‘२६.१२.२०२० या दिवशी सायंकाळी ५ वाजता एक पिवळ्या रंगाची चिमणी सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात आली होती. या चिमणीकडे पाहून चांगले वाटत होते. ध्यानमंदिरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांच्या खोक्यावर ही चिमणी बसली होती. ‘चिमणी प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्याकडे आकृष्ट झाल्याने हे चैतन्य ग्रहण करण्यासाठी ध्यानमंदिरात आली आहे’, असे जाणवले. काही कालावधीत चैतन्य ग्रहण केल्यावर चिमणी तेथून उडून गेली.
१. चिमणीच्या उदाहरणातून सात्त्विक जिवांच्या संदर्भात लक्षात आलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१ अ. सात्त्विक जीव सात्त्विक वातावरण, वास्तू किंवा वस्तू यांकडे आकृष्ट होण्यामागील कारणे : सात्त्विक जिवांना संतांच्या वस्तूंतील उदा. काठी, पादुका, वस्त्र यांतील, संतांच्या आश्रमासारख्या वास्तूतील आणि यज्ञाच्या जवळील वातावरणातील सात्त्विकता जाणवते. त्यामुळे ते सात्त्विक वातावरण, वास्तू किंवा वस्तू यांकडे आकृष्ट होतात.
१ आ. सात्त्विक जिवांना सात्त्विक वातावरण, वास्तू किंवा वस्तू यांतील सात्त्विकता ग्रहण करता येणे : सात्त्विक जिवांमध्ये वातावरण उदा. यज्ञस्थळाजवळील वातावरण, वास्तू, उदा. संतांचा आश्रम किंवा एखादी वस्तू, उदा. संतांच्या पादुका यांतील सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता असते. त्यामुळे चिमणी सारखे सात्त्विक जीव प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांकडे आकृष्ट होतात आणि त्यांतील सात्त्विकता ग्रहण करतात.
१ इ. सात्त्विक जिवांनी ग्रहण केलेली सात्त्विकता काही काळ टिकून रहाणे : सात्त्विक जिवांनी ग्रहण केलेली सात्त्विकता काही काळ धारण करून ठेवतात. त्यामुळे ते रज-तम प्रधान वातावरण, वास्तू किंवा वस्तू यांपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतात.
२. सात्त्विक जिवांनी सात्त्विक वातावरण, वास्तू किंवा वस्तू यांकडे येऊन सात्त्विकता ग्रहण करण्यामागील कार्यकारणभाव
जेव्हा सात्त्विक जिवांचा अंत्यकाळ जवळ येतो, तेव्हा त्यांना त्याची जाणीव होते म्हणजे, पूर्वसूचना मिळते. ‘स्वत:ला चांगल्या योनीत पुढचा जन्म मिळावा’, यासाठी सात्त्विक जीव सात्त्विक वातावरण, वास्तू किंवा वस्तू यांतून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता ग्रहण करून ती काही काळ किंवा मृत्यूपर्यंत धारण करून ठेवतात. या सात्त्विक शक्तीच्या बळावर सात्त्विक जिवांना पुढील ४ – ५ जन्म वगळून त्यापुढच्या योनीत जन्म मिळतो. त्यामुळे ‘अनेक जीव एखाद्या संतांच्या आश्रमात येऊन किंवा एखाद्या देवतेच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून नंतर स्वत:चे प्राण त्यागतात’, असे आढळून येते.
३. माणसापेक्षा पशूपक्षांना सूक्ष्मातील कळण्याची क्षमता अधिक असणे
वरील सूत्रांतून आपल्या हे लक्षात येते की, पशुपक्षांमध्ये मन आणि बुद्धी यांचा अत्यल्प वापर होत असल्यामुळे त्यांना देवाचे सूक्ष्मातून कळणारे संकेत सहजरित्या कळतात. त्यामुळे ते मृत्यूपूर्वी सात्त्विक ठिकाणी जाऊन सात्त्विकता ग्रहण करण्याचा आणि पुढील जन्म चांगल्या योनीत प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
३ अ. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात किंवा यज्ञस्थळी काही वेळा फुलपाखरे येऊन संत आणि सद्गुरु यांच्या जवळ किंवा अंगावर बसतात. काही फुलपाखरे यज्ञस्थळी मांडलेल्या देवतांच्या चित्रांभोवती प्रदक्षिणा घालतात. काही फुलपाखरे वरील कृती करून मरण पावतात.
३ आ. सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर असणार्या यज्ञकुंडातून यज्ञाच्या वेळी प्रक्षेपित होणारी सात्त्विकता आणि चैतन्य ग्रहण करण्यासाठी गेल्या वर्षी एका चिमणीने आश्रमाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या जवळ वरच्या बाजूला एक घरटे बांधले होते. यज्ञ चालू झाल्यावर या घरट्यातील चिमणी आणि तिची पिल्ले किलबिलाट करून आनंद व्यक्त करत होत्या.
३ इ. त्रिपुरा राज्यातील श्रीत्रिपुरसुंदरीदेवीच्या मंदिराच्या समोरील तलावातील कासवे त्यांचा अंत्यकाळ जवळ आल्यावर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून नंतर प्राणत्याग करतात. याउलट मनुष्याचे मन आणि बुद्धी तर्क-वितर्क करण्यासाठी पुष्कळ प्रमाणात कार्यरत झालेले असतात. त्यामुळे मनुष्याला सूक्ष्मातील कळत नाही आणि मनुष्याच्या अहंकारामुळे त्याला स्वत:च्या मृत्यूचीही पूर्वसूचनाही मिळत नाही. त्यामुळे मनुष्य सात्त्विकता ग्रहण करण्यासाठी प्रयत्नरत न रहाता रज-तम प्रधान वृत्तीने वागण्यात अग्रेसर असतो. त्यामुळे रज-तम प्रधान मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याला त्याच्या कर्मानुसार वनस्पती किंवा पशुपक्षी यांच्या हीन योनीत जन्म प्राप्त होतो.
‘हे भगवंता, चिमणीच्या उदाहरणातून आम्हाला सात्त्विकतेचे महत्त्व लक्षात आणून दिले, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१.२०२१)
सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |