मावळ (पुणे) तालुक्यातील २ सहस्र ६३४ शेतकरी अतीवृष्टीमुळे बाधित

प्रातिनिधिक छायाचित्र

मावळ (पुणे) – १९ जुलै ते २२ जुलै या काळात मावळ परिसरात झालेल्या अतीवृष्टीमुळे भातशेतीसह इतर पिकांची मोठी हानी झाली आहे. येथे बहुतांश शेतकरी भाताची लागवड करतात. मावळ तालुक्यातील २ सहस्र ६३४ शेतकरी या अतीवृष्टीमुळे बाधित झाले असल्याचा नजर अहवाल मावळ तालुका कृषी विभागाने सिद्ध केल्याची माहिती मावळ तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली.

मावळ तालुक्यात जवळपास १२ सहस्र ९०० हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड करण्यात आली आहे. २ सहस्र ४५६ शेतकर्‍यांच्या १ सहस्र १८ हेक्टर क्षेत्रातील भात पिकांची हानी झाली. तसेच ४६ हेक्टर क्षेत्रातील भुईमूग, १०८ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, अशा साधारण १ सहस्र १७२ हेक्टर क्षेत्रातील जिरायती पिकांची अनुमाने ७९ लाख ६९ सहस्र ६०० रुपयांची हानी झाली आहे. बागायती क्षेत्रापैकी १९.३० हेक्टर क्षेत्र असलेल्या ४९ शेतकर्‍यांची ६ लाख ६१ सहस्र ५०० रुपयांची हानी झाली आहे.