गोव्यातील संचारबंदी आणखी वाढणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २५ जून (वार्ता.) – राज्यात सध्या लागू असलेल्या संचारबंदीमध्ये आणखी काही दिवस वाढ केली जाणार आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्यात ९ मेपासून लागू झालेली संचारबंदी अनेकवेळा वाढवण्यात आली. ही संचारबंदी सोमवार, २८ जून या दिवशी सकाळी ७ वाजता संपणार आहे.

सरकारी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग पूर्ववत चालू होणार

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील अनेक खाटा रिक्त होत आहेत आणि यामुळे २ शासकीय रुग्णालये वगळता इतर सर्व शासकीय रुग्णालयांचा ‘कोरोना रुग्णालयां’चा दर्जा हटवण्यात आला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये आता बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) पूर्ववत चालू केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.