‘२०.४.२०२१ या दिवशी माझे वडील अविनाश दिनकर देसाई (अप्पा) यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. मला ‘अप्पांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती, त्यांच्या मृत्यूविषयी मिळालेल्या पूर्वसूचना आणि ते रुग्णाईत असतांना त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करतांना आलेल्या अनुभूती’ पुढे दिल्या आहेत.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणे : अप्पा प्रत्येक परिस्थितीत आनंदी असायचे आणि ते त्यांच्या सान्निध्यात असणार्या प्रत्येकाला आनंदी रहाण्यासाठी प्रोत्साहित करायचे. ते कठीण परिस्थितीतही अलगदपणे आनंदाचे क्षण टिपायचे आणि स्वतःचे मनोधैर्य ढासळू न देता आनंदी असायचे.
१ आ. ते मितभाषी आणि स्थितप्रज्ञ होते.
१ इ. कुशाग्र बुद्धीमत्ता : अप्पांच्या शैक्षणिक काळात उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षण सोडून नोकरी करणे अनिवार्य झाले होते; मात्र मुळातच कुशाग्र बुद्धीमत्तेचे असल्याने ते भरकटले नाहीत. पूर्वी एका मासिकात सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी घातलेला कठीण प्रश्न अप्पांनी गणिताच्या अपेक्षित क्रमाने अचूक सोडवल्याने त्यांनी अप्पांचे पत्राद्वारे कौतुक केले होते.
१ ई. घरकाम आणि सेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण करणे : अप्पा घरकाम आणि सेवा भावपूर्णरित्या अन् तल्लीन होऊन करायचे. त्यांनी केलेली दैनंदिन कामे आणि सेवा यांतून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याची अनुभूती यायची. त्यांच्या सहवासातील सर्वांनाच त्यांचे अद्वितीयत्व लक्षात येत असे. अप्पा ‘घरातील विद्युत् उपकरणांची जोडणी, ‘प्लंबिंग’, बागकाम, घराला रंग देणे, वाहनांची दुरुस्ती’ इत्यादी कामे नियोजनबद्ध आणि आवडीने करायचे.
१ उ. भावपूर्णरित्या पूजा करणे : अप्पा प्रतिदिन घरातील देवतांची भावपूर्ण पूजा करायचे. ते सकाळी लवकर उठून पूजेसाठी लागणारी विविध फुले गोळा करून आणायचे आणि देवाला वहाण्यापूर्वी त्यांची ताटात सुंदर, सात्त्विक अन् मोहक रचना करायचे. त्यांनी केलेल्या भावपूर्ण पूजेमुळे कुलदेवीच्या मूर्तीवरील हावभाव पालटायचे.
१ ऊ. श्रीमद्भगवद्गीतेनुसार आचरण करण्यावर भर असणे : त्यांनी आम्हाला वेळोवेळी कृतीतून शिकवून घडवले. अप्पांचा श्रीमद्भगवद्गीतेनुसार आचरण करण्यावर भर होता. ते प्रसंगानुरूप गीतेतील श्लोक म्हणून आम्हाला त्याचा अर्थ सांगायचे.
१ ए. ते कुलाचाराचे काटेकोरपणे पालन करायचे. ते सनातन संस्थेशी जोडले गेल्यापासून सर्व कृती सनातनच्या मार्गदर्शनानुसार करायचे.
