१७ ते १९ डिसेंबर २०२० या कालावधीत विविध गीतांवर भरतनाट्यम् नृत्य केल्यावर त्याचा स्वतःवर, साधकांवर आणि वातावरणावर काय परिणाम होतो, याचे प्रयोग करण्यात आले. या वेळी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि कु. अपाला औंधकर यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘श्री गणेश पंचरत्न स्तोत्र’ यावर सादर केलेले भरतनाट्यम् नृत्य
१ अ. कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण : गणपतीची तारक-मारक शक्ती कार्यरत होऊन श्री गणेशाच्या ‘लंबोदर, शूर्पकर्ण (सुपासाररखे कान असलेला.), एकदंत आणि महागणपति’, या रूपांचे मला दर्शन झाले. हे स्तोत्र ऐकत असतांना श्री गणेशाची मारक शक्ती वातावरणात प्रवाहित झाली. त्यामुळे माझी सूर्यनाडी चालू झाली. अपालाच्या भावामुळे तिने गणपतीला सूक्ष्मातून भरवलेला मोदक गणपतीने आनंदाने ग्रहण केल्याचे जाणवले. नृत्याच्या वेळी नृत्याच्या ठिकाणी श्री सिद्धिविनायक ऋद्धि आणि सिद्धि यांच्या समवेत आल्याचे जाणवले. हे नृत्य करत असतांना कु. अपालाने पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या दिशांच्या दिक्पालांना नमन केल्याचे जाणवले.
२. ‘नटेश कौतुकम्’ यावर सादर केलेले भरतनाट्यम् नृत्य
२ अ. कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण : ‘नटेश कौतुकम्च्या’ वेळी डमरूचा नाद ऐकू येत होता. ‘या डमरूच्या नादाच्या तालावर अपाला सूक्ष्मातून कैलासावर शिवासमोर नृत्य सादर करत आहे आणि आम्ही कैलासावर जाऊन हे नृत्य पहात आहोत’, असे मला जाणवले. यांतील संगीत आणि नृत्य यांची स्पंदने एकमेकांशी अल्प प्रमाणात जुळत असल्यामुळे या नृत्यातून अल्प प्रमाणात सात्त्विक स्पंदने वातावरणात पसरली.
२ आ. कु. अपाला औंधकर यांना आलेल्या अनुभूती : ‘वाईट शक्तींचा त्रास नसणार्या साधकांसमोर नृत्य सादर करत असतांना मला डमरूचा नाद एकदा ऐकू आला आणि मनाला प्रसन्न वाटून चैतन्य जाणवत होते. तसेच माझ्या सभोवतालचे वातावरण मला पुष्कळ शीतल जाणवत होते.’
३. ‘आत्मारामा आनंद रमणा’ या भक्तीगीतावर सादर केलेले नृत्य
३ अ. कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण : या नृत्याचे संगीत आणि त्यावर केलेल्या भरतनाट्यम् नृत्यातील मुद्रा अन् तोंडवळ्यावरील हावभाव एकमेकांशी तंतोतंत जुळत होते. हे नृत्य पहातांना माझा भाव जागृत होऊन माझे रोमरोम प्रफुल्लित झाले होते. या गीतातील प्रत्येक शब्दाच्या अर्थातून चैतन्याचा प्रवाह माझ्या अंतर्मनापर्यंत प्रवाहित होऊन हृदयात श्रीमन्नारायणाविषयीचा भक्तीभाव जागृत होऊन त्याच्या शेषशायी रूपाचे अस्तित्व मला माझ्या हृदयात जाणवत होते. तेव्हा माझ्या हृदयातून निळसर रंगाचा दिव्य प्रकाश बाहेर पडून त्या निळसर प्रकाशाची आभा माझ्या भोवती निर्माण झाल्याचे जाणवले.
३ आ. कु. अपाला औंधकर यांना आलेल्या अनुभूती : ‘हे नृत्य करत असतांना ‘पार्श्वसंगीत आणि गाणे याचा स्वत:वर काय परिणाम होतो?’, हे मला डोळे मिटून अनुभवावे, असे वाटले. त्याप्रमाणे मी जेव्हा अनुभवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्या पायाला ध्वनीचित्रीकरण कक्षातील लादीचा स्पर्श न जाणवता वेगळाच दिव्य स्पर्श जाणवला. त्याचप्रमाणे मला माझ्याभोवती वैकुंठातील वातावरण निर्माण झाल्याचे जाणवून ‘सर्वत्र दैवी प्रकाश पसरला आहे’, असे जाणवले. हे नृत्य वाईट शक्तींचा त्रास असणार्या साधकांसमोर सादर करतांना माझी भावजागृती होत होती. हे नृत्य वाईट शक्तींचा त्रास नसणार्या साधकांसमोर सादर करतांना माझे ध्यान लागून माझे मन निर्विचार झाले होते आणि माझे मन नृत्यातील स्पंदने अनुभवत होते.’
४. ‘तिल्लाना’ या नृत्य प्रकारावर सादर केलेले भरतनाट्यम् नृत्य !
तिल्लाना : ‘तिल्लाना’ म्हणजे हिंदुस्थानी संगीत पद्धतीतील ‘तराणा’ होय. हे एक शुद्ध नृत्य आहे. हे गतीमान असते. यात भावापेक्षा संगीताला महत्त्व असते.
