५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रोहा (जिल्हा रायगड) येथील चि. शौर्य संकेत ठमके (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. शौर्य संकेत ठमके ही एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या ! 

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

रोहा (जिल्हा रायगड) येथील चि. शौर्य संकेत ठमके याच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. शौर्य ठमके

१. जन्मापूर्वी

१ अ. चि. शौर्यची आई नोकरी करत असल्याने ‘ती गरोदर असतांना नामजपादी उपाय कधी करणार ?’, असे वाटणे; परंतु आधुनिक वैद्यांनी पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितल्याने तिला उपाय करण्यास वेळ मिळणे : ‘शौर्यची आई सौ. ईश्वरी नोकरी करायची. ‘ती गरोदर आहे’, हे समजल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘ही कामावर जाणार, तर बाळासाठी नामजपादी उपाय केव्हा करणार ?’ काही दिवसांनी तिला त्रास चालू झाल्याने आधुनिक वैद्यांनी पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले. त्यामुळे तिला उपाय करण्यासाठी वेळ मिळाला.

१ आ. शौर्यच्या आईची प्रकृती चिंताजनक असतांना घरातील सर्व जण स्थिर असणे : ईश्वरी गरोदर असतांना आधुनिक वैद्यांनी तिची पुष्कळ काळजी घ्यायला सांगितली; कारण परिस्थिती पुष्कळ चिंताजनक होती. त्या स्थितीत घरातील आम्ही सर्व स्थिर होतो. गरोदरपणात भार्गवी (नात, सौ. ईश्वरी यांची मुलगी) तिच्या आईची काळजी घ्यायची. ती आईला सांगायची, ‘अधिक वाकू नकोस. नामजप कर’ आणि तीपण प्रार्थना करायची.’ – सौ. संजीवनी ठमके (शौर्यची आजी), रोहा, नागोठणे, रायगड.

१ इ. पहिल्या बाळंतपणात पुष्कळ त्रास झाले असल्याने पुन्हा गरोदर असल्याचे कळताच ताण येणे आणि त्या वेळी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करणे : ‘आधुनिक वैद्यांकडून ‘गरोदर होऊन दोन मास झाले आहेत’, हे कळल्यावर मला पुष्कळ ताण आला होता; कारण पहिल्या बाळंतपणात मला पुष्कळ मानसिक आणि शारीरिक त्रास झाले होते. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘गुरुमाऊली, या वेळी तुम्ही सगळे काही ठीक करा.’

१ ई. मला पुष्कळ शारीरिक त्रास होत होता. तेव्हा सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी मला ‘श्री विष्णवे नमः।’ हा नामजप करायला सांगितला होता. तो नामजप करतांना मला पुष्कळ प्रसन्न वाटायचे. ‘बाळही नामजप करत आहे’, असे मला जाणवायचे.

१ उ. . दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले पू. वामन यांच्या आईने गरोदरपणात केलेले प्रयत्न वाचून तसे प्रयत्न करणे  : एकदा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. वामन यांच्या संदर्भातील लेख वाचतांना माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्यांच्या आईने गरोदरपणात ‘बाळ कमळाच्या फुलात आहे आणि श्रीविष्णूचे चैतन्य मिळत आहे’, असे प्रयत्न केले होते. ते वाचून ‘आपणही तसे प्रयत्न करायला हवेत’, असे मला वाटले आणि देवाने माझ्याकडून तसे प्रयत्न करवून घेतले.

१ ऊ. ‘प्रसुती सहाव्या मासात कधीही होऊ शकते’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितल्यावर भीती वाटणे आणि नामजपादी उपाय केल्यानंतर बाळाने आतून प्रतिसाद देणे : सहाव्या मासात पोट दुखत असल्याने मी दवाखान्यात गेले होते. तेव्हा आधुनिक वैद्यांनी ‘प्रसुती कधीही होऊ शकते’, असे सांगितले. त्यानंतर मला पुष्कळच भीती वाटली. घरचे सगळे घाबरले होते. तेव्हापासून मी पूर्ण झोपूनच होते. तपासून घरी आल्यावर माझ्या सासूबाई आणि नणंद (कु. सायली ठमके) यांनी बाळासाठी उपाय केले. मी पोटावर हात ठेवून ‘नामजप करणे, रामरक्षा स्तोत्र म्हणणे’, असे उपाय स्वतःसाठी आणि बाळासाठीही करायचे. त्या वेळी ‘बाळ आतून प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवायचे.

१ ए. संतांचे आशीर्वाद मिळणे

१. मी ६ मासांची गरोदर असतांना पू. माई (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (प.पू. दास महाराज यांच्या पत्नी)) यांना संपर्क केल्यावर मी गरोदर असल्याचे सांगितले. त्या वेळी त्यांनी ‘तुला मुलगा होणार’, असा आशीर्वाद दिला.’ – सौ. ईश्वरी ठमके (शौर्यची आई), रोहा, नागोठणे, रायगड.

