पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. २५ जुलै २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय संस्कृती’ हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार असणे, मानवी जीवनाच्या बंधनांपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे शिक्षण हवे आणि आधुनिक मान्यता अन् दोष यांविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील भाग पाहूया. (भाग ५)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/497580.html |
३. केवळ ‘अर्थ’ आणि ‘काम’ इतकेच ध्येय ठेवून मनुष्याला अपयशाच्या वाटेवर नेणारे आधुनिक शिक्षण !
३ अ. विविध माध्यमांतून मानवी वासनांची पूर्ती करून केवळ ‘अर्थ’ आणि ‘काम’ हेच ध्येय ठेवणारे शिक्षक आणि विद्यार्थी! : ‘आधुनिक युगात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संबंधांचे माध्यम केवळ ‘भौतिक शिक्षण’ हेच आहे. नेमून दिलेल्या दिवशी आणि नेमून दिलेल्या वेळेत शिक्षक वर्गात येतात. अध्यापनाचे कार्य नेमून दिलेल्या वेळेत संपवून निघून जातात. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी आपापल्या वेगवेगळ्या कामांत व्यस्त होतात. आधुनिक युगात तर अनेक शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही उपाहारगृहांमध्ये जातात, चित्रपट किंवा दूरचित्रवाणी संच पहातात, तसेच विशेष स्थळांना भेटीही देतात. दोघेही आपापल्या पद्धतीने मानवी वासनांची पूर्ती करतात आणि स्वार्थानेच प्रेरित असतात. आधुनिक गोष्टींचे दोघांनाही समान आकर्षण असते. दोघांच्याही व्यक्तीगत चारित्र्यामध्ये विशेष अंतर नसते. दोघांचेही लक्ष्य ‘अर्थ’ आणि ‘काम’ हेच असते.
३ आ. शिक्षकांप्रती असणारा विद्यार्थ्याचा आदरभाव : शिक्षकाचे वय अधिक असल्यामुळे तो अधिक व्यावहारिक आणि शिष्टाचारांचे पालन करणारा असतो. उच्च शिक्षणामध्ये कधी कधी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांच्या वयामध्येही अधिक अंतर नसते. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचा शिक्षकाप्रती किती आदरभाव असेल ? एखादा मनुष्य जर कुणाला काही देत किंवा शिकवत असेल, तर देणार्याचा किंवा शिकवणार्याचा आदर राखणे आणि त्याच्याप्रती श्रद्धा असणे, ही स्वाभाविक प्रक्रिया आहे.
३ इ. मनुष्याच्या प्रवृत्ती संयमित राखण्यात निष्फळ ठरणारे आणि मनुष्याला दुष्कर्मांकडे घेऊन जाणारे आधुनिक शिक्षण ! : शिक्षित मनुष्य कधी कधी दुष्कर्मांच्या संगतीत उतरतो. खरेतर ते अपेक्षित नसते. मानवी प्रवृत्तीला सतत संयमी राखण्याच्या दृष्टीने आधुनिक शिक्षण अनभिज्ञ असते. प्रवृत्ती अकस्मात् पालटण्याच्या कारणांचा शोध घेण्यात आधुनिक शिक्षण अपयशी ठरते. आता आधुनिक शिक्षित मनुष्य म्हणेल की, अशा घटना कधी कधी होतातच; परंतु हे या प्रश्नाचे उत्तर नाही. मूळ प्रश्न हाच आहे की, असे दुष्कर्म शिक्षित मनुष्याकडून कसे घडते ?
३ ई. जीवनात अस्थिरता निर्माण करणारे आधुनिक शिक्षण ! : मनुष्य आणि समाज यांच्या जीवनात अस्थिरता निर्माण करणार्या आधुनिक शिक्षणाचे ध्येय ‘अर्थ (धनसंपत्ती)’ आणि ‘काम (इच्छा)’ इतकेच आहे. या दोन्हीही गोष्टी जीवनात अस्थिरता निर्माण करतात; कारण त्या स्वतः स्थिर रूपात नसतात.
३ ई १. ‘अर्थ’ स्थिर रहात नसणे : ‘अर्थ’ स्थिर रहात नाही; कारण एखादा धनिक अकस्मात् निर्धन होतो आणि निर्धन मनुष्य धनिक होतो. मनुष्य किती काळापर्यंत निर्धन किंवा धनिक राहील, हे निश्चित नाही. अर्थासंबंधी ही अस्थिरता केवळ एखाद्या मनुष्यापर्यंत मर्यादित नाही, तर ती समाज किंवा देश यांच्या ठायीसुद्धा निर्माण होऊ शकते.
३ ई २. अंत नसणार्या कामना : कामासंबंधी प्रचंड अस्थिरता आहे; कारण मनुष्याच्या कामनांचा कधीच अंत होत नसतो. आधुनिक जीवनात नवनवीन भौतिक गोष्टी आणि सुविधा यांचे आकर्षणसुद्धा अधिक आहे. मन चंचल असते आणि कामना कधीच पूर्ण होत नाहीत, उलट त्या वाढतच जातात किंवा पालटत जातात. त्यामुळे ‘अर्थ’ आणि ‘काम’ हे जीवनाला अस्थिर करतात.
