बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू न केल्यास आत्मदहन करीन ! – जगद्गुरु परमहंसाचार्यजी महाराज, अयोध्या

अयोध्या – बंगालमधील हिंसाचार थांबावा आणि पीडितांना न्याय मिळावा यांसाठी २४ मेपर्यंत बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू न केल्यास २५ मे या दिवशी मी आत्मदहन करीन, अशी चेतावणी अयोध्येच्या रामघाट येथील तपस्वी छावनीचे जगद्गुरु परमहंसाचार्यजी महाराज यांनी दिली आहे.

नुकताच एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात जगद्गुरु परमहंसाचार्यजी महाराज यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला आहे. तेथे सहस्रो लोकांची हत्या होत आहे. निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांच्यावर आक्रमण करण्यात आले. त्यांनतर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री यांच्या ताफ्यावरही आक्रमण झाले. तेथे मोठी सुरक्षा असलेल्या मंत्र्यांवर आक्रमणे होत असतील, तर सामान्य जणांची काय स्थिती असेल ? १६ ऑगस्ट १९४६ मध्ये ज्याप्रकारे कोलकातामध्ये ‘डायरेेक्ट अ‍ॅक्शन’च्या नावाखाली हिंदूंचा नरसंहार करण्यात आला, त्याप्रमाणे आताही ममता बॅनर्जी रणनीतीपूर्वक हिंसाचार घडवून आणत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हिंसाचारात ज्यांची घरे जाळण्यात आली आहे, त्यांना घरे बांधून द्यावीत आणि बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करावे. ही मागणी मान्य न झाल्यास २५ मे या दिवशी मी याच चितेवर बसून स्वत:ला अग्नीच्या स्वाधीन करीन.