कायद्याची कार्यवाही हवी !

पुणे येथे मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांच्यावर गोमाफियांकडून झालेले प्राणघातक आक्रमण ही अत्यंत धक्कादायक आणि धर्मप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात नेणारी घटना आहे. गोवंशियांच्या हत्या आणि गोमांस तस्करी प्रकरणी आता डोक्यावरून पाणी वाहून गेले आहे. शिवशंकर स्वामी यांच्यावर झालेले हे दुसरे प्राणघातक आक्रमण आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये ६६ जनावरे आणि २ सहस्र किलो मांस, १६८ कातडी आणि ५ टेम्पो जप्त केले होते. यानंतर इंदापूर येथील अनधिकृत बांधकामाविषयी तक्रार करायला गेले असतांना स्वामी यांच्यावर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. तेव्हा ते वाचले. आता झालेले आक्रमणही इतके मोठे होते की, केवळ दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. प्राण हातावर घेऊन धर्मांध गोतस्करांशी लढा देणारे स्वामी यांच्यासारख्या प्रामाणिक गोप्रेमींना पोलिसांकडून यापुढेही पूर्णतः संरक्षण मिळते का, ते पहावे लागेल. पहिल्या प्रसंगात आक्रमणकर्त्यांजवळ पिस्तुले होती. त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता; पण त्यांना कडक शिक्षा झाली कि नाही हे कळायला मार्ग नाही. यापुढेही स्वामी यांच्या जिवाला धोका कायम आहेच.

प्रतिकात्मक छायाचित्र

गोतस्करांचा उद्दामपणा मोडून काढा !

आक्रमण करतांना गोमाफियांनी ‘स्वामी को मार डालो’, अशा घोषणा अनेक वेळा दिल्या. गोमाफियांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे यातून दिसून येते. यातील एकाही गोमाफियाला मोकाट सोडणे किती धोकादायक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘आम्ही काहीही केले, तरी आमचे कुणीही काहीही वाकडे करू शकणार नाही’, हे धर्मांधांनी जाणल्यामुळे ते उन्मत्त झाले आहेत. गोमाफियांची टोळी स्वामी यांच्या गाडीचा पाठलाग सोडत नव्हती. या वेळी स्वामी यांनी स्वतः स्थिर राहून सहकार्‍यांनाही धीर दिला. पोलीस ठाण्याबाहेर त्यांना मारहाण करण्यात आली. या आरोपींपैकी काहींना पकडण्यात आले आहे; परंतु गोहत्यारांचे हे धैर्य कशामुळे वाढले आहे ? कारण त्यांना विशेष काही शिक्षा होत नाही, हे त्यांना माहीत आहे.

कायद्याचे राज्य कधी येणार ?

गोवंशीय किंवा त्यांचे मांस यांची अवैध ने-आण झाली नाही, असा एकही दिवस केवळ भारतातच काय राज्यातही जात नाही. प्रत्येक आठवड्याला ही तस्करी पकडल्याची न्यूनतम ४ वृत्ते असतात. एवढ्या प्रचंड घटनांमध्ये किती जणांना कडक शासन झाले, हा मोठा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय ठरेल. स्वामी यांच्या संदर्भात मागील घटनेतील उद्दाम धर्मांधांना कडक शासन झाले असते, तर आज हे आक्रमण कदाचित् टळले असते. अनेकदा ऐकले जाते ‘इथे कायद्याचे राज्य आहे’. इथे तर गोतस्कर, भूमाफिया, भ्रष्टाचारी प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी, नामचीन गुंड, बांधकाम व्यावसायिक आदींचे राज्य आहे, हे मात्र यासारख्या घटनांतून वारंवार सिद्ध होते. ‘कायद्याचे राज्य आहे’, हे सिद्ध करणार्‍या घटना विरळच दिसतात. गोवंश हत्या बंदीच्या कायद्याचा महाराष्ट्रात काहीच उपयोग होत नाही, हेच प्रतिदिन होणार्‍या अवैध गोवंशीय आणि त्यांचे मांस यांच्या तस्करीमुळे लक्षात येते. कायद्याची कार्यवाही करणारे प्रशासन निडर, प्रामाणिक, सक्षम आणि नीतीमान असणे किती आवश्यक आहे, हेही यातून लक्षात येते. अवैध गोवंशीय आणि मांस यांच्या अवैध तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम नाहीत का ? ‘नाहीत’ असे म्हणणे धाडसाचे ठरेल. भ्रष्टाचार, वरून येणारा दबाव आणि निष्क्रीयता या रोगाने देशाप्रमाणेच महाराष्ट्र पोलीसही पीडित आहेत. किती पोलिसांचे प्राण गेल्यावर याविषयी सर्वांना जाग येणार आहे ? खरेतर सरकार आणि प्रशासन यांच्या हातात सर्व काही असते. लागते ती इच्छाशक्ती. छत्रपती शिवरायांनी गोमातेला हात लावणार्‍यांचा चौरंगा केला म्हणजे कसायाचे हात तोडले. एवढी कठोर शिक्षा आपल्याकडे नाही. गोवंश हत्या बंदीचा कायदा राज्यात आहे. त्याची व्यवस्थित कार्यवाही झाल्यास अशा बहुतांश प्रकरणांना निश्चित चाप बसेल; मात्र पोलीस त्याचा वापर करत नाहीत, हे संतापजनक !

