अकोला – जिल्ह्यात गेल्या २ दिवसांत झालेल्या अतीवृष्टीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला. बार्शीटाकळी तालुक्यातील नदीत वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसर्याचा शोध चालू आहे. सतत पडणार्या पावसामुळे नदी आणि नाले यांना पूर आला आहे. तलावांमध्येही पुष्कळ पाणी साठले आहे. अकोला तालुक्यातील आगर येथील मनोज खाडे यांचा तलावात बुडून, तर कानशिवणी येथील सागर कावरे आणि गोपाल कांबे हे बैलाला अंघोळ घालत असतांना नदीच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यांपैकी गोपाल कांबे यांचा मृतदेह जांब येथे सापडला आहे. सागर कावरे यांचा मृतदेह शोधण्याचे काम चालू आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील एरंडा येथे ६ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या पावसामुळे भिंत कोसळून श्यामराव पवार यांचा मृत्यू झाला. तेल्हारा तालुक्यातील खेलसटवाजी येथील येनुद्दीन फखरूद्दीन यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनांमुळे संबंधित गावांत शोककळा पसरली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क रहाण्याची सूचना देण्यात आली आहे.
जालना येथे मुसळधार पावसामुळे तिघे वाहून गेले, तर दोघांना वाचवण्यात यश !
जालना – जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील बाह्मणी-वालखेट गावात मुसळधार पाऊस पडल्यामुळे गावाजवळील पुलावरून ३ जण पाण्यात बुडाले. यामध्ये २ जणांना वाचवण्यात यश आले असून १ जण बेपत्ता आहे. राजेंद्र खालापुरे, आसाराम खालापुरे आणि लखन कांबळे हे रात्री परतूरहून बाह्मणी गावाकडे जात असतांना ही घटना घडली. आसाराम खालापुरे बेपत्ता असून त्यांचा शोध चालू आहे. दिवसभर संततधार पावसामुळे बाह्मणी गावाजवळील पुलावरून पाणी वहात असल्याने रस्ता बंद झाला आहे. रात्री पुलावरून पाणी वहात असल्याने तिघांनी एकमेकांना धरून पूल ओलांडण्याचा निर्णय घेतला. या वेळी आसाराम खालापुरे यांचा पाय घसरल्याने तिघेही जण पाण्यात पडून वाहून गेले. यातील २ जणांना वाचवण्यात गावकर्यांना यश आले.