चिपळूणचा महापूर आपत्काळाच्या दाहकतेची झलक !

१. व्यक्तीचे आत्मबळ, मनोबल आणि भगवंतावरील श्रद्धा, हेच महाआपत्तीला तोंड देण्याचे एकमात्र साधन !

डॉ. हेमंत चाळके

२१ जुलै २०२१च्या मध्यरात्री आणि २२ जुलै २०२१च्या दिवस-रात्र चिपळूण महापुराने संपूर्णपणे वेढले गेले होते. या पुरात अडकलेल्या आणि जिवावर बेतलेल्या कुणालाही प्रशिक्षित यंत्रणेकडून साहाय्य मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. याचा सरळ अर्थ असा आहे की, आपल्यालाच आपल्या जीवितरक्षणासाठी झगडावे लागणार असून त्यासाठी स्वतःचे मनोबल आणि आत्मबळ अन् ईश्वरावरील श्रद्धा, हेच एकमात्र साधन आहे. यासाठी साधनेविना पर्याय नाही, हे त्रिवार सत्य या महापुराने दाखवून दिले.

२. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या ‘डिझॅस्टर मॅनेजमेंट’चा भोंगळ कारभार

अतीवृष्टी झाल्यास पूर येणारच, अशी चिपळूण शहराची भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे येथे पावसाळ्यापूर्वीच आपत्कालीन स्थिती हाताळू शकणारे व्यवस्थापन सिद्ध ठेवणे आवश्यक होते. असे व्यवस्थापन आहेही; मात्र प्रत्यक्षात सरकारची ‘डिझॅस्टर मॅनेजमेंट’नामक संकल्पना केवळ कागदावरच आहे, हेच या आपत्तीच्या वेळी लक्षात आले. ‘रेस्क्यू ऑपरेशन’ साठी असलेल्या बोटी एकीकडे आणि त्यांची ‘इंजिन’ दुसरीकडे’, असा सर्व भोंगळ कारभार दिसून आला. पहिले ४८ घंटे पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून कोणतेही साहाय्य दिले गेले नाही, याविषयी जनतेत कमालीचा संताप निर्माण झाला. स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या बैठकीत याविषयी जिल्हा प्रशासन अन् पोलीस यांना खडसावण्यात आले. पुरात अडकलेले आणि जिवावर संकट बेतलेले लोक केवळ स्वतःच्या अन् इतर नागरिकांनी दाखवलेल्या धाडसी वृत्तीमुळेच वाचू शकले. त्यानंतर ‘एन्.डी.आर्.एफ्.’ची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची) प्रशिक्षित यंत्रणा बचाव कार्यात दाखल झाली.

३. पूर ओसरल्यावर चिपळूण शहर आणि परिसराचे रूपांतर भयावह परिस्थितीत होणे 

४८ घंटे उलटून गेल्यावर पुराचे पाणी ओसरू लागले आणि त्यानंतर या आपत्तीमुळे ओढवलेल्या संकटाचे भयावह रूप समोर आले. खेर्डी आणि चिपळूण या दोन्ही मोठ्या बाजारपेठा १०० टक्के बाधित झाल्या. कोणत्याही दुकानात एकही वस्तू चांगल्या अवस्थेत राहिली नाही. रस्त्यावर उभी असलेली सर्व वाहने पाण्याखाली गेल्याने नादुरुस्त झाली. वस्त्यांमध्ये तळमजला पाण्याखाली जाऊन पहिल्या मजल्यावर कमरेपर्यंत पाणी आले होते. त्यामुळे प्रचंड चिखल आणि कचरा यांचे साम्राज्य निर्माण झाले. उद्ध्वस्त शहर आणि ठिकठिकाणच्या लोकवस्त्या, तसेच कल्पनेपलीकडे आलेल्या आपत्तीने हीनदीन झालेली सामान्य माणसे हे मन हेलावून सोडणारे दृश्य महापुराने दाखवले. पुष्कळ जणांचे घरातील आणि दुकानातील साहित्य, कपडे इत्यादी सर्व पाण्यात वाया गेले. केवळ अंगावरील वस्त्रांनिशी त्यांना बाहेर पडावे लागले. आता सर्व शून्यातून पुन्हा निर्माण करायचे आहे.

४. मनुष्याने निसर्गाशी चालवलेले खेळ आणि त्यामुळे चढत्या क्रमाने आपत्ती येणे

सर्वत्रच पूरपरिस्थिती निर्माण होण्यास जी कारणे आहेत, तीच कारणे चिपळूणकरिता लागू होत आहेत. शहरात पुष्कळ मोठ्या संख्येने बांधकामे होत असून पाण्याचा निचरा होण्याचे नैसर्गिक स्रोत बुजवून त्यांवर बांधकामे केली जात आहेत. काही भागांत असलेल्या मोठमोठ्या ओढ्यांना आता गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या सर्वांमुळे वर्ष २००५ च्या पुरात ज्या ठिकाणी ५ फूट पाणी होते, तेथे या वेळी १० ते १५ फुटांपर्यंत पुराचे पाणी आले.

