स्वाध्याय अभ्यासमालेत सोलापूर जिल्हा प्रथम, साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी

सोलापूर – ‘ऑनलाईन’ शाळा चालू झाल्यानंतर मुलांना विज्ञान आणि गणित या विषयांची गोडी निर्माण व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने चालू केलेल्या स्वाध्याय अभ्यासमालेत ४ लाख ९० सहस्र विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे स्वाध्याय अभ्यासमालेत सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

स्वाध्याय अभ्यासमालेचा २० वा सप्ताह आहे. मागील सप्ताहात सोलापूर जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर होता. स्वाध्याय अभ्यासमालेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी तालुका स्तरावर मुख्याध्यापकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. प्रतिदिन शिक्षकांशी ‘ऑनलाईन’ संवाद साधल्यामुळे प्रारंभी २७ व्या क्रमांकावर असलेला सोलापूर जिल्हा आता प्रथम क्रमांकावर आला आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.

कशी आहे स्वाध्याय अभ्यासमाला ?

कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे. मुलांची ‘ऑनलाईन’ शिक्षणातील गोडी वाढावी यासाठी शिक्षण विभागाने ‘ऑनलाईन’ अभ्यासमाला चालू केली. शाळांचा युडायस क्रमांक टाकून विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत. प्रत्येक सप्ताहात विज्ञान, गणित आणि भाषा विषयांचे १० प्रश्‍न विचारले जातात. पर्याय निवडून उत्तरे दिल्यानंतर त्वरित ‘किती प्रश्‍नांचे उत्तर बरोबर आले’ याचा निकाल येतो. या स्वाध्याय अभ्यासमालेत विचारण्यात येणारे प्रश्‍न तज्ञांच्या माध्यमातून निवडले जातात.