बंगालमध्ये निवडणुकीनंतरच्या हिंसेत ११ जण ठार !

हिंसेमागे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा भाजपचा आरोप !

  • पूर्वी बंगालमध्ये माकपवाले हिंसाचार करते होते, नक्षलवादी हिंसाचार करत होते, तर गेल्या १० वर्षांपासून तृणमूल काँग्रेसवाले करत आहेत. अशा राज्यात राष्ट्रपती राजवटच आवश्यक आहे !
  • बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निवडणुकीपूर्वीही अशीच होती. गेल्या २-३ वर्षांत भाजपच्या १०० हून अधिक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या; मात्र केंद्र सरकारने त्याचे गांभीर्य ओळखून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली नाही आणि आता त्याच्या पुढचा भाग चालू झाला आहे, यासाठी कुणाला उत्तरदायी ठरवायचे ?

कोलकाता – बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होताच राज्यात हिंसाचार चालू झाला आहे. यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ‘दैनिक जागरण’ने दिलेल्या वृत्तानुसार भाजपचे ९, तृणमूल काँग्रेसचा १ कार्यकर्ता, तर अन्य एक अशा ११ जणांचा यात मृत्यू झाला आहे. कोलकाता येथील उल्टाडांगामध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण करून ठार करण्यात आले, असे वृत्त आहे. निकाल लागल्यापासून बंगालच्या दक्षिण २३ परगणा, नदीया, वर्धमान आणि उत्तर २४ परगणा या जिल्ह्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आरोप केला की, पक्षाच्या १०० हून अधिक कार्यालयांची आणि कार्यकर्त्यांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. काहींना आग लावण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाने बंगालमधील हिंसाचारावरून अहवाल मागितला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना दूरभाष करून चिंता व्यक्त केली. धनखड यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि कोलकात्याचे पोलीस आयुक्त यांना स्थिती नियंत्रणात आणण्याविषयी आदेश दिला आहे.

ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेल्या नंदीग्राममध्ये भाजपच्या कार्यालयावर आक्रमण करण्यात आले, तसेच दुकानांचीही नासधूस करण्यात आली. काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली असून पोलीस घटनास्थळी आल्यानंतर हिंसाचार करणारे पसार झाले, असा आरोप भाजपने केला आहे. या संपूर्ण हिंसाचारामागे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोपही भाजपने केला आहे, तर तृणमूल काँग्रेसने या हिंसाचारासाठी भाजपला उत्तरदायी ठरवले आहे.

भाजपकडून त्याच्या महिला पोलिंग एजंटवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप

या हिंसाचारात भाजपने त्याच्या २ महिला पोलिंग एजंटवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

ममता बॅनर्जी अराजकता पसरवत आहेत ! – सीताराम येचुरी यांचीही टीका

माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी

माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले की, ज्या प्रकारे तृणमूल काँग्रेस तिच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे, तो निषेधार्ह आहे. अशा हिंसेचा प्रतिकार केला जाईल. ती स्वीकारता येणार नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यापेक्षा ममता बॅनर्जी अराजकता पसरवत आहेत.

जे.एन्.यू.च्या विद्यार्थी संघटनेच्या महिला अध्यक्षाकडूनही विरोध

जे.एन्.यू. विश्‍वविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेच्या महिला अध्यक्षा आयशी घोष यांनीही तृणमूल काँग्रेसवर हिंसाचाराचा आरोप केला आहे. तृणमूलने लोकांनी दिलेल्या बहुमताचा आदर राखला पाहिजे. हे बहुमत त्यांना काम करण्यासाठी दिले आहे, हिंसाचारासाठी नाही. ममता बॅनर्जी यांचे कार्यकर्ते विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर आक्रमणे करत आहेत, हे सहन करता येणार नाही.

भाजप कार्यकर्त्याने ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे तृणमूल काँग्रेसचा हिंसाचार दाखवल्यावर काही घंट्यांत त्याची हत्या

बंगालमधील भाजपचे कार्यकर्ते अभिजित सरकार यांनी ‘फेसबूक लाईव्ह’वरून तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून केल्या जाणार्‍या हिंसाचाराची माहिती दिली. त्यानंतर काही घंट्यांत त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या कुत्र्यालाही ठार करण्यात आले.

श्री महाकालीदेवी आणि श्री हनुमान यांच्या मूर्तींची तोडफोड

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्याच्या कोलकाता येथील कार्यालयावरही तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आक्रमण केल्याचा आरोप केला आहे. येथे असणार्‍या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. कार्यालयात असणार्‍या श्री महाकालीदेवी आणि श्री हनुमान यांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याचाही आरोप अभाविपने केला आहे. अभाविपच्या महामंत्री निधी त्रिपाठी यांनी म्हटले की, ज्यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. कार्यालयातील श्यामाप्रसाद मुखर्जी, सुभाषचंद्र बोस आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमाही फोडण्यात आल्या.

(म्हणे) ‘मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नाही, तोपर्यंत माझ्या हातात कायदा आणि सुव्यवस्थचे दायित्व येत नाही !’ – ममता बॅनर्जी यांचा कांगावा !

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील हिंसाचारावर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आणि चिथावणीला बळी न पडण्याचे आवाहन केले. निवडणुकीमध्ये केंद्रीय दलांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार केल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘निवडणूक आयोगाने भाजपला साहाय्य केले नसते, तर भाजपला ५० जागांचा टप्पा ओलांडणेही कठीण झाले असते’, असा आरोपही त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, जोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नाही तोपर्यंत माझ्या हातात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व येणार नाही. भाजप जुनी छायाचित्रे आणि राज्याबाहेरील छायाचित्रे दाखवून खोटे आरोप करत आहे.

तृणमूलच्या लोकप्रतिनिधींनाही देहलीत यावे लागते, हे लक्षात ठेवा ! – भाजपच्या खासदाराची चेतावणी

भाजपचे खासदार परवेश साहिबसिंह वर्मा

नवी देहली – बंगालच्या विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांचे जीव घेतले. त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. लक्षात ठेवा तृणमूलच्या खासदार, मुख्यमंत्री आणि आमदार यांनाही देहलीमध्ये यावे लागते. याला चेतावणी समजा. निवडणुकीमध्ये पराभव आणि विजय होत असतात, हत्या होत नाहीत, अशी चेतावणी देणारे ट्वीट देहलीतील भाजपचे खासदार परवेश साहिबसिंह वर्मा यांनी दिली आहे.