२. ‘सातव्या मासात कु. सायली (बाळाची आत्या, ती रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करते.) हिची रामनाथी आश्रमामध्ये पू. भावेकाकांशी भेट झाली. त्या वेळी त्यांनी घरच्यांची चौकशी केली. तेव्हा सायलीने सांगितले, ‘‘वहिनी पुन्हा गरोदर आहे आणि तिला पहिल्या गरोदरपणात जसा त्रास झाला, तसा आताही होत आहे.’’ तेव्हा पू. काकांनी मला भ्रमणभाष करायला सांगितल्यावर मी त्यांना भ्रमणभाष केला. त्या वेळी मी पू. काकांना सर्वकाही सांगितले. त्यावर त्यांनी ‘आधुनिक वैद्यांनी सांगितले आहे, तसे करा. अधिक आराम करायला सांगा. सर्व ठीक होईल. परात्पर गुरु डॉक्टर सर्व ठीक करतील’, असा आशीर्वाद दिला.’ – सौ. संजीवनी ठमके

२. जन्म

२ अ. पोटात दुखू लागल्याने चिकित्सालयात जाणे आणि त्या वेळी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना होऊन जलद गतीने नामजप होणे : ‘१.१२.२०१९ या रात्री माझ्या पोटात थोडे दुखत होते. मला वाटले, ‘नेहमीप्रमाणे दुखत असेल’; म्हणून विश्रांती घेतली. २.१२.२०१९ या दिवशी सकाळी पोटात पुष्कळच दुखायला लागल्यामुळे आम्ही चिकित्सालयात गेलो. त्या वेळी आधुनिक वैद्यांना यायला पुष्कळ वेळ लागणार होता. तेव्हा माझ्याकडून ‘परम पूज्य, तुम्हीच मला आणि बाळाला वाचवा’, अशी प्रार्थना झाली. माझा नामजप जलद गतीने व्हायला लागला.

२ आ. प्रसुतीच्या वेळी अडचण आल्यावर सतत नामजप चालू असणे आणि परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर बाळाचा जन्म होणे : आधुनिक वैद्यांनी तपासल्यावर त्यांनी ‘टाके काढून सीझर करायला लागेल’, असे सांगितले. बाळाची परिस्थिती गंभीर होती. शस्त्रकर्म  करायला उशीर झाल्यामुळे मला पुष्कळ वेळ वेदना होत होत्या. शस्त्रकर्म करतांना सगळे आधुनिक वैद्य आणि परिचारिका मला धीर देत होत्या. त्या वेळी मला वाटत होते, ‘परात्पर गुरुदेव माझे शस्त्रकर्म करत आहेत.’ माझे ‘जय गुरुदेव’, ‘प.पू. डॉक्टर’ आणि ‘श्रीकृष्ण’, हे नामजप चालू होते. प्रार्थना केल्यावर बाळाचा जन्म झाला.’ – सौ. ईश्वरी ठमके

२ इ. जन्म झाल्यानंतर बाळाला काचेच्या पेटीत ठेवल्यावर त्याने न रडणे आणि नामजप अन् श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर बाळ रडणे : ‘जन्म झाल्यानंतर बाळाला काचेच्या पेटीत ठेवायला सांगितले. बाळाला काचेच्या पेटीत ठेवण्यासाठी लहान मुलांच्या अन्य रुग्णालयात नेले. काचेच्या पेटीत ठेवल्यावर बाळ रडत नव्हते, तसेच शी-शू करत नव्हते. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘२४ घंट्यांत बाळाने शी-शू केली नाही, तर मला सांगा.’’ बाळाजवळ बसून आमची सारखी प्रार्थना चालू होती. रात्री २ वाजता मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. त्या वेळी मी बाळाच्या पोटावर हात ठेवून नामजप करत होते. रात्री २.२० वाजता बाळाने शी केली. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘आता बाळाकडे लक्ष ठेवा. बाळ रडत नाही.’’ तेव्हा मी बाळाच्या कानात सांगितले, ‘तुझे प्रारब्ध तुला भोगायचे आहे. तू देवाला आळव. मी केवळ बाहेरून उपाय करू शकते.’ थोड्या वेळाने बाळ रडायला लागले.’ – सौ. संजीवनी ठमके

२ ई. ‘आमची आर्थिक स्थिती चांगली नव्हती; पण बाळासाठी पुष्कळ व्यय झाला, तरी घरातील आम्ही सर्व स्थिर होतो.’ – सर्व कुटुंबीय (३०.१०.२०२०)

