सनातनचे १०६ वे समष्टी संत पू. माधव साठेकाका यांचे आज २०.७.२०२१ या दिवशी तिसरे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. नवीन साधकांना आधार देणे, स्थिर रहाणे आणि अहं अल्प असणे
‘मी आणि माझी बहीण साधनेत नवीन होतो, तेव्हा आम्हाला गावठाण, पुणे येथे पू. काकांचे मार्गदर्शन आणि सहवास मिळाला. त्या वेळी पू. साठेकाकांची ‘स्थिरता, इतरांना आधार देणे आणि अहं अल्प असणे’ ही गुणवैशिष्ट्ये आम्हाला अनुभवता आली.
२. साधकांचे कौतुक करून प्रोत्साहन देणे
गुरुपौर्णिमेच्या सेवेनिमित्त ठिकठिकाणी प्रवचने घ्यायची सेवा होती. मला गुरुपौर्णिमेच्या आयोजन सेवेचे दायित्व मिळाले होते. त्या वेळी आम्ही अल्प कालावधीमध्ये एकूण ३६ प्रवचने घेतली. अल्प कालावधीत प्रवचनांच्या माध्यमातून आम्ही अधिक लोकांपर्यंत पोचल्याने पू. काकांनी आमचे कौतुक करून आम्हाला प्रोत्साहन दिले.
३. सेवेमध्ये साहाय्य करणे
एकदा पुण्यातील जंगली महाराज मंदिरात उत्सवानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचा मोठा कक्ष लावला होता. वितरणही बर्यापैकी झाले होते; पण आमचा हिशोब जुळत नव्हता. नेमके त्याच वेळी आम्हाला गावाला जायचे होते. ‘गावाला जाण्यापूर्वी हिशोबाची सेवा पूर्ण करायची’, असे ठरवलेले असतांनाही ती पूर्ण होत नव्हती. तेव्हा मला आणि ताईला ताण आला; पण पू. साठेकाकांनी आम्हाला आधार दिला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही गावाला जा. मी हिशोबाचे पहातो.’’ पू. काकांचे शब्द एवढे आश्वासक होते की, आमच्या मनावरचा ताण न्यून झाला. पू. काकांमुळेच आम्हाला साधनेत पुष्कळ शिकायला मिळाले, यासाठी श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.
४. पू. साठेकाकांनी देहत्याग केल्याचे वृत्त कळल्यावर त्यांच्या साधनेच्या चांगल्या स्थितीमुळे मन स्थिर रहाणे
पू. माधव साठेकाकांनी देहत्याग केल्याचे वृत्त कळल्यावर माझ्या मनाला धक्का बसला नाही किंवा अस्वस्थही वाटले नाही. माझे मन एकदम स्थिर होते. तेव्हा माझ्या मनात क्षणभर ‘मला आता कशाचेच काही वाटेनासे झाले आहे का ?’, असा विचार येऊन गेला. नंतर पू. काकांच्या संतत्वाचे वृत्त वाचल्यावर ‘मला स्थिर का वाटत होते ?’, याचा उलगडा झाला. ती सगळी पू. काकांच्या साधनेची किमया होती.’
– सौ. गौरी नीलेश कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१५.५.२०२१)