१ ऐ. अप्पांनी कार्यालयीन दायित्वाच्या अंतर्गत कुष्ठरोग झालेल्या रुग्णांशी जुळवून घेऊन त्यांच्याशी आपुलकीने वागणे आणि त्यांनी अप्पांना ‘आमचा देव’ असे आदराने संबोधणे : ते सर्वांशी समभावाने वागायचे. ते संपर्कात येणार्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला सामावून घ्यायचे. अप्पा कार्यालयीन दायित्वाच्या अंतर्गत कुष्ठरोग पुनर्वसन केंद्रात जाऊन कुष्ठरोग्यांकडून उपकरणांचे उत्पादन करवून घ्यायचे. कुष्ठरोगी रोगमुक्त झाल्यावरही समाजातून उपेक्षित राहिल्याने ते आरंभी अप्पांशी नीट वागत नसत. त्यामुळे अप्पांना आरंभी आव्हानांना सामोरे जावे लागले. त्या वेळी अप्पा रोगमुक्त झालेल्या कुष्ठरोग्यांचे वागणे सहन करून मोठ्या मनाने त्यांच्याशी मिळूनमिसळून वागायचे आणि स्वतः त्यांची कामे करायला उभे रहायचे. काही दिवसांनी पुनर्वसन झालेल्या कुष्ठरोग्यांची मानसिकता पालटून ते व्यवस्थित कार्य करू लागले. ते अप्पांना ‘आमचा देव’ असे आदराने संबोधायचे.
१ ओ. अल्प अहं : अप्पा पुष्कळ ज्ञानी होते, तरी त्यांच्यात अहं अल्प होता. ते माझ्यापेक्षा सर्वच दृष्टीने उच्च स्तरावर असूनही मी त्यांना साधनेचे दृष्टीकोन दिले, तर ते कृतीत आणायचा प्रयत्न करायचे.
१ औ. सहनशील : एकदा अप्पा भीमाशंकर येथे दुचाकीवरून जात होते. त्या वेळी त्यांना अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही खांदे निखळले. ते तशाही स्थितीत आईशी भ्रमणभाषवरून शांतपणे बोलत होते. तेव्हा त्यांच्या बोलण्यात कुठलीच अस्वस्थता किंवा वेदना जाणवत नव्हती.
१ अं. अप्पांनी केलेल्या विविध सेवा : अप्पांचा समष्टी सेवेत सक्रीय सहभाग असायचा. ते आईलाही तिच्या सेवांमध्ये साहाय्य करायचे. ते ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, सनातन पंचांगाशी संबंधित सेवा, ग्रंथप्रदर्शन लावणे, परिसरातील साधकांना सेवेच्या स्थळी आणणे आणि नंतर घरी पोचवणे’ इत्यादी सेवा आनंदाने करायचे. ते नेहमी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सेवकांचा मी सेवक आहे’, असे म्हणायचे. अप्पा आणि आई यांनी अनेक जणांना सात्त्विक उत्पादने, नामपट्ट्या आणि ग्रंथ वेळोवेळी भेटस्वरूप दिले आहेत.
१ क. स्वतःला पालटण्याची तळमळ : ते मला त्यांच्या चुका प्रांजळपणे सांगायचे आणि ‘काही चुकत असल्यास मला सांग’, असे म्हणायचे. त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंची व्याप्ती बारकाईने काढली होती.
१ ख. आपत्काळाची सिद्धता म्हणून आई आणि अप्पा यांनी मूळ घरी रहायला येणे अन् तेथे औषधी वनस्पतींची लागवड करण्याची सिद्धता करणे : आपत्काळाची सिद्धता म्हणून अप्पा आणि आई चिंचवडहून नगरला मूळ घरी रहायला गेले. नगर येथे रहायला गेल्यावर औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी अप्पांनी काही औषधी वनस्पतींची रोपे, सकस माती आणि कुंड्या यांची सिद्धता करून ठेवली होती.
२. अप्पांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती
अ. अप्पांकडून पुष्कळ सकारात्मक आणि प्रेमभावाची स्पंदने यायची. त्यांच्या जवळ बसल्यावर मला शांत वाटायचे.
आ. त्यांच्याकडे अनोळखी लहान बालकेही झेप घ्यायची. अप्पा त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवायचे. तेव्हा माझा भाव जागृत होत असे.
इ. त्यांचे हात कापसासारखे मऊ होते. एकदा मी त्यांच्या डोक्याला तेल लावून मालीश करत होते. त्या वेळी मला पुष्कळ हलकेपणा जाणवला आणि काही वेळ मी निर्विचार झाले.