४ अ. कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण : अपालाने भरतनाट्यम् नृत्यातील मालकंस रागातील ‘तिल्लाना’ हा प्रकार सादर केला. ‘तिल्लाना’ या नृत्यप्रकाराच्या कृती आणि संगीतातील मालकंस रागामध्ये गायलेले बोल यांची स्पंदने एकमेकांशी जुळत असल्यामुळे ती स्पंदने एकमेकांशी पूर्णपणे समरस झाली होती.
त्यामुळे हा नृत्यप्रकार अप्रतिम झाला. हा नृत्यप्रकार पहात असतांना प्रथम नटराज शिवाचे आणि नंतर ध्यानस्थ शिवाचे दर्शन झाले. या संगीतातून संपूर्ण वातावरणात चैतन्याच्या शीतल लहरींचे प्रक्षेपण होऊन कैलासाप्रमाणे वातावरण निर्माण झाले होते. अपालाने केलेला हा नृत्यप्रकार पहात असतांना माझ्या मनाची एकाग्रता आणि अंतर्मुखता वाढून माझे मन शांत झाले. नृत्याच्या शेवटी तिने दोन्ही हात जोडून वाकून केलेल्या नमस्कारामुळे तिचा शरणागतभाव जागृत झाला आणि शिवशंकराने तिला आशीर्वाद दिल्याचे दृश्य दिसले.
४ आ. कु. अपाला औंधकर यांना आलेल्या अनुभूती : ‘तिल्लाना’ या नृत्यप्रकारातील बोल ऐकतांना माझा देवाप्रतीचा शरणागत भाव जागृत होऊन अजून भावपूर्णरित्या नृत्य करण्याचे प्रयत्न माझ्याकडून आपोआप होत होते. ‘मी पहिल्यांदाच हे गाणे ऐकत आहे आणि या गाण्यावर माझे पहिल्यांदाच थेट नृत्य होत आहे’, असे मला जाणवले. त्रास असणार्या साधकांच्या समोर ‘तिल्लाना’ हा नृत्यप्रकार सादर करतांना मला काहीही सुचत नव्हते. मला घाबरल्याप्रमाणे जाणवत होते आणि नृत्य करतांना मला नैसर्गिकरित्या हसताही येत नव्हते. त्रास नसणार्या साधकांच्या समोर ‘तिल्लाना’ हा नृत्यप्रकार सादर करतांना गाण्याच्या शेवटी ‘मी भगवंताच्या समोर उभी राहून त्याला शरणागतीने आणि कृतज्ञतेने नमस्कार करत आहे’, असेही मला जाणवले. तेव्हा माझा देवाप्रतीचा भाव जागृत होऊन भावाश्रू वाहू लागले.
कु. अपालाने भरतनाट्यम् नृत्य करतांना परिधान केलेला पोषाख, घुंगरू, टिकली आणि कुंकू यांचा जाणवलेला सूक्ष्मातील परिणाम१. कु. अपालाने भरतनाट्यम्चा पारंपरिक पोषाख आणि सहावारी साडी नेसून भरतनाट्यम् नृत्य सादर केल्यावर जाणवलेला भेद : हे नृत्य सादर करतांना अपालाने आधी भरतनाट्यम्च्या प्रचलित पोषाखात नृत्य सादर केले आणि त्यानंतर सहावारी साडी नेसून नृत्य सादर केले. भरतनाट्यम् पोषाखापेक्षा साडी परिधान करून सादर केलेले नृत्य अधिक सात्त्विक असल्याचे जाणवले. यावरून भरतनाट्यम्च्या पारंपरिक पोषाखापेक्षा सहावारी साडी परिधान करणे अधिक सात्त्विक असल्याचे सुस्पष्ट झाले. २. कु. अपालाने पायांत लावलेल्या चामड्याच्या (लेदरच्या) पट्ट्याला घुंगरू बांधून आणि दोरीमध्ये गुंफलेले घुंगरू बांधून भरतनाट्यम् नृत्य केल्यावर जाणवलेला भेद : अपालाने प्रथम पायांत चामड्याच्या (लेदरच्या) पट्ट्याला लावलेले घुंगरू बांधून नृत्य केले आणि नंतर दोरीमध्ये गुंफलेले घुंगरू बांधून नृत्य केले. तेव्हा चामड्याच्या (लेदरच्या) पट्ट्यापेक्षा दोरीमध्ये गुंफलेले घुंगरू बांधून केलेल्या नृत्याच्या वेळी अधिक सात्त्विक नाद वातावरणात प्रक्षेपित होत होता. यावरून आपल्या लक्षात येते की, चामड्याच्या (लेदरच्या) पट्ट्यापेक्षा दोरीमध्ये गुंफलेले घुंगरू बांधून केलेले नृत्य आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक आहे. ३. कु. अपालाने कपाळावर चॉकलेटी रंगाची उभी टिकली लावून आणि लाल रंगाचे गोल कुंकू लावून भरतनाट्यम् नृत्य केल्यावर जाणवलेला भेद : अपालाने कपाळावर चॉकलेटी रंगाची उभी टिकली लावून आणि त्यानंतर लाल रंगाचे गोल कुंकू लावून नृत्य सादर केले. चॉकलेटी रंगाच्या उभ्या टिकलीपेक्षा लाल रंगाचे गोल कुंकू लावल्यावर तिच्या आज्ञाचक्रातून सात्त्विक स्पंदने आणि पिवळसर रंगाचा प्रकाशझोत वातावरणात प्रक्षेपित होतांना जाणवला. यावरून आपल्या लक्षात येते की, टिकली लावण्यापेक्षा गोल कुंकू लावणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक आहे. – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. १२.२.२०२०) |
|