पू. बांद्रे महाराजांचे ज्ञान प्रसाराचे अपूर्ण कार्य ग्रंथरूपाने समाजापर्यंत पोचवूया ! – दत्त उपासक श्री. संतोष महाराज वनगे, पातेपिलवली

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज लिखित आणि सनातन संस्था प्रकाशित ‘सुख-दुःखाचे विवेचन आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांनुसार आचरण’ या ग्रंथाचे निवळी (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथे भावपूर्ण वातावरणात प्रकाशन

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज लिखित आणि सनातन संस्था प्रकाशित ग्रंथाचे मुखपृष्ठ

चिपळूण, ८ सप्टेंबर (वार्ता.) – पूज्य बांद्रे महाराजांनी तालुक्यातील निवळी या गावी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची उभारणी केली आणि अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू केले. स्वत:च्या मधुर वाणीने समाजाला भक्ती कशी करावी ? स्वत:चे आचरण कसे असावे ? याविषयी प्रवचनाद्वारे समाजप्रबोधन केले. ईश्वराकडून त्यांना मिळत असलेले ज्ञान ते लिहून ठेवत; मात्र ‘या लिखाणाचे पुढे काय होणार ?’, याची त्यांना चिंता होती. हे ते माझ्याकडे बोलून दाखवत. यावर ‘याची चिंता करू नका. ईश्वराने दिलेले ज्ञान आहे, ते योग्य ठिकाणी जाईल’, असे मी त्यांना सांगायचो. ईश्वरी नियोजनाप्रमाणे सनातन संस्थेच्या माध्यमातून ग्रंथाचे संकलन झाले. ‘शेवटचा दिस गोड व्हावा’, अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे आज पूज्य बांद्रे महाराजांच्या निधनानंतरच्या बाराव्या दिवशी (५ सप्टेंबर २०२१ या दिवशी) निवळी गावात त्यांच्या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. भगवंताने दिलेले हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचावे, अशी त्यांची तळमळ होती. आता आपण सर्वांनी त्यांचे ज्ञान प्रसाराचे अपूर्ण कार्य पुढे घेऊन जायचे आहे. ग्रंथरूपाने प्राप्त झालेले त्यांचे विचार आपण समाजापर्यंत पोचवायला हवे, असे आवाहन पातेपिलवली (तालुका चिपळूण) येथील प.पू. तुकाराम महाराज वनगे यांचे चिरंजीव आणि उत्तराधिकारी दत्त उपासक श्री. संतोष महाराज वनगे यांनी केले. पूज्य बांद्रे महाराज लिखित आणि सनातन संस्था प्रकाशित ‘सुख-दुःखाचे विवेचन आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांनुसार आचरण’ या ग्रंथाचे प्रकाशन श्री. संतोष महाराज वनगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी कोंडमळा (तालुका चिपळूण) येथील ह.भ.प. शांताराम महाराज कानसे; हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुरेश शिंदे आणि सुनील गांधी; सनातन संस्थेचे सर्वश्री ज्ञानदेव पाटील अन् महेश कात्रे उपस्थित होते. हा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात झाला. या वेळी शिष्य, भक्तगण आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केली.

डावीकडून ह.भ.प. शांताराम महाराज कानसे, दत्त उपासक श्री. संतोष महाराज वनगे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे

पू. बांद्रे महाराजांचे ग्रंथरूपाने प्राप्त झालेले विचार घराघरांत पोचवण्याची सेवा करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

पू. बांद्रे महाराजांचे जीवन या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला खूप काही शिकवणार आहे. त्यांनामिळणारे ईश्वरी ज्ञान जगभर प्रसारित व्हावे, लोकांना वाचायला मिळावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती; मात्र ‘ते ज्ञान प्रसिद्ध करण्याइतकी माझी आर्थिक स्थिती नाही’, असे ते सांगायचे. भगवंत भक्ताच्या मनातील भाव ओळखतो. त्याप्रमाणे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आम्ही ते सर्व ज्ञान संकलन करून घेऊ, तुमच्या नावे प्रसिद्ध करू’, असे सांगितले. त्या वेळी महाराजांनी कृतज्ञता व्यक्त करत म्हटले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ज्ञान लिहिलेल्या वह्या स्वीकारल्या नसत्या, तर हे अमूल्य ज्ञान मातीमोल ठरले असते.’’