३. अप्पांची आध्यात्मिक पातळी उंचावत असल्याचे दर्शवणार्या साधिकेला आलेल्या अनुभूती
३ अ. अप्पांची दोन वर्षांतील छायाचित्रे पाहिल्यावर ‘ते निर्गुणाकडे जात आहेत’, असे जाणवणे : वर्ष २०१८ पासून ‘अप्पांची आध्यात्मिक पातळी उंचावत आहे’, असे मला पुष्कळ वेळा आतून वाटत असे. ‘वर्ष २०१९ ते वर्ष २०२१ या कालावधीमधील त्यांची छायाचित्रे पाहिल्यावर ‘ते निर्गुणाकडे जात आहेत’, असे मला जाणवायचे.
३ आ. अप्पांना स्वतःच्या अंतर्मनातून होत असलेला नामजप रात्रभर ऐकू येणे : एकदा रात्री झोपल्यावर अप्पांना उच्च स्वरात नामजप ऐकू येत होता. त्यामुळे त्यांना खडबडून जाग आली. ‘आई (पत्नी) वैखरीतून नामजप करत आहे’, असे त्यांना वाटल्याने त्यांनी तिला त्याविषयी विचारले. प्रत्यक्षात स्वतःच्याच अंतर्मनातून होत असलेला नामजप त्यांना ऐकू येत होता. त्यांना ही अनुभूती एप्रिल २०२१ पर्यंत सातत्याने येत होती. ‘मला रात्रभर नामजप ऐकू येतो’, असे त्यांनी आईला आणि मला सांगितले होते.
३ इ. स्वप्नात अप्पांच्या चरणांसारखा उजवा चरण आणि आईच्या चरणासारखा डावा चरण दिसणे, ते पाहून ‘ते दोघे शिव-शक्तीस्वरूप आहेत’, असे वाटणे अन् त्यानंतर जाग आल्यावर पुष्कळ प्रसन्न वाटणे : वर्ष २०२० च्या विजयादशमीच्या दिवशी पहाटे मला स्वप्नात फुलांचा सुगंध येत होता. अकस्मात् एक मंगलमय उजवा चरण माझ्या दृष्टीपुढे आला. मला तो चरण अप्पांच्या चरणासारखा दिसत होता. मी ते ओळखल्यावर डावीकडचा एक चरण पुढे आला. तो मंगलमय चरण आईचा होता. दोघांचे शुभचरण पाहून ‘ते दोघे शिव-शक्तीस्वरूप आहेत’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर मला जाग आली. त्या दिवशी मला पुष्कळ प्रसन्न वाटत होते.
४. अप्पांच्या निधनाविषयी साधिकेला मिळालेल्या पूर्वसूचना
४ अ. ‘आई-वडिलांना कोरोना झाला आहे’, हे समजल्यावर कुलदेवतेला प्रार्थना करणे आणि देवीने सूक्ष्मातून येऊन आईच्या देहावरचे अनिष्ट शक्तीचे आवरण नष्ट करणे; मात्र वडिलांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाल्याचे न जाणवणे : ‘आमचा (आई (अनघा देसाई) आणि अप्पा यांचा) कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह (कोरोनाबाधित असल्याचा) आला आहे’, असे आईने मला भ्रमणभाष करून कळवले. ईश्वराच्या प्रेरणेने मी त्वरित कुलदेवतेला ‘अंबाबाई, तुझ्या सेवेकरी भक्तांसाठी उपाय करून आणि कृपाकटाक्ष ठेवून त्यांची प्रकृती सुधारू दे’, अशी आर्ततेने प्रार्थना केली अन् डोळे मिटून नामजप करू लागले. त्या वेळी मला देवीचे परकर-पोलके घातलेले रूप दिसले. तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘देवी देवघरातून बागडत आई आणि अप्पा यांच्या जवळ आली. देवीने आई आणि अप्पा यांच्यावर दिव्य कृपादृष्टी टाकली. त्या वेळी आईच्या देहावरचे अनिष्ट शक्तीचे आवरण लगेच नष्ट झाले. तेव्हा मलाही हलकेपणा जाणवला. देवीने अप्पांवर कटाक्ष टाकला; पण ती मिस्कीलपणे हसत-बागडत देवघरात निघून गेली.’ अप्पांसाठी आध्यात्मिक स्तरावर उपाय झाल्याचे मला सूक्ष्मातून जाणवले नाही. प्रार्थना केल्यावर क्षणाचा विलंब न करता देवी धावून आली. मी देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
