होय, आम्ही हिंदु राष्ट्र वेडे आहोत !

गुढीपाडव्याच्या दिवशी सनातनचे संत पू. संदीप आळशी यांची एक चौकट प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात भाव कसा ठेवावा ?’, हे सांगतांना त्यांनी सांगितले, ‘साधकांनी, तसेच धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी हिंदु राष्ट्रातच गुरु किंवा देव यांना पहायचा प्रयत्न केला, म्हणजे ‘हिंदु राष्ट्र्र स्थापनेचे कार्य, ही गुरुसेवा असून ते ईश्वरप्राप्तीचे साधन आहे’, असा भाव ठेवला, तर त्यांना हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्याविषयी प्रेम वाटून त्यासाठी जीवन समर्पित करण्याची त्यांची सिद्धता होईल.’ या संदेशातून पू. संदीप आळशी यांनी आम्हा सर्वांना हिंदु राष्ट्ररूपी गुरुदेवांच्या चरणी त्यांच्या ओंजळीत उचलून अर्पण केले, असे दिसून त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली. पू. संदीपदादांचे विचार माझ्यासाठी नेहमीच दिशादर्शक आहेत. त्यांच्या विचारांद्वारे हिंदु राष्ट्र्राची पावले चालण्यासाठी ते नेहमीच मला स्फूर्ती देत असतात. त्यांची राष्ट्र-धर्माची प्रत्येक चौकट माझ्या हिंदु राष्ट्र विचारांचे जन्मस्थान आहे. याच पू. संदीपदादांच्या हिंदु राष्ट्राच्या विचारांचा आधार घेऊन आणि श्रीगुरुचरणांच्या स्मरणाने समस्त हिंदु युवकांना शक्ती अन् भक्ती यांचे आवाहन करत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जी शौर्यजागृती व्याख्याने होतात, त्या व्याख्यानांच्या प्रारंभी विविध शौर्यगीते लावली जातात. त्यापैकी एक गीत ‘लोकमान्य’ या मराठी चित्रपटातील ‘या जीवन अपुले सार्थ करा रे’ हे लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित गीत, या गीताशी स्वरक्षण उपक्रमाशी जोडलेला प्रत्येक प्रशिक्षक आणि धर्मप्रेमी यांचे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. या गीतामुळे आम्हा प्रशिक्षकांची मने ही एकमेकांत मिसळून हृदयाला हृदय जोडले गेले आहे. या गीताचा अर्थ संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदु युवकांना ध्येयनिष्ठ करण्यासाठी प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या प्रत्येकालाच या गीताचे बोल आणि भावार्थ ध्येयाचे स्मरण करून देणारा ठरो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !

गुरुपौर्णिमेच्या प्रवचनामध्ये एक उल्लेख असतो, ‘गुरूंच्या देहधारी रूपाची सेवा करणे, हे जसे गुरूंचे कार्य आहे, तसे गुरूंच्या समष्टी रूपाची म्हणजे राष्ट्र-धर्माची सेवा करणे, हीसुद्धा गुरुसेवाच आहे. खरा शिष्य गुरूंच्या याच समष्टी रूपाची सेवा करतो.’ यानुसार आणि पू. संदीपदादा यांनी सांगितल्याप्रमाणे हा लेख लिहीत असतांना तसा भाव ठेवल्यावर ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द उच्चारल्यावरच भावजागृती होत होती. या लेखात भक्ती, भगवंत, गुरु असे शब्द पुष्कळ अल्प वेळा आले आहेत; पण पू. संदीपदादांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्रातच गुरु आणि देव बघून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जणू श्री गुरूंचे विराट रूप हिंदु राष्ट्राच्या रूपात उभे आहे’, असे दिसून हे गीत ऐकतांना भगवंताविषयी खूप भावजागृती होण्यासह लढाऊ वृत्ती जागृत होत होती. या दोन्हींचा अनोखा संगम हृदयामध्ये या वेळी होत होता. या गीताचा भावार्थ गुरुचरणी समर्पित करत आहे. सर्वांना एकच विनंती हा लेख वाचतांना ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाच्या जागी गुरु किंवा देव हा भाव ठेवून वाचूया, म्हणजे आपल्याला पू. संदीपदादांच्या विचारांतील अनुभूती घेता येईल, तसेच व्यष्टी भाव असणार्‍या जिवांनाही श्री गुरु आणि भगवंत यांना अनुभवता येईल.

