(म्हणे) ‘हिंदूंनी मुसलमानांंची क्षमा मागावी !’-कुंभमेळ्यातील गर्दीवरून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे ट्वीट

संपूर्ण देशात आतंकवाद पसरवल्याविषयी मुसलमानांना हिंदूंची क्षमा मागायला राम गोपाल वर्मा यांनी कधी सांगितले आहे का ? कुंभमेळ्यावर टीका करायची आणि तबलिगी जमातच्या कार्यक्रमाविषयी मात्र मूग गिळून गप्प बसायचे, हा हिंदुद्वेष होय !

राम गोपाल वर्मा

मुंबई – ‘मार्च २०२० मध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार करणारी देहलीतील जमात ही बाहुबली कुंभमेळ्याच्या पुढे एखाद्या ‘शॉर्ट फिल्म’सारखी होती. सर्व हिंदूंनी मुसलमानांची क्षमा मागायला हवी; कारण त्यांनी हे सर्व तेव्हा केले, जेव्हा आपल्याला कोरोनाविषयी काहीच ठाऊक नव्हते आणि आपण हे अशा वेळी करत आहोत, जेव्हा आपल्याला कोरोनाचे गंभीर परिणाम ठाऊक आहेत’’, असे ट्वीट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केले आहे.

अन्य एका ट्वीटमध्ये कुंभमेळ्याविषयी राम गोपाल वर्मा यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे, ‘‘अभिनंदन इंडिया ! दळणवळण बंदीला आता ‘ब्रेक द चेन’ असे नवीन नाव देण्यात आले आहे. या नामकरणाच्या कार्यक्रमात या सूचनेसह सांगण्यात आले आहे की, कुंभमेळ्यातून परतणार्‍या लोकांनी मास्क वापरला नाही, तरी चालेल; कारण ते त्यांचा विषाणू आधीच गंगेत धुवून आले आहेत.’’(कोरोनाविषयी नियमांचे पालन झाले नाही, तर त्याविषयी बोलण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य वर्मा यांना अवश्य आहे; मात्र गंगेविषयी असे बोलतांना तिच्या जलाची पवित्रता त्यांनी समजून घ्यावी. ती समजण्याची आध्यात्मिक पात्रता नसल्यामुळे राम गोपाल वर्मा असे उथळ वक्तव्य करत आहेत ! – संपादक) अन्य एका ट्वीटमध्ये वर्मा यांनी म्हटले आहे, ‘‘तुम्ही जो पहात आहात, तो कुंभमेळा नाही, तर एक ‘अ‍ॅटम बॉम्ब’ आहे. मला उत्सुकता वाटत आहे की, आता या ‘विषाणूस्फोटा’साठी कुणाला उत्तरदायी धरले जाणार आहे ?’