वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत १९ एप्रिलपासून सर्व प्रौढ व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ही घोषणा केली. अमेरिकेत आतापर्यंत १५ कोटी जणांना लस देण्यात आली आहे. आगामी २५ दिवसांमध्ये आणखी ५ कोटी जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट बायडेन प्रशासनाने ठेवले आहे.
१. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सांगितले की, आपण अद्यापही विजयी झालेलो नाही. आपल्याला आणखी काही गोष्टी साध्य करायच्या आहेत. कोरोनाच्या विरोधात आपण सर्व संघर्ष करत आहोत. अधिकाधिक लोकांना लस दिली जात नाही, तोपर्यंत कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले.
२. भारतातही ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केली; मात्र सर्वांसाठी लस देण्यात येणार नसून आवश्यकता असणार्यांनाच लस देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.