३. जन्म ते १ मास

३ अ. बाळाने आईच्या पोटातच साडेसाती भोगली असून गुरूंमुळे बाळ सुरक्षित असल्याचे ज्योतिषांनी सांगणे : ‘बाळाच्या जन्मानंतर तिसर्‍या दिवशी रात्री १०.३० ला आम्ही चिकित्सालयात जात होतो. तेव्हा नेहमीच्या ज्योतिषांनी आम्हाला बोलावले आणि आमची चौकशी केली. ते म्हणाले, ‘‘बाळाने आईच्या पोटात असतानाच साडेसाती भोगली आहे. बाळ केवळ तुमच्या गुरूंमुळे सुरक्षित आहे. तुमचे गुरु किती महान आहेत !’’ त्यानंतर आम्ही बाळाला ५ व्या दिवशी घरी आणले.’ – सौ. संजीवनी ठमके (शौर्यची आजी)

३ आ. रामनाथी आश्रमाचे नाव काढताच शौर्यने डोळे उघडून एकटक बघणे : ‘डिसेंबर २०१९ मध्ये मी आठ दिवसांसाठी घरी गेले होते. त्या वेळी चि. शौर्य सोळा दिवसांचा होता. त्या ८ दिवसांच्या कालावधीत मी शौर्यला बर्‍याच वेळा हातात घेतले; परंतु त्याने कधीही डोळे उघडून माझ्याकडे पाहिले नाही. ‘मी उद्या रामनाथीला जाणार आहे’, असे म्हटल्यावर त्याने डोळे उघडले. त्या वेळी तो माझ्याकडे एकटक बघत होता.’ – कु. सायली ठमके (शौर्यची आत्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४. वय १ ते ३ मास

४ अ. पू. माई (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक) यांनी सुचवल्यानुसार बाळाचे नाव ‘शौर्य’ असे ठेवणे : ‘बाळाच्या नामकरण विधीसाठी आम्ही त्याची २ – ३ नावे काढली होती. पू. माई (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक) यांना भ्रमणभाष करून ती नावे सांगून ‘कोणते नाव ठेवायचे ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी ‘शौर्य’ हे नाव ठेवायला सांगितले आणि त्यांनी  ‘हिंदु राष्ट्रासाठी आपल्याला शूर होणे आवश्यक आहे. नावाप्रमाणे तो शूर आणि धाडसी होईल’, असा आशीर्वाद त्यांनी त्याला दिला.’ – सौ. ईश्वरी ठमके (शौर्यची आई)

४ आ. ‘बाळ दीड मासाचे असतांना त्याच्या छातीवर ‘ॐ’ उमटले होते. त्याच्या बाजूलाच दोन नेत्रांसारख्या आकृत्या उमटल्या होत्या. काहींना ते गुरुमाऊलींचे, तर काहींना देवीचे नेत्र वाटत होते.’ – सर्व कुटुंबीय

५. वय ३ ते ६ मास

५ अ. परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी जाणवलेली सूत्रे

५ अ १. जन्मोत्सवाची माहिती ऐकतांना खुदुखुदु हसून आनंद व्यक्त करणे : ‘गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवाच्या एक आठवड्यापूर्वी मी त्याला जन्मोत्सवाची सर्व माहिती सांगत होते. गुरुमाऊली, श्रीविष्णु, श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्री सत्यनारायण यांचे वर्णन मी त्याला सांगत होते. त्या वेळी तो मोठमोठ्याने खुदुखुदु हसून आनंद व्यक्त करत होता. त्या वेळी ‘जन्मोत्सवाची वार्ता ऐकून तो त्या दिवसाची पुष्कळ आतुरतेने वाट पाहत आहे’, असे मला जाणवले.

५ अ २. जन्मोत्सवाचा कार्यक्रमाच्या वेळी झोपायची वेळ असूनही जागा आणि शांत असणे : १३.५.२०२० जन्मोत्सवाचा कार्यक्रम दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होता. ही वेळ त्याच्या झोपेची असूनही तो कार्यक्रमाच्या वेळी जागा होता, तसेच तो शांत होता. ‘तो गुरुमाऊलीचे चैतन्य ग्रहण करण्यासाठी जागा होता’, असे घरात सगळ्यांना वाटले.

५ अ ३. दुसर्‍या दिवशीचा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी त्याची दृष्टी स्थिर जाणवत होती. ‘जणू गुरुमाऊली त्याच्या समोर आहेत आणि तो त्यांना न्याहाळत आहे’, असे मला जाणवले.

५ अ ४. कार्यक्रम पहातांना जेव्हा गुरुमाऊलींचे छायाचित्र भ्रमणभाषवर दिसत होते. त्या छायाचित्राकडे तो शांतपणे आणि निरागसपणे पहात होता.