कायद्याची कार्यवाही होणार कशी ?

भाजपचे सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी ‘गोवा येथील नागरिकांनी त्यांची गोमांस भक्षणाची सवय पालटली पाहिजे’, असे विधान केले होते. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका व्हायला लागली. या विधानाचा खरोखर विचार केला पाहिजे. नागरिकांकडून गोवंशियांच्या मांसाची मागणी न्यून झाली, तर त्याचा व्यापारही न्यून होईल. सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते, ‘संपूर्ण भारतात गोहत्या बंदी कायदा व्हायला हवा.’ संपूर्ण भारतात जरी तो झाला, तरी याच प्रकारे त्याची कार्यवाही होणार नसेल, तर तो कायदा होऊन तरी काय लाभ होणार ? जेथे कायदा आहे, तेथे किती प्रमाणात गोवंश हत्या बंदी खरोखर झाली आहे, याचा आढावा केंद्र सरकारने घ्यायला हवा. अनेक शेतकर्‍यांची जनावरे गोठ्यातून चोरीला जाण्याच्या घटना घडतात. ते चोर कारागृहाबाहेर येताच कामा नयेत, अशी कायद्यात तजवीज हवी. गोतस्करांचा कायमचा बंदोबस्त होण्यासाठी अधिक अतीकडक कारवाई व्हायला हवी आणि ती होते कि नाही याचा शेवटपर्यंत पाठपुरावा घेतला जायला हवा. जसे सोनसाखळी चोर पोलिसांना ठाऊक असतात, तसे गोवंशियांची अवैध वाहतूक आणि तस्करी करणारे पोलिसांना ठाऊक असतात, असे लक्षात येते. गोरक्षकांना गोरक्षण करण्याची अतिव तळमळ असल्याने ते हातावर प्राण घेऊन गोरक्षण करतात. सर्वत्रच्या पोलिसांना गोरक्षण व्हावे, अशी तळमळ नाही. त्यांना केवळ वेतनाशी कर्तव्य आहे. त्यांनाही त्यांच्या जिवाची भीती आहे. त्यांना राजकारण्यांकडून अभय मिळायला हवे. सर्व यंत्रणा हाताशी असून ही स्थिती आहे.  शिवशंकर स्वामींसारखे एखादेच जिवावर उदार होऊन गोहत्यारे आणि गोतस्कर यांच्याशी लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवितरक्षणाचे दायित्व पोलीस प्रशासनाने पूर्णतः स्वतःवर घेतले पाहिजे. ज्या भारतभूमध्ये गोमातेला देवतेचे स्थान आहे, त्या ठिकाणी तिच्यावरून पोलिसांचे प्राण कंठाशी येत आहेत, हे दुर्दैवी आहे. कायद्याची कडक कार्यवाही करणे पोलीस प्रशासनाच्या हातात आहे. त्यांचे कर्तव्य त्यांनी चोखपणे बजावल्यास गोमाफियांच्या उद्दामपणावर चाप बसेल आणि गोमातांसह त्यांचे स्वतःचे रक्षण होईल. गोमातांचे रक्षण होण्यासाठी आणि कायद्याचे राज्य येण्यासाठी मात्र हिंदु राष्ट्राची प्रतीक्षा करावी लागेल !