१९ डिसेंबरपर्यंत गोवा राज्य सर्व गोष्टींत आत्मनिर्भर होणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा शासनाच्या ‘सरकार तुमच्या दारी’ योजनेचा शुभारंभ

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

म्हापसा, १९ सप्टेंबर (वार्ता.) – गोवा शासन केंद्राच्या साहाय्याने राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. १९ डिसेंबर २०२१ पर्यंत म्हणजेच गोवा मुक्तीच्या ६० व्या वर्षी राज्य सर्व गोष्टींत आत्मनिर्भर बनवण्याचा निर्धार शासनाने केला आहे आणि शासनाने या दृष्टीने प्रयत्न चालवले आहेत. गोमंतकियांनी यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कोलवाळ येथे ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्य सचिव परिमल रॉय, आमदार निळकंठ हळर्णकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘१९ डिसेंबर २०२० या दिवशी ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा कार्यक्रम चालू करण्यात आला होता; परंतु कोरोना महामारीमुळे या उपक्रमाच्या अंतर्गत लोकांपर्यंत पोचता आले नाही. गोवा मुक्तीची ६० वर्षे साजरी करतांना लोकांपर्यंत जाण्याची संधी आलेली आहे. राज्यात विविध खात्यांच्या १५२ हून अधिक शासकीय योजना आहेत. त्यांतील काही अपवाद वगळता बहुतेक योजनांची लोकांना माहिती नाही. प्रत्येक योजना पात्र व्यक्तीच्या घरापर्यंत पोचावी, यासाठी शासन दक्षता घेणार आहे. शासनाच्या विविध योजना ‘पोर्टल’वर (संकेतस्थळावर) उपलब्ध आहेत. प्रत्येक पंचायतीमध्ये ‘स्वयंपूर्ण मित्र’ उपलब्ध करण्यात आला आहे. सरकारच्या १२८ सेवा ‘ऑनलाईन’ स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लोकांसाठी तज्ञ आधुनिक वैद्य उपलब्ध करणे, तसेच ‘मॉडेल करियर सेंटर’मधून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, यावर शासनाने भर दिला आहे. सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचवून लोकांनी त्यांचा लाभ घेण्यासाठी ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. गोव्यातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगारावर भर दिला पाहिजे.’’