काढून टाकलेल्या २० आरोग्यसेविकांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी
सिंधुदुर्ग – आरोग्य विभागाने कामावरून काढून टाकलेल्या २० आरोग्यसेविकांना पुन्हा तात्काळ सेवेत घ्यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व कर्मचार्यांनी ८ सप्टेंबरला काम बंद करून जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघ या संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ‘मागण्या मान्य न झाल्यास श्री गणेशचतुर्थीनंतर बेमुदत ‘कामबंद’ आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी देण्यात आली आहे.
वर्ष २००५ पासून चालू झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यात ५९७ आरोग्यसेविका कर्मचारी जिल्ह्यात सेवा देत आहेत. अल्प मानधनात चालू असलेली त्यांची सेवा कोरोना महामारीच्या काळातही चालूच होती. असे असतांना केवळ कोरोना महामारीच्या काळात प्राथमिक आरोग्य उपक्रेंदात प्रसुत्या झाल्या नसल्याचे, तसेच मानधन देण्यासाठी केंद्रशासनाकडे निधी नसल्याचे कारण देत २० आरोग्यसेविकांना सेवेतून कमी करण्यात आले. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत कर्मचार्यांची आवश्यकता असतांना वर्ष २००५ पासून कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना काढल्याने अप्रसन्नता व्यक्त होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघाने याच्या विरोधात आवाज उठवला असून कर्मचार्यांना कामावर घेण्यासाठी तूर्तास एक दिवस ‘कामबंद’ आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.