३ उ. अशिक्षित मनुष्यही अर्थ आणि काम प्राप्त करत असणे : आधुनिक शिक्षणाचे ध्येय असणारे ‘अर्थ आणि काम’ हे कधी कधी अशिक्षित मनुष्यसुद्धा प्राप्त करू शकतो. यात जर एखादे संकट आले, तर तो त्याचे निवारणसुद्धा धनाद्वारेच करतो. अशा घटना पाहून सर्वसाधारण माणसाचे मन नियमांचे पालन करण्याप्रती साशंक आणि अस्थिर बनते.
३ ऊ. महान आणि विलक्षण भारतीय सांस्कृतिक ज्ञानाविषयी अनभिज्ञ असणारे आधुनिक शिक्षण ! : सध्या मनुष्य नोकरी, उद्योग किंवा व्यापार यांमध्ये दंग आहे. तो परिश्रम करतो आणि परिश्रमाचे फळ मिळाल्यावर तो सुख अनुभवतो. घर चालवण्यासाठी त्याच्याजवळ सुविधा असतात. आजारांवर उपचार करण्यासाठी आधुनिक वैद्य जागोजागी उपलब्ध होतात. अशा स्थितीत केवळ भौतिक सुखाच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची संस्कृती मनुष्याला आवश्यक वाटत नाही. तो भारतीय संस्कृतीची मान्यता, ज्ञान आणि परंपरा यांच्याविषयी अनभिज्ञ होत जातो. यामुळे अन्य दोषांचा जन्म होतो, उदा. विदेशी परंपरांप्रती आसक्त होणे, भारतीय संस्कृतीला हास्यास्पद समजू लागणे, भारतीय असूनही विदेशी नागरिकांसारखे आचरण होऊ लागणे इत्यादी.
३ ए. भारतीय संस्कृती समजून घेण्याची आवश्यक कारणे आणि लाभ !
१. भारतीय संस्कृती मनुष्याला अध्यात्म आणि विज्ञान, तसेच निसर्गाचे व्यापकत्व शिकवते.
२. मनुष्यामध्ये असलेल्या अपार शक्तींचा बोध करून देते आणि त्या प्राप्त करण्याचे उपायही सांगते.
३. ही संस्कृती मानवी बुद्धीच्या पलीकडचे ज्ञान देते.
४. मनुष्याच्या दुःखाची मूलभूत कारणे आणि त्यांचे निराकरण करण्याचे उपायही सांगते.
५. मानवाचे चारित्र्य घडवण्यावर लक्ष केंद्रित करायला शिकवते.
६. व्यापक दृष्टीकोन आत्मसात करून मनुष्याला जगद्गुरु बनवते.
७. स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या ओजस्वी वाणीद्वारे भारतीय संस्कृतीचे वर्चस्व विश्वामध्ये स्थापित करते.
८. जीवनाची दिशा निश्चित करते.
९. अनेक गोष्टींमागील कार्यकारणभावाच्या श्रुंखलेचा आरंभ आणि अंत यांच्याशी परिचित करते.
१०. भारतीय परंपरागत विचार आणि कर्म यांची वैशिष्ट्ये सांगते.
११. परंपरागत भारतीय अक्षरे आणि शब्द यांचे विज्ञान शिकवते.
१२. आधुनिक युगातील भारतियांमध्ये निर्माण झालेल्या हीनतेच्या भावनेपासून उभारी देते आणि स्वाभिमानी बनवते इत्यादी.
३ ऐ. आधुनिक शिक्षणाने मनुष्यात केवळ बाह्य पालट होणे : आधुनिक शिक्षण ज्ञान देते, तसेच माहिती प्रदान करते; परंतु मनुष्याचे व्यक्तिमत्त्व, चारित्र्य किंवा गुण यांत पालट करू शकत नाही. मनुष्याच्या मनात नेहमी उलटसुलट संकल्प-विकल्प येतात, त्यांना आधुनिक शिक्षण नियंत्रित करू शकत नाही. जसे बालवयात वासना, उदा. राग, द्वेष, क्रोध, मत्सर, लोभ, मोह, भय, तृष्णा इत्यादी असतात, तशाच यौवनावस्था आणि वृद्धावस्था यांतही त्या असतात; परंतु आधुनिक शिक्षण या वासना क्षीण करण्यासाठी कोणताही उपाय सांगू शकत नाही. आधुनिक शिक्षण प्राप्त करून, धनधान्ययुक्त होऊन धनाच्या उबेच्या प्रभावात मनुष्य ‘मी योग्य आणि सर्वश्रेष्ठ आहे’, अशा अहंकारात रहातो. ‘आपण पुष्कळच उन्नती केली आहे’, असे त्याला वाटते. मनुष्याची ही प्रचीती मिथ्य आहे; कारण आधुनिक शिक्षणाने मनुष्यात केवळ बाह्य पालट होतात, आंतरिक नाही.
३ ओ. काही घटनांमागील सत्य न सांगात विद्यार्थ्यांना अंधारात ठेवणे : आधुनिक काळात शासक वर्ग भय, स्वार्थ आदी कारणांमुळे विद्यार्थ्यांना काही घटनांमागील सत्य गोष्टी सांगत नाहीत. विद्यार्थ्यांना अंधारात ठेवले जाते. केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर प्रजेलासुद्धा अंधारात ठेवले जाते. जाणूनबुजून खोट्या अफवा पसरवल्या जातात.’ (क्रमशः पुढच्या रविवारी)
– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)