४ आ. अप्पा रुग्णाईत असतांनाच्या कालावधीत श्रीकृष्णाला आत्मनिवेदन करतांना त्याच्या जागी शिवाचे रूप दिसणे आणि ‘शिव’ हे अप्पांचे प्रिय दैवत असणे : वर्ष २०२१ च्या प्रारंभापासून श्रीकृष्णाच्या चित्रासमोर बसून आत्मनिवेदन करतांना श्रीकृष्ण माझ्याशी बोलत असल्याप्रमाणे मला त्याचे ओठ हालतांना, हावभाव पालटतांना, उपरणे हालतांना आणि उजवा चरण पुढे येतांना, म्हणजे चित्रातून बाहेर येतांना सूक्ष्मातून दिसत असे. अप्पा रुग्णाईत असतांनाच्या कालावधीत मी श्रीकृष्णाला आत्मनिवेदन करतांना काही वेळाने त्या चित्रातील श्रीकृष्णाचे रूप पूर्णपणे पालटले आणि त्या जागी मला शिवाचे रूप दिसले. ‘शिव’ हे अप्पांचे प्रिय दैवत होते.
४ इ. माझ्या मनात ‘आई-अप्पा या दोघांवर संकट आहे’, असा विचार १ – २ वेळा आला.
४ ई. वर्ष २०२१ चालू झाल्यापासून मला अप्पांची आठवण आली, तरी त्यांच्या तोंडवळ्याऐवजी स्थिर निळे आकाश दिसत असे. मार्च २०२१ पासून ‘त्या आकाशावर कापसासारखे विरळ ढग वेगाने सरकत आहेत’, असे मला दिसायचे.
५. अप्पा रुग्णाईत असतांना त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
५ अ. संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय करतांना अप्पांची मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती दर्शवणार्या अनुभूती येणे अन् ‘साधक संकटात असतांना त्यांच्या शारीरिक यातना न्यून करण्यासाठी देवता सूक्ष्मातून धावून येतात’, हे अनुभवायला मिळणे : अप्पांना कोरोना झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवले होते. मी त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलिया येथून संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय करत होते. त्या वेळी परात्पर डॉ. आठवले यांच्या कृपेने मला अप्पांची मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती दर्शवणार्या अनुभूती आल्या. ‘साधक संकटात असतांना त्यांच्या शारीरिक यातना न्यून करण्यासाठी देवता सूक्ष्मातून धावून येतात’, हे मला अनुभवायला आले. अप्पांसाठी नामजप करतांना माझे मन स्थिर आणि एकाग्र ठेवल्याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
५ आ. अप्पांना रुग्णालयात भरती केल्यापासून अहोरात्र दिवा लावून त्यांच्यासाठी नामजप करणे, दिव्याच्या ज्योतीभोवती कधी निळ्या रंगाचे वलय, तर कधी सोनेरी किंवा शुभ्र प्रकाश दिसणे आणि त्यामुळे ‘अप्पांची आध्यात्मिक आणि मानसिक स्थिती उत्तम आहे’, असा भाव असणे : अप्पांना रुग्णालयात भरती केल्यापासून मी अहोरात्र दिवा लावून त्यासमोर बसून अप्पांसाठी नामजप करत होते. १३.४.२०२१ या दिवसापासून २०.४.२०२१ या दिवशी दुपारपर्यंत दिव्याची ज्योत अधिकाधिक तेजस्वी होत असल्याचे मला जाणवत होते. काही वेळा त्या ज्योतीभोवती निळ्या रंगाचे वलय दिसायचे, तर काही वेळा सोनेरी किंवा शुभ्र प्रकाश दिसायचा. ‘त्या ज्योतीभोवती गुलाबी रंगाचा गोळा फिरत आहे’, असेही मला सूक्ष्मातून दिसले. त्यामुळे ‘ईश्वराच्या कृपेने अप्पांची आध्यात्मिक आणि मानसिक स्थिती उत्तम आहे’, असा माझा भाव होता.