५ आ. इतर सूत्रे

१. श्रीकृष्णाचे नाव उच्चारल्यावर त्याला पुष्कळ आनंद होतो. ‘परात्पर गुरु डॉक्टर बाबा’, असे म्हटल्यावर तो हसतो.

२. मी रात्री ९.३० ते १० या कालावधीत ‘महाशून्य’ हा नामजप मोठ्याने करत होते. तेव्हा ‘तोही ‘महाशून्य’ असे म्हणत आहे’, असे मला जाणवले.

३. जेव्हा मी त्याला भावप्रयोग सांगायचे, तेव्हा ‘ते ऐकतांना तो त्याच प्रकारे भाव ठेवत आहे’, असे मला जाणवायचे.

४. एकदा मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे एकत्रित छायाचित्र असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ त्याच्या डोळ्यांसमोर धरला. तेव्हा त्याने लगेच हात जोडून नमस्कार केला. त्या वेळी ‘त्याच्यात आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात सुसंवाद चालू आहे’, असे मला जाणवले.

५. संध्याकाळी दिवाबत्ती केल्यावर मी त्याला घेऊन ‘शुभं करोति’, स्तोत्र आणि श्लोक म्हणायचे. तेव्हा तो ते सर्व शांतपणे ऐकायचा आणि देवघरातील सर्व देवांना न्याहाळायचा.’ – कु. सायली ठमके

६. वय १० मास

६ अ. भाववृद्धी सत्संग शांतपणे ऐकणे : ‘१७ ते २५.१०.२०२० या कालावधीत नवरात्रीचे भाववृद्धी सत्संग चालू होते. त्या वेळी सत्संग चालू झाला की, तो शांत बसून ऐकायचा. तसेच त्या सत्संगात ऐकवले जाणारे घंटानाद आणि शंखनाद यांकडे त्याचे लक्ष जायचे अन् त्याला ते पुष्कळ आवडत असत.’ – सौ. संजीवनी ठमके

६ आ. सात्त्विकतेची ओढ

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील त्यांच्या छायाचित्रांकडे बघून तो बोलतो. शौर्यला श्रीकृष्णाकडे बघायला सांगितल्यावर तो श्रीकृष्णाच्या चित्राकडे बघतो आणि हसतो. त्या वेळी ‘तो श्रीकृष्णाशी बोलत आहे’, असे जाणवते.’ – सौ. ईश्वरी ठमके

२. ‘शौर्यला लहानपणापासूनच प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘भक्तराजा, तू माय मी लेकरू, तुझी कशी सेवा करू ?’, हे भजन म्हणत झोपवावे लागते आणि झोपल्यावर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लावावा लागतो.

३. शौर्यला प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आणि हनुमंत हे पुष्कळ आवडतात. तो कितीही रडत असला, तरी प.पू. बाबा किंवा श्रीकृष्ण यांच्या चित्राजवळ घेऊन गेलो की, शांत होतो.

४. देवाची घंटा किंवा झांज यांच्याशी खेळण्यास त्याला आवडते आणि झांज हातात असली की, तो ती भजनात वाजवल्याप्रमाणे वाजवतो.’ – श्री. सूर्यकांत ठमके (शौर्यचे आजोबा), रोहा, नागोठणे, रायगड.

५. ‘शौर्यची आई त्याला पेज भरवत असतांना प्रतिदिन कृतज्ञतागीत ऐकवते. कधी दुसरे भजन लावले, तर तो रडायला लागतो. कृतज्ञतेचे गीत लावल्यावर तो शांत राहून पेज पितो.’ – सौ. संजीवनी ठमके आणि श्री. संकेत ठमके (शौर्यचे बाबा), रोहा, नागोठणे, रायगड.

६ इ. ‘मी बाहेरून काम करून आल्यावर कितीही दमलो असलो, तरी त्याला पाहिल्यावर मला आलेला थकवा लगेच दूर होतो आणि माझे मन प्रसन्न होते.’ – श्री. संकेत ठमके

६ ई. ‘शौर्य हसतांना निरागस वाटतो. मी त्याला कधी कधी ‘बाळकृष्ण’ म्हणते. तेव्हा तो हसतो.’ – कु. भार्गवी ठमके (शौर्यची बहीण), रोहा, नागोठणे, रायगड.

७. वरील लिखाण करतांना आलेली अनुभूती : ‘वरील लिखाण करतांना माझे मन प्रसन्न होते. लिखाण करतांना माझा भाव जागृत होत होता आणि गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होत होती.’ – सौ. संजीवनी ठमके

​‘हे श्रीकृष्णा, हे गुरुमाऊली तुम्हीच आमच्याकडून हे लिखाण करवून घेतलेत’, याबद्दल आम्ही आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’ – सौ. संजीवनी ठमके (शौर्यची आजी) आणि सर्व कुटुंबीय (३०.१०.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक