संभाजीनगर येथील साहाय्यक पोलीस आयुक्तांचा माफीनामा संभाजीनगर खंडपिठाने फेटाळला !

शिरस्त्राण सक्तीचा दिनांक पालटल्याविषयी प्रसारमाध्यमांवर खापर फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या अंगलट !

पोलिसांच्या अशा कृत्यांमुळे जनतेमध्ये त्यांची विश्‍वासार्हता कशी रहाणार ?

संभाजीनगर – ‘कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मास्क’ आणि ‘शिरस्त्राण’ (हेल्मेट) ५ मेपासून सक्तीचे करा’, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने आदेश दिले आहेत. त्याची कार्यवाही करतांना साहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी आधी ५ मेपासून शिरस्त्राण सक्तीचे परिपत्रक काढले. नंतर त्यात त्यांनीच १६ मे असा पालट केला; मात्र त्याचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी खंडपिठाने वानखेडे यांनी दिलेला लेखी माफीनामा फेटाळला.(न्यायालयासमोर थातूरमातूर उत्तरे देणारे पोलीस सामान्य नागरिकांना कसे हाताळत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)

१. सर्व वृत्तपत्रांमध्ये वानखेडे यांनी दिलेल्या माहितीवरून शिरस्त्राण सक्ती ५ मे नव्हे, तर १६ मेपासून होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. खंडपिठाने ५ मे असा दिनांक दिला होता. तरीही असे का झाले ? अशी विचारणा खंडपिठाने केली. त्यावर वानखेडे यांच्या अधिवक्त्याने प्रसारमाध्यमांत तसे आल्याचे सांगितले; मात्र ‘सर्वच वृत्तपत्रांत दिनांकाचा एकसारखा उल्लेख असलेल्या बातम्या कशा प्रसिद्ध झाल्या ?’, असा प्रश्‍न उपस्थित करून याविषयी न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती बी.यू. देबडवार यांनी न्यायालयाचे मित्र अधिवक्ता सत्यजित बोरा यांना खातरजमा करण्याचे निर्देश दिले.

२. अधिवक्ता सत्यजित बोरा यांनी विविध वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता वानखेडे यांनी दिलेल्या माहितीवरून दिनांकामध्ये पालट केल्याचे निदर्शनास आले. याविषयी वानखेडे यांना लेखी माफीनामा सादर करण्याचे आदेश दिले होते.

३. शिरस्त्राण नसेल, तर दुचाकीची नोंद केली जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.