५. देव साधना करणार्‍या जिवांची काळजी वहातो, याची विविध प्रसंगांतून अनुभूती येणे

५ अ. संख्यात्मकदृष्ट्या आत्यंतिक अल्प संख्येने साधकांना हानी होणे : एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या महापुरात काहीच साधकांच्या वस्तू आणि धान्य यांची हानी झाली; मात्र बहुसंख्य साधक सुरक्षित राहिले.

५ आ. हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या धर्मप्रेमींपैकी काहींची पुष्कळ मोठी व्यावसायिक हानी होऊनही त्यांची ईश्वराप्रतीची श्रद्धा अढळ आहे. ‘देव याही स्थितीतून बाहेर काढेल’, हा त्यांच्यातील विश्वास शिकण्यासारखा आहे. पुराच्या पाण्यामुळे दुकानाची हानी झालेली असतांनाही काहींनी ‘त्यांना या संकटात देवाने काय अनुभूती दिली ?’ याविषयी कृतज्ञताभावाने सांगितले. काहींनी स्वतःच्या व्यावसायिक हानीविषयी दुःख करत न बसता संकटात सापडलेल्या इतरांना त्याही स्थितीत साहाय्य करण्याचे प्रयत्न केले. एकूणच साधना करणार्‍या जिवांचे देव रक्षण करतोच, त्याचसमवेत आपत्तीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहाण्याची आंतरिक शक्तीही देतो, हेही शिकता आले.

६. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पूरग्रस्तांना करण्यात आलेले साहाय्य

महिलेला पुरातून सुरक्षित स्थळी हालवतांना तरुण

६ अ. साधक, धर्मप्रेमी आणि समाजबांधव यांना त्वरित संपर्क करणे

पूर आल्यानंतर काहींना दूरभाषद्वारे आणि काहींना प्रत्यक्ष भेटून त्यांची विचारपूस करण्यात आली. त्यांना आवश्यक ते साहाय्य देण्याचेही नियोजन करण्यात आले. ‘संपर्कामुळे मानसिक आधार मिळाला’, असे काहींनी आवर्जून सांगितले.

६ आ. घटनास्थळी जाऊन साहाय्यकार्याचा अभ्यास करणे

आपत्तीच्या स्थितीत समाजातूनही साहाय्यकार्य चालू झाले. त्याविषयी अभ्यास करण्याचा विचार देवाने दिल्याने प्रत्यक्ष त्या त्या भागात जाऊन पहाणी करणे, पूरबाधितांशी संवाद साधणे या प्रयत्नांसह साहाय्याचे स्वरूप आणि प्रत्यक्ष आवश्यकता, साहाय्य निश्चित संबंधित व्यक्तींना मिळत आहे ना ? या सर्व सूत्रांचा अभ्यास करण्यात आला.

६ इ. पूर परिस्थिती आणि साहाय्यकार्याच्या अभ्यास यांतून प्रत्यक्षात साहाय्य करतांना ‘कोणत्या चुका टाळायला हव्यात ?’, हे पुढीलप्रमाणे शिकता आले

१. भावनेच्या भरात केले जात असलेले साहाय्य म्हणजे वस्तू , वेळ आणि श्रम यांचा अपव्यय आहे.

२. ‘लोकांना काय आणि किती प्रमाणात, तसेच कोणते साहाय्य आवश्यक आहे ?’, याचा विचार न करता दिले गेलेले साहाय्य ही एकप्रकारे राष्ट्रीय संपत्तीची हानी आहे.

३. शासन, संस्था आणि व्यक्तीगत स्तरावर होणार्‍या साहाय्याचे कोणतेच व्यवस्थापन  स्वातंत्र्याची ७४ वर्षे उलटूनही आदर्शवत् नसणे, हे आतापर्यंतच्या सरकारी यंत्रणेचे अपयश आहे.

४. काही पूरग्रस्तांमध्ये प्राप्त स्थितीत पुरेशा वस्तू मिळूनही साहाय्य मिळवण्यासाठी हाव दिसून आली. यातून ‘भारतियांमध्ये राष्ट्रीयत्वाच्या वृत्तीचा केवढा अभाव आहे’, हे लक्षात आले. तसेच याही स्थितीत काहींनी ‘आता साहाय्य नको, ते थांबवावे’, असेही प्रामाणिकपणे सांगितले.

६ ई. साहाय्यकार्याविषयी अभ्यास झाल्याने कोणत्या वस्तू, किती प्रमाणात आणि कुठे वितरित कराव्यात ? हे ठरले. यामुळे ईश्वराच्या कृपेने प्रत्यक्ष नियोजन सहजपणे झाले.

७. साहित्याच्या वितरणासाठी साधकांनी संघभावाने केलेले कौतुकास्पद प्रयत्न

७ अ. साहाय्य करायचे ठरल्यावर जिल्ह्यातील साधकांनी केवळ २ दिवसांत साहित्य मिळवून त्यांची पाकिटे सिद्ध केली. साहाय्यकार्य पोचवण्यासाठी वाहनव्यवस्था, वितरणासाठी साधक, कोरोनाच्या संदर्भात घ्यायची सर्व काळजी, या सर्व गोष्टींची सिद्धता पुष्कळ उत्साहाने केली.

