सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होणार !

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळाचे (सिंधुदुर्ग विमानतळाचे) उद्घाटन यापूर्वी ७ ऑक्टोबरला होणार असल्याचे घोषित करण्यात आले होते; मात्र शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे या दोघांनी स्वतंत्रपणे विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विमानतळाच्या श्रेयवादावरून शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

श्रेयवादावरून यापूर्वीही या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. त्या वेळी तत्कालीन राज्यमंत्री आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विमानातून श्री गणेशाची मूर्ती आणली होती; मात्र त्यानंतर विमानतळ चालू झाले नाही. त्यानंतर उद्घाटनाच्या दिवसावरून वाद होत होते. आता पुन्हा एकदा विमानतळाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि केंद्रीय मंत्री राणे यांच्यात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेने उद्घाटनाचा दिवस घोषित केल्यानंतर केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, ‘शिवसेनेने कोकणात कोणताच प्रकल्प आणलेला नाही. त्यामुळे विमानतळाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. विमानतळ आम्ही आणला आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हेच करतील. विमानतळ हा केंद्राचा विषय आहे.’

याविषयी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, ‘चिपी विमानतळाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई ९ ऑक्टोबरला करणार आहेत. त्यामुळे या विमानतळाचे उद्घाटन करण्याचे धाडस नारायण राणे यांनी करू नये.’