५ इ. २०.४.२०२१ या दिवशी दिव्याची ज्योत अधिक तेजस्वी दिसत असली, तरी ती एखाद्या काडीप्रमाणे ताठ असणे आणि अप्पांच्या मृत्यूची वार्ता कळल्यावर दिव्यात तेल असूनही १ – २ घंट्यांत ज्योत आपोआपच मालवणे : २०.४.२०२१ या दिवशी दुपारनंतर मी नामजप करायला बसले. तेव्हा मला दिव्याची ज्योत अधिक तेजस्वी दिसत असली, तरी ती एखाद्या काडीप्रमाणे ताठ होती. मला अप्पांच्या मृत्यूची वार्ता त्यांच्या मृत्यूनंतर २ घंट्यांनी नातेवाइकांनी कळवली. त्यानंतर दिव्यात तेल असूनही १ – २ घंट्यांत ज्योत आपोआपच मालवली. (मी ऑस्ट्रेलियात असल्याने कालगणना भारतापेक्षा साडेचार घंटे पुढे आहे.)
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अप्पांची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती होईल’, अशी माझी श्रद्धा आहे. ‘अप्पा रुग्णाईत असल्यापासून त्यांचे निधन होण्यापर्यंतच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आमचे मनोधैर्य न ढासळता आम्हाला या प्रसंगाकडे आध्यात्मिक दृष्टीने पहाण्याचे बळ मिळाले’, याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सोहा देव (मुलगी), सिडनी, ऑस्ट्रेलिया. (५.६.२०२१)
कै. अविनाश देसाई यांच्या सुनेला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे !‘२०.४.२०२१ या दिवशी माझे सासरे अविनाश दिनकर देसाई (अप्पा) यांचे निधन झाले. त्यांच्याविषयीच्या भावना मला शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. १. अप्पांचे व्यक्तीमत्त्व आनंदी, उत्साही, निर्मोही आणि निर्लोभी होते. त्यांच्यात क्षमाशीलता आणि सकारात्मकता होती. २. ते प्रत्येक कार्य मनापासून करायचे. त्यांनी केलेल्या कृती दोषविरहित आणि परिपूर्ण असायच्या. ३. अप्पा देवाची पूजा एवढी भावपूर्ण करायचे की, ‘आता देव बोलू लागतील’, असे वाटायचे. आमच्याकडे नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीवर वेगळेच तेज येत असे. ४. अप्पा नामजप करतांना किंवा सत्संग ऐकतांना तल्लीन होत असत. ५. अप्पांमध्ये ‘संतांमध्ये असावेत’, असे आदर्श गुण होते. ६. ते कुणाला त्रास न देता शांतपणे ईश्वरचरणी लीन झाले. ‘मला त्यांच्या सान्निध्यात रहाता आले’, हे मी माझे भाग्य समजते. आम्हाला त्यांची आठवण सातत्याने येत राहील. ‘ईश्वराने आता त्यांची काळजी घ्यावी आणि त्यांना सद्गती द्यावी’, ही त्याच्या चरणी प्रार्थना !’ – सौ. राधिका अमित देसाई (सून), चिंचवड, पुणे. (जुलै २०२१) |
|