गणरायाच्या आगमनाची सिद्धता सात्त्विक वस्तूंचा वापर करून करा !
ज्या देवतेच्या आगमनाच्या वार्तेनेच नवचैतन्य आणि मांगल्य निर्माण होते, तसेच ज्या देवतेची प्रत्येक भाविक आतुरतेने वाट पहात असतो, अशा गणरायाचे आगमन १० सप्टेंबर या दिवशी होत आहे. महाराष्ट्रात विशेष करून गणेशोत्सवाला एक आगळेवेगळे स्थान आहे. हा उत्सव सर्व हिंदू संघटितपणे आणि आनंदाने साजरा करतात; परंतु गेली २ वर्षे कोरोनाच्या संकटामुळे सण आणि उत्सव साजरे करण्यावर बंधने आली आहेत. असे असले तरी प्रत्येक हिंदु सर्व निर्बंध पाळून सण शास्त्रानुसार कसे साजरे करता येतील, असेच पहातो. आज गणरायाच्या आगमनाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात, हे पाहूया.
सात्त्विक वस्तूंची आरास करा !
घरामध्ये गणरायाचे आगमन होणार म्हणून सजावट करतांना थर्माकोल, विजेच्या माळा, तसेच असात्त्विक वस्तू वापरल्या जातात. त्या न वापरता केळीचे खुंट, तसेच सात्त्विक वस्तू वापरून गणरायाची आरास करायला हवी. दुर्वा, जास्वंदीचे लाल फूल, तसेच आघाडा यांच्यामध्ये श्री गणेशतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता आहे. या संदर्भात सनातन संस्थेने संशोधन केलेले असून श्री गणेशमूर्तीला दुर्वा, जास्वंदाचे लाल फूल वाहिल्यानंतर मूर्तीतील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचा लाभ पूजकालाही होतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे श्री गणेशाची पूजा करतांना दुर्वा, जास्वंदीचे लाल फूल यांचा वापर आवश्य करावा.
धर्मशास्त्रानुसार शाडूमातीचीच मूर्ती बसवा !
धर्मशास्त्रात ‘श्री गणेशमूर्ती ही शाडूमाती वा चिकणमाती यांपासून बनवलेली आणि नैसर्गिक रंगाने रंगवलेली असावी’, असे सांगितले आहे. त्यामुळे घरगुती, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही शाडूमातीची मूर्ती बसवावी. अलीकडील काही वर्षांत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली बीचे रोपण केलेली श्री गणेशमूर्ती, तसेच अन्य पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती बसवण्याची चुकीची प्रथा पडली आहे. भाविकांनी याला बळी न पडता शास्त्र समजून घेऊन शाडूमातीचीच मूर्ती बसवावी.
धर्माचरणास प्राधान्य देऊन उत्सव साजरा करणे आवश्यक !
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कार्यक्रमांचे आयोजन करतांना केवळ विद्युत् रोषणाई अथवा अन्य गोष्टींवर खर्च न करता राष्ट्र आणि धर्म यांना पूरक कार्यक्रमांचे आयोजन करावे. श्री गणेशाची पूजा भावपूर्ण करावी, तसेच आरतीही चित्रपटातील गाण्यांच्या चालीवर बसवलेली न म्हणता एका तालात आणि भावपूर्ण म्हणावी. गणेशभक्तांनी शास्त्र समजून घेऊन धर्माचरणास प्राधान्य देऊन उत्सव साजरा केल्यास १ सहस्र पटीने कार्यरत असलेले श्री गणेशतत्त्व सर्व संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देईल, तसेच श्री गणेशाचा आशीर्वादही प्राप्त होईल !
– श्री. अजय केळकर, सांगली