पू. बांद्रे महाराजांच्या इच्छेनुसार हा ग्रंथ निवळी गावात प्रकाशित होत आहे. पू. बांद्रे महाराजांना प्राप्त झालेल्या ज्ञानावर आधारित उर्वरित ग्रंथही सनातन संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करून त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य यापुढेही चालू ठेवणार आहे. आपण सर्वांनी पू. बांद्रे महाराजांचे ग्रंथरूपाने प्राप्त झालेले विचार घराघरांत पोचवण्याची सेवा करूया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

पू. बांद्रे महाराज यांच्या भक्ताचे मनोगत 

सनातन संस्थेने या लिखाणाचे संकलन केले, हे तुमचे-आमचे नशीब ! – श्री. दिनकर धोंडू जाधव, डेरवण, पू. बांद्रे महाराजांचे भक्त

गेली कित्येक वर्षे मी पू. बांद्रे महाराजांच्या सहवासात असायचो. त्यांनी केलेले हे लिखाण असेच पडून जाणार का ? अशी खंत ते नेहमी बोलून दाखवत. सनातन संस्थेने या लिखाणाचे संकलन केले, हे तुमचे-आमचे नशीब आहे. हे ज्ञान सातासमुद्रापार जाणार आहे. संत हे अमर असतात. महाराज या ज्ञानाच्या रूपाने आहेत. या ग्रंथांच्या माध्यमातून महाराजांचे कार्य सर्व समाजात पोचवणे, हे आपणा भक्तांचे कार्य आहे. हे केले तर महाराजांच्या आत्म्याला शांती लाभेल.

अभिप्राय

१. श्री. दत्ताराम रांबाडे, केरे, महाराजांचे भक्त : सनातनने हा ग्रंथ प्रकाशित करून खरोखर फार मोठे कार्य केले आहे. नाहीतर हे लिखाण दुर्लक्षित राहिले असते. (या प्रकाशनामुळे श्री. रांबाडे फार आनंदी झाले होते. पू. बांद्रे महाराजांविषयी त्यांचा भाव जागृत झाला होता.)

२. पू. बांद्रे महाराजांचे भक्त श्री. संतोष कृष्णा बांद्रे, निवळी (कातळवाडी) : मी गावामध्ये ५० ग्रंथ जाऊन वितरित करणार आहे.

विशेष

पू. बांद्रे महाराजांच्या लिखाणाचा ग्रंथ प्रकाशित झाल्याविषयी अनेकांनी सनातनच्या साधकांकडे भावपूर्ण अभिप्राय व्यक्त केले. अनेकांच्या चेहर्‍यावर आनंद आणि भाव दिसत होता.

क्षणचित्रे

१. ग्रंथ प्रकाशनाचा कार्यक्रम चालू असतांना तेथील एक पाळीव कुत्रा कार्यक्रमाच्या ठिकाणी शांतपणे येऊन बसला होता. प्रकाशन झाल्यावर तो पू. बांद्रे महाराज यांच्या समाधीच्या जवळ जाऊन बसला. विशेष म्हणजे कार्यक्रमात अनेक जण उपस्थित असतांनाही कुणीही त्याला हाकलले नाही.

२. पू. बांद्रे महाराजांच्या देहत्यागाच्या वेळीही तो त्यांच्या खुर्चीसमोर येऊन बसला होता.

३. संपूर्ण कार्यक्रमात चैतन्य आणि शांतता अनुभवायला मिळाली.

४. प्रत्येक जण कार्यक्रमामध्ये नेमून दिल्याप्रमाणे सेवा करत होते. कुठेही गडबड गोंधळ नव्हता आणि तरुणांचा सहभागही लक्षणीय होता.

ग्रंथाची काही वैशिष्ट्ये

१.  ग्रंथाचे लिखाण अतिशय सोप्या भाषेत आहे.

२. सर्वसामान्य जनतेला कळेल, अशा सामान्य बोलीभाषेत आहे.

३. दैनंदिन संसारिक जीवन जगत असतांना अध्यात्माची, भगवंताची गोडी कशी लागेल ? याविषयी पूज्य बांद्रे महाराज यांनी सोप्या शब्दांत उदाहरण देऊन मार्गदर्शन केले आहे.