तुळजापूर येथील प्राचीन श्रीविष्णु तीर्थ येथे अवैधरित्या बांधकाम करणार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील महंत मावजीनाथ महाराज यांनी केली होती मागणी

तुळजापूर येथील प्राचीन श्रीविष्णु तीर्थ (मंकावती कुंड)

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – शहरातील प्राचीन श्रीविष्णु तीर्थ (सध्या ‘मंकावती कुंड’ या नावाने प्रचलित आहे.) येथे अवैधरित्या बांधकाम करणारे भाजपचे नेते देवानंद रोचकरी यांच्यावर गुन्हा नोंद करून प्राचीन तीर्थकुंडाचे संरक्षण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला आहे. अवैध बांधकाम करणार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी येथील दशावतार मठाचे महंत मावजीनाथ महाराज यांच्यासह महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकटअरण्य महाराज, संजयदादा सोनवणे, जनक कदम पाटील, सुदर्शन वाघमारे यांनी ३१ मे २०२१ या दिवशी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली होती.

त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, नगर परिषद मुख्याधिकारी आशीष लोकरे, भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षक वैशाली गवई यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली होती. यासमवेतच जिल्हाधिकार्‍यांनी स्वत: श्रीविष्णु तीर्थाची पहाणीही केली होती. समितीने सादर केलेल्या अहवालानंतर जिल्हाधिकार्‍यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला; मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. (या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाई होऊन प्राचीन तीर्थकुंड अतिक्रमणमुक्त करून त्याचे जतन होणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते. – संपादक)

महंत मावजीनाथ महाराज यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की,

१. तुळजापूर नगर परिषदेच्या अधिकारक्षेत्रात असलेले श्रीविष्णु तीर्थ (मंकावती कुंड) हे पुरातत्त्व विभागाच्या महत्त्वपूर्ण वास्तूंमध्ये नोंदणीकृत आहे. हे कुंड प्राचीन असून त्याला श्री तुळजाभवानीदेवीशी संबंधित धार्मिक महत्त्व आणि इतिहास आहे.

२. तीर्थकुंडाचा विकास आणि स्वच्छता यांसाठी राज्यशासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या व्ययाची सर्व माहिती नगरपालिका प्रशासन, तसेच लेखा परीक्षण विभाग यांच्याकडे उपलब्ध आहे. तीर्थकुंडावर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

श्रीविष्णु तीर्थाचा इतिहास

१ सहस्र २४४ चौरस मीटर आकाराच्या श्रीविष्णु तीर्थाची महती स्कंद पुराण, तुळजाई माहात्म्य आणि देविविजय पुराणात आहे. विष्णुभक्त श्री गौतम यांनी तुळजापूर येथे हे तीर्थकुंड बांधल्याचा दाखला दिला जातो.