श्री. सुमित सागवेकर

या जीवन अपुले सार्थ करा रे
राष्ट्रभक्ती निःस्वार्थ करा रे
एकजुटीने कार्य करा या देशाचे
या साथी बना अन् सार्थ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे
जागृत होऊन कंकण बांधू दिवसरात्र जगण्याचे

हिंदु युवकांनो, हे जीवन आपल्याला राष्ट्र आणि धर्म यांच्या सेवेत सार्थकी लावायचे आहे. या जीवनाचे खरे सार्थक देव, देश आणि धर्म यांचे कार्य करण्यातच आहे. आपल्याला जी राष्ट्रभक्ती करायची आहे, ती निःस्वार्थपणे करण्यास आता सिद्ध होऊया. आपली जात-पात, भाषा, पद, पक्ष, संघटना हे सर्व बाजूला सारून हिंदूसंघटन करून एकजुटीने आपल्याला या पवित्र मातृभूमीचे कार्य राष्ट्रभक्तीच्या बळाने करायचे आहे. आपल्याला एकमेकांचे साथीदार बनायचे आहे, सर्व धर्माभिमानी हिंदूंना एकमेकांचे साथीदार आणि हिंदु राष्ट्राचे भागीदार बनवून जीवन सार्थ करण्यासाठी आता पुढे सरसावण्याची हीच ती वेळ ! आज आपली मातृभूमी आपल्याला हाक मारते आहे. आज आपण होऊ तिचे मूल, स्वत:च्या आयुष्याची चूल झाली तरी चालेल, या भावाने आपली मातृभूमी आपल्याला पुकारत आहे. त्यामुळे आता जागृत होऊन हिंदु राष्ट्रासाठी दिवसरात्र झटण्यासाठी आपण शपथबद्ध होऊ या. या राष्ट्राला हिंदु राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी आणि शौर्याच्या जागृतीने पराक्रमाचा इतिहास निर्माण करण्यासाठी अन् विश्वकल्याणासाठी धर्मरक्षणाचे अन् क्षात्रतेजाचे कंकण आपण सारे मिळून भारतभूच्या भोवती बांधूया.

मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणांचे
फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे घेऊ
हे ब्रीद हाती आसेतुसिंधू नव हिंदुस्थानाचे

हिंदु युवकांनो, माझा हा देह आणि श्वास देवाची भक्ती, धर्मरक्षण अन् राष्ट्रसेवा यांसाठी जन्माला आलेला आहे. हे प्राण माझ्या मातृभूमीसाठी आहेत. देवाच्या कृपेने या पवित्र भारत भूमीमध्ये जन्म झाला. याचे ऋण फेडण्यासाठी प्रसंगी प्राणार्पणाची सिद्धता ठेवून म्हणजेच समर्पित भावाने हिंदु राष्ट्राचे ध्येय घेऊन हिंदुस्थानाचे नवनिर्माण किंवा विजयाचा इतिहास निर्माण करण्यासाठी स्वतःचे शौर्याचे पाऊल आता पुढे टाकूया !

भीती न आम्हा ह्या वज्रमुठींनी कातळ भेदू
सीमा न कुठली हुंकार असा गगनाला छेदू
ठाम निश्चय हा दुर्दम्य आमुची इच्छाशक्ती
हृदय पोलादी ना सोडी कधी राष्ट्रभक्ती

हिंदु युवकांनो, संकटांची आम्हाला भीती नाही. शत्रूची आम्हाला काय तमा ! भगवंताच्या शक्तीने अन् या शौर्याच्या वज्रमुठींनी आम्ही संकटांचे हे कातळ भेदू शकतो, कितीही संकटे आली, तरी ती आपल्याला भेदून पुढे जायचे आहे. देव मस्तकी असतांना संकटांची आम्हाला भीती नाही. या धर्मशक्तीच्या वज्रमुठींनी संकटरूपी दगड शौर्याने भेदून टाकण्याची धमक आपण बाळगतो. आम्ही हिंदु राष्ट्र वेडे आहोत. आमच्या हिंदु राष्ट्र भक्तीला कुठलीच सीमा नाही. गगनाला ही छेदेल, असा आमचा हिंदु राष्ट्राचा हुंकार आहे. राष्ट्र आणि धर्म द्रोही यांच्या हृदयात धडकी भरवणारी सिंहगर्जना या हिंदु राष्ट्र्राची आहे. हिंदु राष्ट्राचा आपला निर्णय ठाम आहे आणि आपली इच्छाशक्तीही दुर्दम्य आहे, कितीही संकटे आली, तरी हे समर्पित हृदय अन् या पोलादी हृदयातील राष्ट्रभक्ती कधीच सुटणार नाही कि तुटणार नाही. तिला कधीच ओहोटी येणार नाही. हिंदु युवकांच्या मनातील राष्ट्रभक्तीचा सागर असाच शेवटच्या श्वासापर्यंत उसळत राहील.