७ आ. प्रत्यक्ष साहाय्य कार्य करतांना त्याचा आरंभ पूरग्रस्तांना समवेत घेऊन प्रार्थना करून करण्यात आला. यातून त्यांच्या मनात आपोआपच संस्था आणि समिती यांच्या साहाय्यकार्याच्या वेगळेपणाची जाणीव निर्माण झाली.

७ इ. साहाय्यकार्य शिस्तबद्धरित्या होण्यासाठी प्रयत्न करणे

आरंभी काही ठिकाणी साहाय्याच्या वहानापुढे गर्दी करणे, आपापसांत वादविवाद करणे, एकाच कुटुंबातील २-३ व्यक्तींनी साहाय्य मागणे, असे प्रकार झाले. गुरुदेवांनी ‘संयमपूर्वक समष्टीस कसे हाताळावे ?’ हे विविध उपक्रमांतून शिकवल्याने साधकांनी पूरग्रस्त आहेत; म्हणून भावनिक न होता शिस्तबद्ध कार्यपद्धत त्याही परिस्थिती राबवली. पूरग्रस्तांनाही ती स्वीकारण्यास सांगितली. यामुळे प्रत्येक कुटुंबात साहित्याचे वाटप ठरलेल्या संख्येप्रमाणेच झाले. पूरग्रस्तांपैकी काहींनी ‘साहित्य वितरणाची हीच पद्धत योग्य आहे’, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली.

७ ई. साहित्याचे वाटप करतांना बाधितांची आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर देण्यात आला. साधनेचे महत्त्वही सांगण्याचा प्रयत्न झाला.

७ उ. प्रत्येक ठिकाणी स्थानिक युवा कार्यकर्त्यांना जोडून घेऊन हे साहाय्यकार्य करण्यात आले. यामुळे त्यांच्याशी जवळीकता साधता आली. त्यांनीही त्यांच्या भागातील एकूण कुटुंबांची सूची सिद्ध केली. असे प्रयत्न केवळ संस्था आणि समिती यांच्या वतीने करण्यात येणार्‍या वाटपाच्या वेळीच झाले. यातून त्यांनाही कार्यपद्धतीतील वेगळेपण लक्षात आले.

७ ऊ. युवा कार्यकर्त्यांशी काही स्थानिक लोक अधिक वस्तू मिळण्यासाठी वाद घालत. त्यामुळे त्यांच्यात निराशा निर्माण होत होती. अशा वेळी साधक त्यांना प्रोत्साहित करत होते.

८. साहाय्यकार्य करणार्‍यांनी सनातनच्या साधकांना जोडून घेणे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती पूरग्रस्तांना साहाय्य करत आहे, हे समजल्यावर अन्य मंडळांनी त्यांचे साहाय्यकार्य योग्य प्रकारे होण्यासाठी साहाय्य मागितले. अशा मंडळींनाही साधक जोडून देण्यात आले. त्यामुळे आवश्यक लोकांपर्यंत साहाय्य पोचवू शकलो, याचे त्यांना समाधान मिळाले. त्यांनी संस्था आणि समिती यांच्याप्रती आभार व्यक्त केले.

९. केवळ २ दिवसांत ४१६ कुटुंबांतील २ सहस्र ३०२ पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात आले. यात ३ ठिकाणी संस्था, समिती आणि अन्य संघटना यांच्या वतीने प्रथमच साहाय्य पोचवण्यात आले. ही ठिकाणे दुर्लक्षित राहिली होती.

हे सर्व भगवंताच्या संकल्पाने झाले, म्हणून सहजतेने होऊ शकले. गुरुदेवांनी आपत्काळात ‘समाजसाहाय्य’ ही सेवा कशी करावी ? हे शिकवले, यासाठी आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.

– डॉ. हेमंत चाळके, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.


पुरामुळे उद्ध्वस्त झालेली घरे आणि हताश नागरिक

जल आणि दाहकता यांचा तसा दुरान्वयेही संबंध नाही; मात्र २१ जुलै २०२१ च्या सायंकाळी चालू झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्यरात्रीनंतर चिपळूणला याच जलधारा उद्ध्वस्त करणार्‍या संकटाचे चटके देणार आहेत, याची कल्पनाही येथील नागरिकांना नव्हती. २२ जुलैची पहाट, ज्याला केवळ ‘भीषण’ हीच संज्ञा देणे योग्य ठरेल, असा महापूर घेऊन चिपळूणकरांच्या भेटीस आली. साधक, जनता आणि राज्यकर्ते यांना अंतर्मुख करणारी ही आपत्ती ठरली आहे.

चिपळूण बाजारपेठेत घुसलेले पाणी
पाण्याखाली गेलेल्या परिवहन महामंडळाच्या डेपोतील बस
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक