पनवेल येथे विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे जनआंदोलन !
पनवेल – ‘शिक्षकांना गुरु मानतात; पण राज्य सरकार शिक्षकांच्या मागण्यांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून गुरूंचा अनादर करत आहे’, अशी टीका शिक्षकांनी येथे करण्यात आलेल्या जनआंदोलनात राज्य सरकारवर केली. ज्ञानदानासाठी आयुष्य व्यय केले, त्या शिक्षकांना त्यांच्या न्यायिक हक्कापासून वंचित ठेवणार्या सरकारचा शिक्षकांनी निषेध केला. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भाजप उत्तर रायगड शिक्षक सेल’च्या वतीने ८ सप्टेंबर या दिवशी कोरोनाविषयक नियमांचे पालन करत जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि निवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, शिक्षकांचे वेतन अन् निवृत्ती वेतन वेळेवर द्यावे, वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी यांचा लाभ मिळावा, वैद्यकीय देयक मिळावे, केंद्र सरकारप्रमाणे डी.ए. (महागाई भत्ता) तात्काळ देण्यात यावा, शिक्षकांच्या रिक्त जागा लवकर भराव्यात, पी.एफ्.च्या (भविष्य निर्वाह निधी) पावत्या वेळेवर मिळत नाहीत ते वेळेवर द्यावे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे, शाळा लवकरात लवकर चालू कराव्यात, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.