पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव पालटून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे केले. ‘खेलरत्न’ हा देशातील खेळाडूंना देण्यात येणारा सर्वाेच्च पुरस्कार आहे. संपूर्ण विश्वात ‘हॉकीचे जादुगार’ म्हणून प्रसिद्ध असलेले मेजर ध्यानचंद यांनी भारताचे नाव उंचावले. त्यामुळे या अलौकीक खेळाडूचे नाव देशाच्या क्रीडाक्षेत्रातील सर्वांत मोठ्या पुरस्काराला देणे अधिक योग्य आहे. स्वातंत्र्यानंतर नेहरू-गांधी घराण्याने स्वतःच्या घराण्याचा दबदबा कायम रहाण्यासाठी जे काही केले, ते नवीन पिढीला आता ज्ञात होत आहे. इतिहासाच्या पुस्तकात सदर्याला गुलाबाचे फूल लावलेले चाचा नेहरू यांचे खरे रूप गेल्या काही वर्षांत हिंदूंसमोर आल्यावर काँग्रेसची छी थू झाली आहे. नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावाने अनेक संस्था आहेत. देशभरातील विविध योजना आणि प्रकल्प यांना दिलेली त्यांच्या नावांची सूची पाहिली तर अक्षरशः हतबद्ध व्हायला होते. वर्ष १९८४ ते १९८९ पर्यंत भारताचे पंतप्रधान असलेले राजीव गांधी यांचे नाव अनेक गोष्टींना देण्यात आले आहे. वर्ष २०१३ मध्ये माहिती अधिकाराच्या अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मिळालेल्या माहितीनुसार भारतातील ४५० हून अधिक योजना, इमारती, प्रकल्प, संस्था इत्यादींना नेहरू-गांधी कुटुंबातील तीन सदस्यांची (जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी) नावे देण्यात आलेली आहेत. इंदिरा गांधी यांचे ज्येष्ठ पुत्र संजय गांधी यांच्या नावानेही अनेक संस्था आहेत. ‘खेलरत्न पुरस्काराचे नाव पालटणे’ हे राजकारण असल्याची टीका काँग्रेसकडून केली जात आहे. कर्णावती येथील मैदानाला मोदी यांचे नाव देण्यात आल्यावरून काँग्रेसकडून प्रश्न विचारला जात आहे. गांधी घराण्यातील नावांच्या सूचीच्या योजना किंवा वास्तू यांविषयी अवाक्षरही न काढता असे प्रश्न उपस्थित करणे हेही राजकारणच आहे.
नेत्यांची नावे रस्ते, पूल, विभाग, विमानतळे, स्थानके, वास्तू, सभागृहे, मैदाने, संग्रहालये, उद्याने, प्रकल्प, योजना, सामाजिक किंवा शिक्षणसंस्था आदींना देणे हे अयोग्य आहे. ‘नावात काय आहे ?’ असे म्हटले जाते; पण प्रत्यक्ष पहाता ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची शक्ती हे सर्व एकत्र असते’, हे शास्त्र आहे. एखाद्याच्या नावातून त्याची स्पंदने येत असतात. त्यामुळेच देवाचा नामजप करून मानव देवासमान होतो. त्या त्या क्षेत्रातील सर्वाेच्च व्यक्ती, राजे, महापुरुष, ऋषि किंवा देवता यांची नावे पुरस्काराला देणे हे आदर्श ठरू शकते. त्यामुळे ‘संबंधितांचा आदर्श घेऊनध्येय साध्य करायचे आहे’, ही आठवण रहायला साहाय्य होते. मोदी शासनाने चालू केलेली ही पद्धत स्वागतार्ह आहे. सर्वत्र त्याचे अनुकरण केल्यास सांस्कृतिक अस्मिता वृद्धींगत होईल !