(म्हणे) ‘जगातील सर्व राष्ट्रांनी तालिबानला घटनात्मक सरकार स्थापण्यासाठी आणि त्याने दिलेला शब्द पाळण्यासाठी वेळ दिला पाहिजे !’ – इम्रान खान

आतंकवादी तालिबानचे समर्थन करणार्‍या पाकला जगात एकाकी पाडण्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक

इस्लामाबाद – तालिबानला एखादी गोष्ट करण्यासाठी बलपूर्वक सांगण्यापेक्षा आताची परिस्थिती हाताळण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. अफगाणिस्तानवर बाहेरून नियंत्रण राखता येईल, हे दिवास्वप्न आहे. तालिबानला आपण योग्य दिशेने नेले पाहिजे. जगातील सर्व देशांनी तालिबानला घटनात्मक सरकार स्थापण्यासाठी आणि त्याने दिलेला शब्द पाळण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी करून अकलेचे तारे तोडले. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

खान पुढे म्हणाले की, संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचे नियंत्रण आहे. सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याच्या दिशेने त्याची वाटचाल होत असेल आणि त्यांच्यातील मतभेद मिटले, तर अफगाणिस्तानमध्ये पुढील ४० वर्षे शांतता नांदेल. तथापि काही काही विपरीत घडलेच, तर अफगाणिस्तान पुन्हा आतंकवादाची भूमी होण्याचा धोका राहील. याचीच पाकिस्तानला चिंता वाटते. (एका आतंकवादी राष्ट्राने दुसर्‍या आतंकवादी राष्ट्राविषयी चिंता व्यक्त करणे केवळ हास्यापस्द ! – संपादक) अफगाणिस्तानमध्ये स्थिरता आणि शांतता राखायची असेल, तर तालिबानशी देवाणघेवाण करण्याशिवाय पर्याय नाही.