! – संपादक

संजय शिंदे

संभाजीनगर – विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह शब्दांत संवाद साधल्याप्रकरणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना १८ सप्टेंबर या दिवशी दुसर्‍यांदा निलंबित करण्यात आले आहे. याला विद्यापिठाचे उपकुलसचिव (आस्थापना) गणेश मंझा यांनी दुजोरा दिला आहे. यापूर्वी तत्कालीन कुलगुरु प्रा. डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात संजय शिंदे यांना निलंबित करून त्यांना धाराशिव उपकेंद्रात पाठवण्यात आले होते.

‘संजय शिंदे यांनी रात्रीच्या वेळी आक्षेपार्ह शब्दांत संवाद साधला आहे’, अशी तक्रार एका विद्यार्थिनीने १ आठवड्यापूर्वी पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. ‘शिंदे यांना बडतर्फ करा, निलंबित करा’, अशी मागणी करत भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि अभाविप आदी संघटना आक्रमक झाल्या होत्या. १७ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येथे आलेले असतांना या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या एका विद्यार्थिनीने त्यांना निवेदन देऊन ‘संजय शिंदे यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी केली होती. यानंतर १८ सप्टेंबरच्या सायंकाळी विद्यापिठाने संजय शिंदे यांना निलंबित केले होते.