जन्म हा माझा होई सार्थ साचा, मुक्त माता होता
हे एकची माझे ध्येय आता राष्ट्र असे घडवावे
हे भारतभू तुजसाठी आता जीवन अर्पावे

हे हिंदु युवकांनो, आपल्या मातृभूमीला म्हणजेच या भारतमातेला आपल्याला मुक्त करायचे आहे. या मातृभूमीमध्ये हिंदु राष्ट्र स्थापन केल्यावरच आपल्या या जन्माचे सार्थक होणार आहे. त्यामुळे आता केवळ एकच ध्येय आणि एकच वेड या जीवाला असू द्या, ‘प्राणप्रिय हिंदु राष्ट्राचे ! या देशाला हिंदु राष्ट्र म्हणून घडवण्याचे !’ आता ती वेळ समीप आली. ज्याची आपण वाट बघतो आहोत मित्रांनो, मातृभूमीसाठी, या हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन आणि प्रसंगी जीवन समर्पण करण्यास आता सिद्ध होऊ या. चला, शौर्याची शर्थ करूया अन् हिंदु राष्ट्राचा इतिहास निर्मूया !

ज्योत ज्ञानाची स्फुल्लिंग मनाचे पेटून उठले
स्वाभिमानाचे हे कुंड मनाचे मग धगधगले
शृंखला तोडी हे दास्य आता ना साही कोणा
देश हा अमुचा स्वातंत्र्याचा अमुचा बाणा

हिंदु युवकांनो, हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत ज्ञानगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या हिंदु राष्ट्राच्या ज्ञानाच्या ज्योतीने आपले मनाचे स्फुल्लिंग आता पेटून उठले आहे. त्यामुळे आपल्यातील हिंदु धर्माभिमानाचे अन् राष्ट्र्राभिमानाचे कुंड आता धगधगायला लागले आहे. जणू संपूर्ण भारत भूमी आज या हिंदु राष्ट्र ध्येयाने धगधगणार्‍या असंख्य हृदयांनी केशरी होत आहे आणि तेजाची भगवी झळाळी येऊ लागली आहे. आता वेळ आली आहे, दास्यत्वाची शृंखला आपल्या शौर्याने तोडण्याची ! खूप सहन केले धर्मसंकट आणि राष्ट्रसंकट, आता नाही तर कधीच नाही ! बांधवांनो, हा देश, हा हिंदुस्थान आपला आहे आणि आपला बाणा हिंदु राष्ट्राचा आहे, हे लक्षात ठेवून, चला हिंदु राष्ट्राचा विजयी ध्वज या मातृभूमीवर फडकवण्यासाठी सिद्ध होऊ या !

मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणांचे
फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे
घेऊ हे ब्रीद हाती आसेतुसिंधू नव हिंदुस्थानाचे

हिंदु युवकांनो, या मातेच्या पायाशी आता समर्पित होण्याची वेळ आली आहे. चला, मायभूचे पांग फेडण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे व्रत हाती घेऊया. आपल्या हिंदूंच्या सिंधु नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी चला नवनिर्माण करूया हिंदुस्थानाचे ! आता केवळ एकच ध्येय आणि एकच लक्ष्य हिंदु राष्ट्र ! हिंदु राष्ट्र !! हिंदु राष्ट्र !!!

बांधवांनो मातृभूमीचे चरण धुण्यासाठी हिंद महासागर सज्ज आहे. एका बाजूस सिंधुसागर आणि दुसर्‍या बाजूस बंगालचा उपसागर उभा आहे, मातेच्या पाठी हिमालयाची उत्तुंग शिखरे रक्षणार्थ, तसेच मातृभूमीचे गोडवे विश्वभर गाण्यासाठी सिद्ध आहेत. आता आपल्याला शौर्याचे पाऊल पुढे टाकून या मातृभूमीच्या मस्तकी हिंदु राष्ट्राचा मुकुट परिधान करायचा आहे. चला, श्री हिंदु राष्ट्ररूपी श्री गुरूंच्या चरणाशी, त्या आपल्या भगवंताशी एकरूप होऊन समर्पित होऊया !

– श्री हिंदु राष्ट्ररूपी श्रीविष्णुस्वरूप गुरूंचा, श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती (१८.०४.२०२१)